करोना व्हायरसमुळे देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर आता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टनेही मोठा निर्णय घेतलाय. आपल्या सर्व सेवा तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा कंपनीने केली आहे.

फ्लिपकार्टची वेबसाइट ओपन केल्यानंतर याबाबत एक संदेश दिसतो. त्यामध्ये, “कंपनीकडून आम्ही आमच्या सर्व सेवा तात्पुरत्या बंद करत आहोत. ही अत्यंत कठीण वेळ आहे…पण, लवकरात लवकर परतण्याचा आमचा प्रयत्न असेल… लोकांना सुरक्षित राहण्यासाठी एकमेकांपासून दूर राहावं लागेल असं यापूर्वी कधीही झालं नाही…तुम्ही घरातच राहा आणि सुरक्षित राहा…आम्ही लवकरच परत येवू…”,अशा आशयाचा संदेश कंपनीकडून देण्यात आला आहे.

याशिवाय, पेज स्क्रोल डाउन केल्यानंतर खाली COVID-19 बाबत घ्यावयाची खबरदारी, विमानतळांवर स्कॅन झालेल्या प्रवाशांची आकडेवारी, बरे झालेल्या रुग्णांची माहिती, हेल्पलाइन नंबरसह अन्य विविध महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय पेजवर FAQs नावाचे सेक्शन असून यामध्ये तुम्ही करोना व्हायरसबाबतचे प्रश्न विचारु शकता.