Diabetes Early Symptoms: डायबिटीस हा एक ‘सायलेंट किलर’ म्हणजे शांतपणे शरीराला नुकसान करणारा आजार आहे. हा आजार शरीराच्या आतल्या भागांवर हळूहळू वाईट परिणाम करतो. तो फक्त हृदय, किडनी आणि फुप्फुसांवरच नाही, तर डोळ्यांवरही मोठा परिणाम करतो.

ब्लड शुगर खूप दिवस जास्त राहिली तर डोळ्यांच्या नसांवर ताण येतो, त्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथी, ग्लूकोमा आणि मोतीबिंदू अशा समस्या होऊ शकतात.

काही वेळा रुग्णांना धूसर दिसणे, दोन-दोन प्रतिमा दिसणे, डोळ्यांसमोर तरंगासारखे दिसणे, डोळ्यांत दाब जाणवणे किंवा रात्री दिसण्यात अडचण अशी सुरुवातीची लक्षणं दिसतात. पण, हे संकेत दुर्लक्षित केले जातात. अशी बेपर्वाई पुढे जाऊन कायमस्वरूपी डोळ्यांचे नुकसान करू शकते.

हेल्थलाइनच्या मते, डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी फक्त औषधांवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. संतुलित आहार खूप महत्त्वाचा आहे – म्हणजे कमी ग्लायसेमिक फूड्स, भरपूर फायबर, प्रोटीन आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. यासोबत नियमित व्यायामही महत्त्वाचा आहे. जसे की वेगाने चालणे, योग करणे किंवा हलका व्यायाम- हे सगळे ब्लड शुगर नियंत्रित ठेवायला मदत करतात. ताण (स्ट्रेस) देखील ब्लड शुगर वाढवतो, त्यामुळे ध्यान, खोल श्वासाचे व्यायाम आणि पुरेशी झोप घेणेही तितकेच जरूरी आहे.

डायबिटीस असलेल्या लोकांसाठी वेळोवेळी डोळ्यांची तपासणी आणि हेल्थ चेकअप करणे खूप गरजेचे आहे. लक्षणे वेळेत ओळखून आणि जीवनशैलीत बदल करून डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवता येतो आणि शरीराला होणारे नुकसानही कमी करता येते.

ब्लड शुगर जास्त झाल्यावर डोळ्यांमध्ये काही लक्षणे दिसू लागतात, त्यामुळे ती सुरुवातीला ओळखणे महत्त्वाचे आहे. चला तर मग पाहूया, ब्लड शुगर वाढल्यावर डोळ्यांमध्ये कोणती लक्षणे दिसू शकतात.

अंधूक दृष्टी

ब्लड शुगर कधी वाढणे-कधी कमी होणे यामुळे डोळ्यांच्या लेन्समध्ये सूज येऊ शकते, त्यामुळे लेन्सचा आकार बदलतो आणि वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. अनेक लोक हे चष्म्याचा नंबर बदलण्याचे लक्षण समजतात, पण हे डायबिटीसचे सुरुवातीचे चिन्ह असू शकते.

दृष्टी धूसर होणे

कधी स्पष्ट दिसणे तर कधी धूसर दिसणे, असे वारंवार होत असेल तर याचा अर्थ रक्तातील साखर डोळ्यांच्या फोकस करण्याच्या क्षमतेवर परिणाम करत आहे. हे प्रीडायबिटीस किंवा सुरुवातीच्या डायबिटीसचे लक्षण असू शकते.

डोळ्यांपुढे तरंगणारे डाग आणि चमक दिसणे

जर अचानक काळे डाग, चमक किंवा तरंगणारे डाग दिसायला लागले तर हे डायबेटिक रेटिनोपॅथीचे लक्षण असू शकते. जास्त ब्लड शुगरमुळे रेटिनातील लहान रक्तवाहिन्या कमजोर होऊन त्यातून रक्त येऊ लागते. वेळेत उपचार न मिळाल्यास ही समस्या अंधत्वापर्यंत जाऊ शकते.

डोळ्यांत अस्वस्थ वाटणे

डायबिटीसमुळे ग्लूकोमाचा धोका वाढतो. यात डोळ्यांचं प्रेशर वाढतं, त्यामुळे डोळे दुखणे, लाल होणे अशी समस्या होतात. ग्लूकोमा हळूहळू ऑप्टिक नस खराब करतो आणि नंतर दृष्टीही जाऊ शकते.

रात्री नीट न दिसणे

जास्त ब्लड शुगरमुळे रेटिनातील प्रकाश ओळखणाऱ्या पेशींना नुकसान होते, त्यामुळे रात्री किंवा कमी प्रकाशात पाहायला त्रास होतो. हे लक्षण अनेकदा दुर्लक्षित केले जाते.

डोळ्यांच्या आसपासच्या जखमा बऱ्या होण्यास उशीर होणे

डायबिटीसमुळे रक्तप्रवाह मंद होतो, त्यामुळे इन्फेक्शन आणि डोळ्यांभोवतीची सूज लवकर बरी होत नाही. हेही वाढलेल्या ब्लड शुगरचे लक्षण असू शकते.