Diet For Fatty Liver Repair : फॅटी लिव्हर आजार हा आजच्या धावपळीच्या जीवनशैलीतील एक सामान्य पण धोकादायक आजार बनला आहे, ज्याची मुख्य कारणे म्हणजे खराब आहार आणि असंतुलित जीवनशैली आणि शारीरिक हालचालींचा अभाव. हा आजार फक्त मद्यपी किंवा लठ्ठ लोकांपुरताच मर्यादित राहिलेला नाही तर हल्ली कोणालाही फॅटी लिव्हरचा त्रास असल्याचे आढळून येते.
चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे लिव्हरमध्ये चरबी साचते. ही स्थिती पुढे जाऊन लिव्हर खराब होण्यास कारणीभूत ठरते. पण, काळजी करण्याचे कारण नाही, कारण आहारात छोटे बदल करून तुम्ही ९० दिवसांत फॅटी लिव्हरची स्थिती हळूहळू उलटवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या रोजच्या सवयींमध्ये पाच महत्त्वाचे बदल करावे लागतील.
१) साखरेचे सेवन नियंत्रित करा
हेल्थलाइनच्या मते, जर तुम्हाला लिव्हरमधील फॅट नियंत्रित करायचे असेल तर साखरेचे सेवन कमी करा. वजन कमी असले तरीही फ्रुक्टोजसारखी साखर थेट लिव्हरमध्ये फॅट म्हणून जमा होते. पॅक केलेले ज्यूस, फ्लेवर्ड दही, एनर्जी बार आणि हेल्दी सिरपचे सेवन केल्याने शरीरात साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळे दररोज फळांचे रस, डाएट सोडा आणि प्रक्रिया केलेले स्नॅक्स खाणे टाळा. त्याऐवजी, फायबर युक्त फळं खाणं हे लिव्हरसाठी एक चांगला पर्याय आहे.
२) फायबरयुक्त पदार्थांचे सेवन
uchicagomedicine च्या मते, जर तुम्हाला फॅटी लिव्हरचा त्रास कमी करायचा असेल कर वजन कमी करा. आहारात आवश्यक पोषक तत्वांचा समावेश करा आणि जीवनशैलीत चांगले बदल करा. फॅटी लिव्हरचा त्रास कमी करण्यासाठी फायबरचे सेवन प्रभावी ठरते. फायबरयुक्त पदार्थ्यांच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. इन्सुलिन रेजिस्टेंस वाढते, पोटफुगीचा त्रास कमी होतो आणि शरीरातील अतिरिक्त हार्मोन्स काढून टाकण्यास मदत होते.
फॅटी लिव्हरचा त्रास कमी करण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ महत्त्वाचे आहेत. तुमच्या आहारात जवस, चिया सीड्स, चणे, मसूर आणि ब्रोकोलीसारख्या भाज्यांचा समावेश करा. हे पदार्थ केवळ पोटासाठी चांगले नाहीत तर ते लिव्हरसाठीही अतिशय चांगले आहेत.
३) ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे सेवन वाढवा
फॅटी लिव्हर म्हणजे सर्व फॅट्स टाळणे असे नाही. जर तुम्हाला लिव्हर फॅट नियंत्रित करायचे असेल तर ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे सेवन करा. हे फॅट्स जळजळ कमी करतात आणि लिव्हरमध्ये चरबी जमा होण्यास प्रतिबंध करतात. तुमच्या आहारात फॅटी फिश, फ्लेक्ससीड ऑइल आणि अक्रोड यांचा समावेश करा.
४) धान्याचा समावेश करा
जर तुम्ही फॅटी लिव्हरने त्रस्त असाल तर प्रक्रिया केलेल्या धान्यांऐवजी तुमच्या आहारात नैसर्गिकरित्या पिकवलेल्या धान्यांचा समावेश करा. ज्यात होल व्हीट ब्रेड, ब्राऊन राईस, ओट्स, होल व्हीट पास्ता आणि क्विनोआ यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. हे फायबरयुक्त पदार्थ रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.
५) रात्री उशिरा जेवू नका
रात्री उशिरा जेवल्याने वजन वाढतेच, पण लिव्हरवरही त्याचा परिणाम होतो. जेव्हा लिव्हर पचनक्रियेत व्यस्त नसते तेव्हा ते स्वतःची दुरुस्ती करत असते. रात्री उशिरा जेवल्याने ही उपचार प्रक्रिया विस्कळीत होते आणि लिव्हरमध्ये फॅट वाढतात. झोपण्यापूर्वी किमान २-३ तास आधी जेवणं गरजेचे आहे, जेणेकरून लिव्हरमध्ये साठवलेले फॅट्स कमी करण्यावर लक्ष केंद्रित करता येते.