Benefits of eating apples: दररोज दोन सफरचंद खा आणि डॉक्टरांपासून दूर राहा’ ही म्हण आपण सगळ्यांनी ऐकलीच आहे. पण खरंच रोज दोन सफरचंदे खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात हे तुम्हाला माहीत आहे का? आरोग्य तज्ज्ञ व गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. जोसेफ सलहब यांनी इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, सफरचंदामध्ये असलेले फायबर, पोटॅशियम, क्वरसेटिन, कॅटेचिन, क्लोरोजेनिक अ‍ॅसिड व व्हिटॅमिन सी यांसारखे घटक शरीरासाठी किती उपयुक्त असतात.

दररोज २ सफरचंदे खाल्ल्याचे फायदे

डॉ. सलहब यांच्या मते, सफरचंदांमध्ये फायदेशीर पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला अनेक संरक्षणात्मक फायदे देतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासानुसार सफरचंदात असणारे फेनोलिक्स आणि पेक्टिन लिव्हरला सुस्थितीत ठेवतात. तसेच, सफरचंदामध्ये आढळणारे फ्लोरेटिन हे संयुग कर्करोगाच्या पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवते.

ताजे सफरचंद सालीसह खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल (LDL-C) कमी होऊन, हृदयरोगाचा धोका कमी होतो. त्यातील फायबर वजन कमी करण्यास मदत करते आणि पचनसंस्थादेखील सुधारते. सफरचंदातील नैसर्गिक साखर शरीराला ऊर्जा प्रदान करते आणि त्वचा व केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. म्हणूनच तज्ज्ञांचा सल्ला आहे की, दिवसातून दोन सफरचंदे खाल्ल्याने एकूण आरोग्य सुधारते.

ब्रेकफास्टसाठी सफरचंदाच्या तीन हेल्दी रेसिपीज

१. अॅपल-पीनट बटर सॅलड

ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे. सफरचंदाचे तुकडे करा आणि त्यावर पीनट बटर लावा. त्यावर काही काजू आणि चिमूटभर दालचिनी पावडर घाला. ही रेसिपी प्रथिने, फायबर व निरोगी चरबी यांचा उत्तम स्रोत आहे.

२. अॅपल पॅनकेक

नाश्त्यासाठी हा एक परिपूर्ण आरोग्यदायी पदार्थ आहे. गव्हाचे पीठ किंवा बेसन घ्या आणि त्यात किसलेले सफरचंद मिसळा. नंतर दूध, गूळ व थोडी वेलची पावडर घाला. हे मिश्रण गरम तव्यावर ठेवा आणि पॅनकेकसारखे शिजवा. हा नाश्ता चविष्ट आणि पौष्टिक आहे.

३. अॅपल सिनेमन ओट्स

ओट्स दुधात शिजवा आणि त्यात दोन चिरलेली सफरचंदाचे तुकडे घाला. त्यावर थोडी दालचिनी पावडर टाका आणि गोड चवीसाठी थोडे मध किंवा मेपल सिरप मिसळा. हे ओट्स गरमागरम सर्व्ह करा.

दररोज दोन सफरचंदे खाल्ल्याने केवळ आरोग्यच सुधारतेच पण दिवसाची सुरुवातही ऊर्जा व ताजेपणाने होते. त्यामुळे उद्यापासून आपल्या ब्रेकफास्टमध्ये या हेल्दी सफरचंद रेसिपीज नक्की ट्राय करून पाहा.