How To Control Hight Blood Pressure: आजची धावपळीची, असंतुलित जीवनशैली आणि सततचा मानसिक तणाव शरीरात हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब निर्माण करत आहे. यापूर्वी ज्येष्ठांमध्ये दिसणारा हा आजार आता तरुणाईलाही जखडून टाकतो आहे. वयाच्या तिशीच्या आतच अनेकांना हाय बीपीची लक्षणं जाणवू लागली आहेत. डोकेदुखी, चिडचिड, थकवा किंवा अगदी अचानक चक्कर येणंही या त्रासाचं संकेत असू शकतं. सर्वसाधारणपणे रक्तदाब नियंत्रित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण यातील थोडासाही बिघाड हृदय, किडनी, डोळे आणि मेंदूवर गंभीर परिणाम करू शकतो. पण प्रश्न असा आहे की, हाय बीपी टाळायचं तरी कसं? आणि आहारात नेमकं काय बदललं पाहिजे? या सविस्तर रिपोर्टमध्ये जाणून घ्या की, कोणती एक सवय तुम्हाला हाय बीपीच्या खाईत लोटते आणि कोणते नैसर्गिक उपाय तुमचा रक्तदाब पुन्हा नॉर्मल करू शकतात.
उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) हा एक असा आजार आहे, जो ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखला जातो. सुरुवातीला कोणतीही ठोस लक्षणं नसली तरी हळूहळू हा आजार शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम करतो. विशेष म्हणजे, बीपी वाढण्यामागचं मुख्य कारण एक गोष्ट आहे आणि ती तुम्ही रोजच्या जेवणात नकळत घेत असता!
माउंट सिनाई हेल्थ सिस्टिम (न्यूयॉर्क) येथील डायबेटीज अॅलायन्सच्या डायरेक्टर मारिया एलेना फ्रागा यांच्या मते, मीठ हे हाय ब्लड प्रेशरचं मूळ कारण आहे. अति सोडियम (मीठ) युक्त आहारामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाब झपाट्याने वाढतो. पॅकबंद अन्नपदार्थ, सूप, फ्रोझन फूड आणि प्रोसेस्ड मीटमध्ये प्रचंड प्रमाणात लपलेला सोडियम असतो. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, दररोज १,००० मिलीग्राम सोडियम कमी केल्यास बीपीवर सकारात्मक परिणाम होतो. हाय बीपी असलेल्या व्यक्तींनी प्रति दिवशी फक्त १,५०० मिलीग्राम सोडियम घेणं योग्य मानलं जातं.
पोटॅशियमने बीपी नियंत्रणात
पोटॅशियम शरीरातून सोडियम बाहेर टाकण्याचं काम करतं, त्यामुळे आहारात पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश हा हाय बीपीच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
पोटॅशियम रिच फूड्स : केळी, संत्र्याचा रस, मसूर डाळ, पालक, आलू, आलूबुखारा, किशमिश, राजमा, सोयाबीन, लो-फॅट दूध, चिकन ब्रेस्ट, स्क्वॅश इत्यादीचा आहारात समावेश करा.
सोडियम कमी करण्यासाठी टिप्स
- जेवणात चव वाढवण्यासाठी मिठाऐवजी लसूण, ताज्या मसाल्यांचा वापर करा.
- पॅकबंद आणि रेस्टॉरंटमधील पदार्थांपासून शक्यतो दूर राहा.
- लेबलवर ‘Sodium % DV’ (Daily Value) तपासा – ५% पेक्षा कमी असेल तर चालेल, पण २०% पेक्षा जास्त असेल तर टाळा.
आता लक्षात ठेवा, रोजचं मिठाचं सेवन तुम्हाला गंभीर आजाराच्या उंबरठ्यावर नेतंय. सावध व्हा… आणि आहारात बदल करून बीपी नियंत्रणात ठेवा…