रडल्याने मानावरील ताण कमी होतो हे संशोधानाने सिद्ध झाले आहे. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनानुसार रडल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँग या देशांमध्ये काम करणाऱ्या ‘एशिया वन’ या वेबसाइटने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासामध्ये संध्याकाळी सात ते रात्री दहा या वेळात रडल्यास वजन कमी करण्यात मदत होते असा दावा संशोधकांनी केला आहे.

एखादी व्यक्ती रडताना तिच्या शरीरामध्ये कोर्टिसोल संप्रेरकाची निर्मिती होते. हे संप्रेरक शरीरामधील घटकांमध्ये मिसळते. या संप्रेरकामुळे शरीरातील चरबी कमी होते. तसेच तणावामध्ये रडू आल्यास शरीरातील हानीकारक घटक आसवांवाटे बाहेर पडतात. वजन कमी होण्यासाठी याचा फायदा होतो. या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांशी प्रसिद्ध जैवसंशोधक विल्यम फरे यांनाही सहमती दर्शवली आहे.

मात्र एखादी व्यक्ती खोटं खोटं रडण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला या खोट्या रडण्याचा वजन कमी करण्यासाठी फायदा होणार नाही असंही या संशोधनामध्ये नमूद करण्यात आला आहे. जर एखाद्याचे रडणे आणि त्यामागील कारण खरं असेल तरच त्याचे वजन कमी होण्यास मदत होईल असं संशोधकांनी म्हटलं आहे. मनुष्याचे आश्रू तीन प्रकारचे असतात असा दावा संशोधकांनी केला आहे. अत्यावश्यक आश्रू, प्रतिसाद म्हणून आलेले आश्रू आणि मानसिक कारणामुळे आलेले आश्रू. अत्यावश्यक आश्रू म्हणजे आपल्या डोळ्यांमधील ओलावा टिकवण्यासाठी डोळ्यांना येणारे पाणी. प्रतिसाद म्हणून आलेले आश्रू म्हणजे प्रदुषण आणि धुरामुळे डोळ्यात येणारे पाणी. मानसिक आश्रू म्हणजे भावना आणि संवेदनांशी संबंधिक कारणाने डोळ्यात येणारे पाणी. तिसऱ्या प्रकारचे आश्रू हे अधिक तिव्र भावना व्यक्त करणारे असतात. त्यामुळेच केवळ तिसऱ्या प्रकारच्या आश्रूंमुळे वजन कमी होण्यास मदत होते असं संशोधक सांगतात.

एखादी व्यक्ती आराम करत असताना आपल्या ह्रदयाशीसंबंधीत स्थायू साडेआठ कॅलरीज जाळतात. आपण जेव्हा रडतो तेव्हा ह्रदयाचे ठोके वाढतात. हे ठोके वाढल्याने ह्रदयाशी संबंधीत स्थायूंमार्फत अधिक प्रमाणात कॅलरीज जाळल्या जातात. रडल्याने थोड्याफार प्रमाणात का असेना शरीरातील कॅलरीज जळतात. त्यातही संध्याकाळी सात ते रात्री दहा दरम्यान रडल्याने वजन कमी होण्यास अधिक फायदा होतो असंही या संशोधनात म्हटले आहे. या कालावधीत कोर्टिसोल संप्रेरक अधिक कार्यक्षम असल्याने या काळात रडणे वजन कमी होण्यासाठी फायद्याचे असल्याचे संशोधकांनी अहवालात म्हटले आहे.

त्यामुळेच यापुढे कधी रडावेसे वाटले तर स्वत:ला थांबवू नका. कारण रडल्याने मानसिक शांती मिळण्याबरोबरच वजन कमीही कमी होते. मात्र कायम रडू येणे हे मानसिक तणावाचा संकेत आहे. तणावात असणाऱ्या व्यक्तीची भूक मरते. त्यामुळे तणावात असणारी व्यक्ती रडते आणि तिचेही वजन कमी होते. मात्र भूक कमी झाल्याने तणावात असणाऱ्या व्यक्तीचे वजन कमी होते. त्यामुळे सतत रडावेसे वाटत असल्यास मानसोपचारतज्ज्ञांना भेट द्या.