लेप्टो आणि गॅस्ट्रोचा धोका

अतिवृष्टीदरम्यान साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते.

अनेक ठिकाणी निर्माण झालेली पूरस्थिती आणि दूषित पाणी यांमुळे मोठय़ा प्रमाणात लेप्टोस्पायरोसिस आणि गॅस्ट्रो यांसारख्या पावसाळी आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा वेळीच या आजाराचे निदान आणि उपचार होण्यासाठी याची प्राथमिक माहिती समजून घेणे गरजेचे आहे.

गेल्या काही दिवसांत धोधो कोसळणाऱ्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले गेले. पूरस्थिती आलेल्या ठिकाणी तर पाण्यासोबत आलेला कचरा, गाळाचाही थर जमा झालेला आहे. अशा दूषित पाण्यात तासन्तास चालणाऱ्या किंवा अडकून पडलेल्या लोकांना लेप्टोची लागण होण्याचा संभव आहे.

लेप्टोस्पायरिसिस

अतिवृष्टीदरम्यान साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस या रोगाचे ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतूचा प्रादुर्भाव असू शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या लघवीद्वारे (मूत्रातून) लेप्टोचे सूक्ष्मजंतू पावसाच्या पाण्यात मिसळतात. अशा बाधित झालेल्या पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल अथवा साधे खरचटलेले जरी असेल, तरी अशा छोटय़ा जखमेतूनही लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा साचलेल्या पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार घेणे गरजेचे आहे.

लक्षणे : अचानक भरपूर ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी,थंडी वाजणे, उलटय़ा होणे, स्नायू दुखणे इत्यादी लक्षणे दिसून आल्यावर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही लक्षणे साधी असली तरी वेळेत उपचार न घेतल्यास हा आजार जीवघेणाही ठरू शकतो.

गॅस्ट्रोएन्टरायटिस

गॅस्ट्रो म्हणजे पोट आणि आतडय़ांना सूज येणे. आजार दूषित पाणी व उघडय़ावरील अन्नपदार्थातून पसरतो. हा आजार इतर विषाणूजन्य आजारांप्रमाणे साधा वाटत असला तरी याचा परिणाम रुग्णाच्या रोगप्रतिकारकशक्तीवर होतो.

लक्षणे

सुरुवातीच्या काळात पोटात मुरडा येतो, उलटय़ा आणि जुलाब होतात. दूषित पाणी वा अस्वच्छ अन्न पोटात गेल्यानंतर पुढील १२ ते ७२ तासांमध्येच हा त्रास सुरू होतो. काही रुग्णांमध्ये याची लक्षणे तीव्र असतात. अगदी दिवसाला २० ते ३० उलटय़ा आणि त्याच प्रमाणात जुलाब होतात. अनेकदा उलटय़ा, जुलाब यांबरोबरच ताप येणे, अंगदुखी अशी लक्षणेही दिसून येतात. ‘कॉलरा’ आणि ‘शिगेलोसिस’ हे गॅस्ट्रोएन्टरायटिसचेच प्रकार आहेत.

कॉलरामध्ये अगदी भाताच्या पाण्यासारखे पांढरे पातळ जुलाब होतात. ‘शिगेलोसिस’मध्ये शौचावाटे रक्त पडते.

तात्काळ औषधोपचार आवश्यक

आजाराचे निदान झाल्यानंतर घाबरून न जाता तात्काळ औषधोपचार सुरू करावेत. शारीरिक अवस्थेनुसार आवश्यकता भासल्यास रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे. औषधोपचार सुरू असतानाच रुग्णाचे जेवण आणि पाण्याच्या सेवनाकडे नातेवाईकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा डोस पूर्ण करणे. बहुतांश वेळा रुग्ण ताप किंवा अन्य त्रास बरे झाले की औषधे घेणे बंद करतात. त्यामुळे मग दाद न देणारा तापही होण्याची शक्यता असते.

धोका टाळण्यासाठी..

पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने डेंग्यू, हिवताप आणि लेप्टोस्पायरोसिस या तीन आजारांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होत असतो. या तिन्ही आजारांमध्ये शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रक्तस्राव होणे, थुंकीतून रक्त पडणे, लघवी किंवा विष्ठेमधून रक्त पडणे, अंगावर लाल चट्टे येणे ही लक्षणे दिसून येतात. साधारणपणे मानवी शरीरामध्ये अडीच ते साडेतीन लाख प्लेटलेट्स असतात. या पेशी एक लाखांपेक्षा कमी झाल्या असतील, तर काळजी घेणे आवश्यक असते मात्र धोकादायक नसते. प्लेटलेट्सची संख्या २० हजारांहून कमी झाल्यास मात्र धोक्याचे लक्षण आहे.

ताप अंगावर काढणे, वेळेत औषधोपचार न घेणे यांमुळे आजारांची तीव्रता वाढते. याव्यतिरिक्त अति कमी झालेला रक्तदाब, फुप्फुसामध्ये निर्माण झालेले पाणी, मेंदूतील किंवा इतर महत्त्वाच्या अवयवांतील रक्तस्राव, मूत्रपिंड किंवा यकृत निकामी झाल्याने होणारे दुष्परिणाम यांमुळेही मृत्यू ओढवू शकतात. मात्र वेळेत तज्ज्ञांकडे नेऊन उपचार  केल्यास हा धोका टाळणे शक्य आहे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Danger of lepto and gastro ssh

ताज्या बातम्या