काकडी ही फळभाजी अत्यंत पाणीदार असून, शरीराला हायड्रेट करण्याचे काम करत असते. काकडीतही अनेक प्रकार असून त्याच्या आकार आणि रंगात थोडाफार बदल आपल्याला दिसतो. थंडीमध्ये तुम्हाला काकडीमधील पोषक घटक, निरोगी आरोग्यासाठी प्रचंड मदत करू शकतात. काकडीच्या सेवनानंतर ताजेतवाने वाटते, त्याचसोबत शरीरदेखील हायड्रेट राहते. पण, यासोबतच त्याचे शरीराला इतरही अनेक फायदेदेखील असतात, ते कोणते हे पाहू.
काकडीचे हिवाळ्यात होणारे हे पाच फायदे पाहा
१. त्वचारक्षणास मदत
हिवाळ्यामध्ये आपली त्वचा प्रचंड कोरडी पडत असते. अशा वेळेस तिची काळजी घेणे हे खूप गरजेचे असते. त्यामुळे हिवाळ्यात काकडी तुमच्या शरीरास, त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करून थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी घेते.
२. अतिरिक्त कॅलरीज वाढण्याची चिंता दूर
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर मधल्या वेळात भूक लागल्यानंतर काकडी खाणे हा सर्वात उत्तम पर्याय ठरेल. काकडीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असून फायबर जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे अवेळी लागलेली भूक शांत होते आणि अतिरिक्त कॅलरीज वाढण्याची चिंतादेखील नसते.
हेही वाचा : सुंदर मेकअप करताना ‘या’ चुका टाळा; पाहा या नऊ उपयुक्त टिप्स आणि ट्रिक
३. त्वचा होईल चमकदार
काकडीमध्ये असणारी ए आणि सी जीवनसत्त्वे तुमच्या त्वचेमधील कॉलेजन (शरीरातील विशिष्ट अवयवांमध्ये आढळणारे एक प्रथिने) वाढवण्यास मदत करून, त्वचेची लवचिकतादेखील वाढवण्यास मदत करते. काकडीमधील अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेवर चमक येऊन, त्यावरील सुरकुत्या कमी होतात.
४. अनावश्यक घटकांचे उत्सर्जन
काकडीमुळे शरीरातील अनावश्यक घटक लघवीवाटे आपल्या शरीराबाहेर जाण्यास मदत होते. या डिटॉक्स (शरीरातील घातक पदार्थ शरीराबाहेर काढण्याची एक संकल्पना) मुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले होऊन, वजन नियंत्रित राहते. त्याचसोबत आपली त्वचादेखील सुंदर ठेवण्यास मदत होते.
५. चयापचय क्रियेत सुधारणा
काकडीमध्ये असणाऱ्या मँगनीज आणि व्हिटॅमिन केमुळे चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे हिवाळ्यात काकडीचे सेवन केल्याने चयापचय क्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
[टीप : वरील लेख हा मिळवलेल्या माहितीवर आधारित असून, यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]