Morning Habits For Blood Sugar Control: भारतातील अनेक जण हे मधुमेहग्रस्त आहेत. मधुमेह (Diabetes) हा जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढणारा आजार आहे. दुर्दैवाने यावर कोणताही इलाज नाही. एकदा का मधुमेहाची लागण झाली तर तुम्हाला त्याच्यासोबतच जगावं लागतं. मधुमेह असलेल्या लोकांना विशेषत: उच्च किंवा कमी रक्तातील साखरेचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, अयोग्य वेळा आणि शारीरिक कष्टाचा अभाव; यामुळे मधुमेहासारखे आजार मागे लागतात. मात्र, डायबेटीसवर नियंत्रण ठेवल्यास चांगले जीवन जगता येते.
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत मधुमेह आणि रक्तातील साखरेचं असंतुलन ही सामान्य समस्या बनली आहे. बरेच लोक यावर फक्त औषधांवर अवलंबून राहतात, पण खरं सांगायचं झालं तर तुमच्या सकाळच्या काही छोट्या सवयीच तुमच्या रक्तातील साखरेला (Blood Sugar) नैसर्गिकरीत्या नियंत्रित ठेवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, सकाळची वेळ ही दिवसातील सर्वात महत्त्वाची असते. या वेळेत केलेल्या छोट्या-छोट्या बदलांचा तुमच्या इन्सुलिन, हार्मोन्स, मेटाबॉलिझम आणि ऊर्जेवर थेट परिणाम होतो. आता पाहूया या सकाळच्या नऊ सवयी, ज्या रक्तातील साखरेचं नियंत्रण राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात:
सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ९ गोष्टी; ब्लड शुगर राहील नैसर्गिकरीत्या नियंत्रणात!
१. दिवसाची सुरुवात पाण्याने करा – उठल्या उठल्या एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात आणि साखर नियंत्रित राहते.
२. प्रथिनेयुक्त नाश्ता करा – रिकाम्या पोटी साखरेचं प्रमाण जास्त असलेला नाश्ता टाळा. त्याऐवजी अंडी, ग्रीक योगर्ट किंवा प्रथिनंयुक्त आहार घ्या.
३. हलकी हालचाल किंवा व्यायाम – सकाळी १० मिनिट चालणं, योगा किंवा स्ट्रेचिंग यामुळे स्नायूंना ऊर्जा मिळते आणि रक्तातील साखरेत अचानक वाढ होत नाही.
४. रिकाम्या पोटी कॅफिन टाळा – नाश्ता करण्याआधी कॉफी घेतल्याने कॉर्टिसॉल हार्मोन वाढतो व इन्सुलिन रेझिस्टन्स होऊ शकतो, त्यामुळे कॉफीऐवजी ग्रीन टी किंवा हर्बल टी योग्य.
५. ध्यान व श्वसन – सकाळच्या तणावामुळेही साखरेवर परिणाम होतो. ५ मिनिटं ध्यान, डीप ब्रीदिंग किंवा ग्रॅटिट्यूड जर्नलिंग करा.
६. ॲपल सायडर व्हिनेगर – नाश्त्यापूर्वी एक ग्लास पाण्यात टाकलेला एक चमचा व्हिनेगर इन्सुलिन संवेदनशीलता वाढवतो.
७.साखरेची तपासणी करा – डायबेटीस असणाऱ्यांनी सकाळी उपाशीपोटी शुगर तपासल्याने दिवसभराचा आहार ठरवणं सोपं जातं.
८. नियमित वेळेवर जेवण – नाश्ता व इतर आहार निश्चित वेळेत केल्याने इन्सुलिनचा पॅटर्न व्यवस्थित राहतो.
९. दालचिनी किंवा मेथीचा वापर – या नैसर्गिक मसाल्यांनी रक्तातील साखरेचं नियंत्रण सुधारतं. सकाळच्या आहारात त्यांचा समावेश करा.
थोडक्यात, औषधं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबरच जर तुम्ही या नऊ सोप्या सकाळच्या सवयी अंगीकारल्या तर रक्तातील साखर नैसर्गिकरीत्या नियंत्रित राहू शकते आणि त्यामुळे तुमचा दिवस ऊर्जेने भरलेला जाईल.