Clean Stomach Digestion: आजकालच्या धावपळीच्या जीवनात आरोग्यपूर्ण आणि सुदृढ राहण्यासाठी आहाराचे खूप महत्त्व आहे. अनेकदा लोकांना वाटतं की, पोट भरलं की झालं; पण खरं तर आपण काय खातो याचा परिणाम आपल्या विचार, भावना आणि आरोग्य यांवर होतो. नाश्ता, दुपारचं किंवा रात्रीचं जेवण फक्त वेळेवर केलं म्हणून उपयोग नाही, तर ते किती आरोग्यदायी आणि पौष्टिक आहे हेही महत्त्वाचं आहे. अन्न आपल्याला ऊर्जा देतं. तरीही अनेक लोकांना पोटभर जेवल्यावरसुद्धा थकवा जाणवतो किंवा पचनाशी संबंधित त्रास होतो.
आहारतज्ज्ञ लवलीन कौर म्हणाल्या की, आपण अनेकदा नकळत रोज काही चुका करतो, ज्यामुळे पचनासह इतर अनेक समस्या होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, जर अन्नातून पूर्ण पोषण, ताकद व आरोग्यदायी जीवन हवं असेल, तर आहार योग्य पद्धतीनं घ्यायला सुरुवात केली पाहिजे. पण, अनेक लोक जेवताना या ३ चुका करतात, ज्यामुळे अन्नाचे सगळे फायदे वाया जातात.
मनाप्रमाणे जेवणाचा आस्वाद घ्या
कधी कधी आपण खूप तणावात असतो आणि घाईघाईत काहीतरी खाऊन टाकतो. अशा वेळी अन्न पचायला जड जातं. पण जेव्हा आपण शांतपणे आणि लक्ष देऊन खातो, तेव्हा शरीर ते सहज वापरू शकतं. म्हणून जेवणापूर्वी मन शांत करण्याचा प्रयत्न करायला हवा. खोल श्वास घेतल्यानं मन शांत होतं आणि अन्न अधिक पौष्टिक ठरतं. विज्ञानदेखील सांगतं की, तणाव कमी झाला, तर पचनक्रिया चांगली होते.
भुकेच्या संकेतांकडे लक्ष द्या
हे समजून घ्यायला हवं की, खरंच शरीराला भूक लागली आहे का? जर भूक नसताना आपण सवयीने खात असू, तर ते शरीरात चरबीच्या स्वरूपात साठू शकतं. कधी थोडंसं खाणंही पुरेसं असतं, तर कधी थोडं जास्त खाणं गरजेचं असतं. ही समज नसेल, तर चांगलं आरोग्य राखणं कठीण जातं. कारण- भूक नसताना खाल्ल्यामुळे नको असणारं वजन वाढू शकतं. म्हणूनच चांगलं पचन होऊन अन्न शरीरात व्यवस्थित शोषलं जावं यासाठी शरीराच्या भुकेच्या संकेतांकडे लक्ष द्या.
अन्नाबद्दल तक्रार करणं थांबवा
आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण नकळत जेवताना तक्रार करतो. भाजीमध्ये मीठ जास्त आहे, भाजी आवडत नाही किंवा तेल जास्त आहे, असं आपण म्हणतो. या नकारात्मक भावना खरं तर आपल्या शरीरावर परिणाम करतात. त्याऐवजी आपल्या ताटात जे आहे, त्याबद्दल आभार मानलं, तर तेच अन्न शरीरावर चांगलं परिणाम करतं. आपल्या परंपरेतही असं मानलं जातं की, मनापासून जेवलं, तर अन्न औषधासारखं काम करतं.
वेळेवर जेवा आणि शरीराच्या संकेतांकडे लक्ष द्या
वेळेवर जेवण महत्त्वाचं आहे; पण ते शरीराच्या नैसर्गिक संकेतांच्या विरुद्ध नसावं. रात्री उशिरा जेवल्यानं पचनावर ताण येतो आणि झोपेची गुणवत्ता कमी होते. तसंच सकाळी खूप उशिरा जेवलं, तर थकवा येऊन ऊर्जा कमी जाणवू शकते. म्हणून शरीर काय सांगतंय याकडे लक्ष देऊन वेळेवर आणि संतुलित पद्धतीनं जेवणं गरजेचं आहे.