अमेरिकेतील इंडियानापोलिस येथे एका विचित्र घटनेत डेव्हिड चार्ल्स या एकवीस वर्षांच्या युवकाने इंडियाना मेडिकल हिस्टरी म्युझियम या संस्थेत घुसून मेंदूच्या ऊती साठवलेल्या बरण्या चोरल्या व त्याने हे मेंदू चक्क ऑनलाइन विकले. अर्थात, यात केवळ माणसाच्याच नाही तर इतर प्राण्यांच्या मेंदूंचाही समावेश आहे. जे मनोरुग्ण असतात किंवा मेंदूच्या रोगांनी ग्रस्त असतात, त्यांच्या मेंदूचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्यापैकी काहींचे मेंदू मृत्यूनंतर नमुन्यादाखल फॉर्मलिनच्या द्रावणात साठवून ठेवतात. या उद्देशानेच ही संस्था १६८ वर्षांपूर्वी स्थापन झाली, तेथे आधी सेंटर स्टेट हॉस्पिटल होते. १८९० ते १९४० या काळात तेथे अनेक मृतांचे शवविच्छेदन झाले. त्यातील अनेक मानवी अवयव तेथे साठवून ठेवले आहेत. या महाभागाने मेंदूंची ऑनलाईन विक्री सुरू केल्याचे पहिल्यांदा कॅलिफोर्नियातून कळले, कारण त्याने मेंदूच्या सहा बरण्या विक्रीस ठेवल्या होत्या. कॅलिफमधील सँदियागो येथे एकाने या मेंदूच्या सहाही बरण्या विकत घेतल्या. त्याही ६०० डॉलरमध्ये व शिपिंगचा ७० डॉलर खर्च वेगळा. या महाभागाने २०१३ मध्ये एकदा नव्हे सहा वेळा या संग्रहालयात चोररी केली. त्याच्याकडे  मेंदू साठवलेल्या आणखी ६० बरण्या सापडल्या आहेत. या संग्रहालयाच्या कार्यकारी संचालक असलेल्या एलन हेनेसी नॉटेज यांना हा सगळा प्रकार अस्वस्थ करणारा वाटला, ते साहजिक आहे. त्याच्याकडे एकूण जे अवयव सापडले त्यांची किंमत ५३९० डॉलरच्या घरात आहे. विशेष म्हणजे चार्ल्सच्या फेसबुक अकाऊंटवरही या मेंदूच्या बरण्यांची छायाचित्रे आहेत. इंडियानापोलिस येथील हे संग्रहालय हा खरेतर वैद्यकशास्त्रासाठी अमूल्य ठेवा आहे. कारण त्याच्या माध्यमातून वैद्यकाचा एक जिवंत इतिहास उभा राहतो. मेंदू चोरण्याची ही घटना पैशाच्या लालसेतून झाली असेल, पण कुतूहलापोटी जगातील सर्वात बुद्धिमान वैज्ञानिक मानल्या गेलेल्या अल्बर्ट आइनस्टाइन याचाही मेंदू चोरीस गेला होता बरं का.. आइनस्टाइन निवर्तला तेव्हा प्रिन्सटन येथील रोगनिदानतज्ज्ञ थॉमस हार्वे यांनी त्याचे शवविच्छेदन केले. पण गंमत अशी, की त्याने आइनस्टाइनचा मेंदू काढून घेतला व त्याचा देह शिवून टाकला, ही बाब नंतर लगेच उघडकीस आली व हार्वे यांना नोकरी गमवावी लागली. हार्वे याने आइनस्टाइनचा मेंदू काढून तो चक्क स्वत:च्या घरी फॉर्मल्डीहाईडच्या द्रावणात ठेवून दिला होता, नंतर त्याने जगातील अनेक मेंदूरोगतज्ज्ञांना पुढील चाळीस वर्षे आइनस्टाइनच्या मेंदूचे तुकडे पुरवले, हार्वे म्हणाला, की आइनस्टाइनचा मेंदू चोरणे हे माझे वैज्ञानिक कर्तव्य होते, ते मी केले. हार्वे याने नंतर आइनस्टाइनच्या मेंदूचे तुकडे त्याच्या मुलीला परत देण्याची तयारी दर्शवली, पण तिला ते नको होते. त्यामुळे नंतर आइनस्टाइनच्या मेंदूचे जे अवशेष उरले होते ते पुन्हा प्रिन्सटन विद्यापीठाकडे देण्यात आले.