यूएस नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ या संस्थेच्या वैज्ञानिकांनी डेंग्यूवर लस तयार केली असून, त्यामुळे डेंग्यूच्या विषाणूंपासून संरक्षण मिळाले आहे. ही लस २०१८ पासून व्यावसायिक वापरात येणार आहे. ही लस तयार करताना जो दृष्टिकोन ठेवला आहे त्यामुळे झिका विषाणूवर लस शोधणेही सोपे होणार आहे. कारण एकाच प्रवर्गातील विषाणूंमुळे व डासांमुळे हे रोग पसरतात. ब्राझीलमध्ये झिकाचा प्रसार जास्त असून, अमेरिकेतही रुग्ण वाढत आहेत.
डेंग्यूवर शोधलेल्या टीव्ही ००३ लसीचा वापर काही स्वयंसेवकांवर करण्यात आला. त्यांना सहा महिने आधी डेंग्यूचा विषाणू टोचण्यात आला होता. सर्व २१ जणांना लस देण्यात आली असता त्यांचे डेंग्यूपासून संरक्षण झाले. बाकीच्यांना डेंग्यूची लागण झाली. त्यात ८० टक्के लोकांच्या त्वचेवर लाल चट्टे उमटले व २० टक्के लोकांमध्ये पांढऱ्या रक्तपेशी कमी झाल्या. या लसीची परिणामकारकता चांगली आहे, असे लस संशोधक असलेल्या जॉन हापकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या बाल्टिमोरच्या संस्थेच्या डॉ. अॅना डर्बिन यांनी सांगितले.
डेंग्यू हा जगात दरवर्षी १२० देशांतील ४० कोटी लोकांना होतो, पण त्यात २० लाख लोकांना ताप येतो व दरवर्षी २५ हजार लोक मरतात. लसीमुळे डेंग्यूचे नियंत्रण शक्य आहे, असे एनआयएचचे विषाणूतज्ज्ञ स्टीफन व्हाइटहेड यांनी सांगितले. आताची लस चार विषाणू प्रजातींपासून तयार केली आहे व त्यात डेंग्यू २ विषाणूचे सुधारित रूप वापरले आहे. ब्राझीलमध्ये चांगला परिणाम दिसला तर ही लस व्यावसायिक पातळीवर आणण्याचा बुटानन इन्स्टिटय़ूटचा विचार आहे. सध्या डेंग्यूवर सॅनोफी पाश्चर संस्थेची लस उपलब्ध असून, त्याला मेक्सिकोत परवानगी दिली आहे. या लसीचे नाव डेंगव्हॅक्सिया असे आहे.
९ ते ४५ वयोगटांतील लोकांना ही लस दिली जाते. पर्यटकांना ती दिली जात नाही. भारतात सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया पॅनाशिया बायोटेक यांना या लसीबाबत विशिष्ट अटीनुसार अधिकार आहेत. टान्सलेशनल मेडिसिन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2016 रोजी प्रकाशित
डेंग्यूवर लसीच्या चाचण्या यशस्वी
डेंग्यूच्या विषाणूंपासून संरक्षण मिळाले आहे. ही लस २०१८ पासून व्यावसायिक वापरात येणार आहे

First published on: 30-03-2016 at 01:16 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue vaccine proves 100 percent effective in human trials