Best Vegetables for Diabetes : मधुमेह ही अशी स्थिती आहे, जी वेळीच नियंत्रित न केल्यास, हृदय, मूत्रपिंड व फुप्फुस यांसारख्या शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांवर वाईट परिणाम होऊ शकतो. हळूहळू हा आजार शरीराला आतून कमकुवत करतो. म्हणूनच मधुमेहाला ‘सायलेंट किलर’, असेही म्हटले जाते. मधुमेही रुग्णांनी त्यांची दैनंदिन दिनचर्या आणि आहारात काही महत्त्वाचे बदल केले पाहिजेत. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे, संतुलित आहार घेणे व मानसिक ताण नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. रक्तातील साखर सामान्य करण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णाने प्रथम कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण मर्यादित करावे आणि त्याच्या आहारात प्रथिने, फायबर व आरोग्यदायी चरबी यांचा समावेश करावा.
जर मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या रक्तशर्करेची पातळी नेहमीच सामान्य ठेवायची असेल, तर त्यांनी सकाळच्या नाश्त्यात काही खास भाज्यांचा समावेश करावा. नाश्त्यात कमी कार्बोहायड्रेट्स आणि जास्त प्रथिनांनी युक्त असा आहार घेतल्याने रक्तशर्करा नियंत्रित राहण्यास मदत होते. भाज्या आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. जर काही भाज्यांचे नाश्त्याद्वारे सेवन केले, तर रिकाम्या पोटी अन् जेवणानंतर साखरेची पातळी सामान्य ठेवणे शक्य होते.
शेवग्याचे सेवन महत्त्वाचे
शेवग्याचा प्रत्येक भाग आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. त्याची पाने, फुले व फळे जी सामान्यतः भाज्या म्हणून वापरली जातात, ती सर्व खाण्यासाठी उपयुक्त आहेत. शेवगा, ज्याला मोरिंगा, असेही म्हटले जाते. ही एक अशी भाजी आहे, जी मधुमेह नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते, या भाजीमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याची आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्याची क्षमता आहे. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, शेवग्याच्या पानांमध्ये अशी संयुगे आढळतात, जी रक्तातील साखर नियंत्रित करण्यास, इन्सुलिनचा प्रभावी वापर वाढविण्यास आणि मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत टाळण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंट्स, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेली ही भाजी मधुमेह नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी ठरते.
मधुमेह नियंत्रणासाठी भोपळा कसा उपयुक्त?
भोपळा ही एक अशी भाजी आहे की, जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक सुपरफूड मानली जाते. त्याचा ग्लायसेमिक भार खूप कमी असतो. म्हणजेच त्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढत नाही. भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे शरीराला हायड्रेट ठेवते. तसेच त्यात भरपूर फायबर असते, जे पचन सुधारते. याच्या सेवनाने बद्धकोष्ठता दूर होते आणि जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. नाश्त्यातून नियमितपणे भोपळ्याची भाजी घेतल्याने रक्तशर्करेची पातळी नियंत्रित राहते, ज्यामुळे मधुमेहाचे व्यवस्थापन करणे सोपे होते.
रक्तशर्करा नियंत्रणासाठी कोबी खा
मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोबी ही एक अतिशय फायदेशीर भाजी मानली जाते. लोक अनेकदा फुलकोबी खातात; परंतु कोबीही तितकीच प्रभावी आहे. या भाजीमध्ये ग्लायसेमिक भार खूप कमी आहे आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप कमी आहे, ज्यामुळे कोबीच्या सेवनानंतर रक्तशर्करेची पातळी जलद वाढत नाही.कोबीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी व अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, ज्यामुळे केवळ रक्तशर्करेची पातळीच नियंत्रित होत नाही, तर आरोग्यदायी जीवनशैलीमध्ये कोबीचा समावेश केल्यास मधुमेहही कमी करण्यासही मदत होते.कोबी हलकासा वाफवून, सॅलड म्हणून किंवा हलकी मसालेदार भाजी बनवून खा. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहील.