Consuming Ashwagandha supplements: अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदानुसार, अश्वगंधाचे सेवन केल्यास मन शांत होणे, झोपेची गुणवत्ता सुधारणे व तणाव कमी होणे यांसारख्या समस्या उदभवण्याचे प्रमाण कमी असते. काही जण दररोज पावडर स्वरूपात, दुधात मिसळून किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात अश्वगंधाचे सेवन करतात. सेवन केल्यानंतर त्याचे फायदे काही लोकांना जाणवतात; मात्र काहींना याउलट अनुभव येतात.
अश्वगंधाचे सेवन केल्यास काय होते?
अश्वगंधाचे सेवन हे साधारणपणे शरीरात ऊर्जा राखण्यासाठी तसेच ताणतणाव दूर ठेवण्यासाठी केले जाते. काही जणांना मात्र अश्वगंधा दररोज घेतल्यानंतर अस्वस्थता किंवा आणखी चिंताग्रस्त वाटणे, पचनासंबंधित त्रास होणे, झोपेत अडथळा किंवा मनस्थितीत बिघाड या समस्या उद्भवतात. त्यामुळे असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की, जे औषध आयुर्वेदानुसार सुचवले जाते ते अनेकदा उलट परिणाम का करते?
डॉक्टर काय सांगतात?
दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ब्लूम क्लिनिक्सच्या आयुर्वेदीय डॉक्टर व न्युट्रिशनिस्ट डॉ. अंजना कालिया यांनी सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. अंजना सांगतात, “अश्वगंधा हे अॅडॅप्टोजेनिक औषध आहे. ते साधारणपणे शरीराला तणावाची परिस्थिती हाताळण्यास मदत करते. शरीराचं संतुलन राखण्यास, ताण कमी करण्यास, रोगप्रतिकार शक्ती व ऊर्जा सुधारण्यात हा घटक मदत करतो. मात्र, त्याचा परिणाम व्यक्तीनुसार बदलतो. काही लोकांमध्ये हे मज्जासंस्थेला शांत करण्याऐवजी आणखी उत्तेजित करण्याचे काम करू शकते.
अश्वगंधाच्या सेवनामुळे चिंता वाढणे, अस्वस्थपणा, चिडचिड किंवा झोपेत अडथळा, अशी लक्षणे काही लोकांमध्ये दिसू लागतात. त्यामागचे कारण म्हणजे काही वनस्पती घटकांप्रति संवेदनशीलता, इतर औषधांशी येणारा संपर्क किंवा शरीर त्या सर्व औषधांचे घटक कसे पचवते यामध्ये व्यक्तीगणिक फरक पडतो. बहुतांश लोकांना अश्वगंधाचे सेवन केल्यास आराम मिळतो; तर काहींना अगदी याउलट अनुभव येतो.
अश्वगंधा शरीर शांत करते की उत्तेजित करते हे त्याचे प्रमाण, शरीराची प्रकृती किंवा आधीपासून असलेली आरोग्य स्थिती यांवर अवलंबून आहे. एखाद्या व्यक्तीची प्रतिक्रिया अनेक गोष्टींवर अवलंबून असते. नैसर्गिकरीत्या सतत काळजी करणारे किंवा जलद मेटाबॉलिझम असलेले लोक यामुळे खूप उत्तेजित होऊ शकतात.
अश्वगंधा आणि इतर आजारांवरील औषधे एकत्रितपणे घेतल्यास काय होते?
थायरॉइड, झोपेच्या समस्या किंवा काही मानसिक आजारांसारख्या पूर्वीच्या आरोग्य स्थितीमुळे कोणत्याही औषधाचा परिणाम बदलू शकतो. त्याव्यतिरिक्त अश्वगंधा हे अँटीडिप्रेसंट्स, सिडेटिव्ह्ज किंवा थायरॉइड या आजारांवरील औषधांच्या संपर्कात आल्यास अनपेक्षित परिणाम होण्याची शक्यता आहे.
अश्वगंधा घेतल्यास जर एखाद्या व्यक्तीला ताण वाढल्यासारखे किंवा अस्वस्थ वाटत असेल, तर ते ताबडतोब घेणं बंद करावं. मात्र, एखाद्या व्यक्तीला इतर वैद्यकीय समस्या असतील किंवा ती व्यक्ती इतर आजारांवरील औषधं नियमितपणे घेत असेल, तर ते थांबवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. यावर “डॉक्टर औषधांमधील संपर्क तपासू शकतात, आवश्यक असल्यास त्याचे डोस बदलू शकतात किंवा तणाव व्यवस्थापनासाठी अधिक सुरक्षित पर्याय सुचवू शकतात”, असे डॉ. कालिया यांनी सांगितले आहे.