आहारतज्ज्ञ अमरिन शेख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनमध्ये उगम पावलेला करोना या विषाणूने जगभर पाय पसरले आहेत. या विषाणूमुळे आतापर्यंत अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. जगभरानंतर आता हा आजार महाराष्ट्रातही पसरू लागला आहे. त्यामुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी वारंवार प्रशासनाकडून आरोग्याची काळजी घेण्याची सूचना करण्यात येत आहे. मात्र शारीरिक स्वच्छतेसोबत आपली रोगप्रतिकारकशक्तीही वाढविणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे आहारतज्ज्ञ अमरिन शेख यांनी करोनापासून संरक्षण करायचं असेल तर आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे सांगितलं आहे.

ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी अशा लोकांना करोना विषाणूची लागण होण्याची भीती सर्वाधिक आहे. मधुमेही रूग्ण, कॅन्सर रूग्ण, मूत्रपिंडाचे विकार, लहान व वृद्ध व्यक्तींना याचा धोका अधिक संभवू शकतो. त्यामुळे या रूग्णांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. मात्र, त्याबरोबरीने या लोकांनी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी जेवणातही पौष्टिक पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे बाहेरील उघड्यावरील पदार्थं, जंकफूड आणि मसालेदार पदार्थांचे सेवन शक्यतो टाळावेत. आहारात अधिकाधिक पालेभाज्या व फळांचा समावेश करावा. अन्यथा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या औषधांचे सेवन करणं गरजेचं आहे.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘हे’ बदल

१. दही –
दही हा सर्वोत्तम पर्याय आहे. जेवाणात दह्याचा समावेश केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच पचनक्रिया सुद्धा सुधारते.

२. ओट्स-
ओट्समध्ये फाइबर्सची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. इतकंच नाहीतर यात अण्टी-माइक्राबियल सुद्धा असतात जे प्रतिकारशक्ती अधिक मजबूत होते.

३. ‘ड’ जीवनसत्त्व –
ड जीवनसत्त्व आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्या पदार्थांमध्ये ड जीवनसत्त्व जास्त प्रमाणात आहे अशा पदार्थांचं सेवन करावं. मधुमेह, रक्तदाब, हाडांचे आरोग्य, केसांचे आरोग्य, दातांचे आरोग्य इत्यादी अनेक बाबींमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व महत्त्वाची भूमिका बजावते. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. महत्त्वाचं म्हणजे मासे, कॉड लिव्हर ऑइल, ताजे लोणी, चीज, मशरूम, अंडय़ातील पिवळा भाग, सोयाबीन, दूध गोष्टींमधून ‘ड’ जीवनसत्त्व मिळते. त्यामुळे या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

४. सी जीवनसत्त्व –
आंबट फळे, लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी, पेरू, चिंच अशा पदार्थांत व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. कुठल्याही संसर्गजन्य आजाराची लागण झालेल्या रुग्णांना व्हिटॅमिन-सी चे सेवन करणे फायदेशीर ठरते. कारण, या पदार्थांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

५. B12 जीवनसत्त्वे –
शरीराला स्वास्थ्य ठेवण्यासाठी या जीवनसत्त्वाची गरज असते. मात्र, अशा अनेक लोकांमध्ये हे जीवनसत्त्व फार कमी प्रमाणात आढळून येत आहे. यामुळे शरीराला अनेक नुकसान सहन करावे लागतात. घरच्या जेवणातून हे जीवनसत्त्वे मिळते. त्यामुळे जंकफुडचे सेवन करणं टाळले पाहिजे. तसेच B12 जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास डॉक्टर रूग्णाला B12 व्हिटॅमिनची गोळी किंवा इंजेक्शन देतात.

६.हळद –
हळदीतील आयुर्वेदीक गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हळदीमध्ये अँण्टीइन्फ्लामेंट्री गुण असतात ज्याचा शरीराला फायदा होतो. हळदीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. हळदीच्या सेवनाने आपले शरीराचे कुठल्याही इंफेक्शनपासून संरक्षण होते. यासोबतच या व्हायरसपासून लढण्यास शरीरास मदत होते.

७. आले –
शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आले अतिशय फायदेशीर आहे.

८. मासे किंवा चिकन
जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत माहिती देताना मांसाहारी पदार्थांपासून करोना होत नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या पदार्थांचे सेवन करणे आरोग्यसाठी योग्य आहे. यामुळेही व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते.

(लेखिका अमरिन शेख या मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयातील आहारतज्ज्ञ आहेत.)

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus add this things in your diet ssj
First published on: 06-04-2020 at 16:10 IST