स्वयंपाकघरातील अनेक पदार्थ आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात. मसाल्याच्या पदार्थांचे तर आरोग्यासाठी अनेक उपयोग आहेत. भारतीय पदार्थांमध्ये वापरण्यात येणारी वेलची आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. गोड पदार्थांमध्ये तर आवर्जून वेलची वापरलीच जाते. यामुळे पदार्थाला केवळ स्वादच येत नाही तर शरीराच्या विविध तक्रारींवरील उत्तम उपाय म्हणून त्याचा वापर होतो. अन्नपचन चांगले होण्यासाठी वेलची अतिशय उपयुक्त असते. तोंडाला वास येत असेल तर तो जाण्यासाठीही वेलची उपयुक्त ठरते. याशिवाय वेलचीमध्ये खनिजे आणि व्हीटॅमिन्सचे प्रमाणही जास्त असल्याने आरोग्यासाठी तिचा आहारातील वापर चांगला असतो. वेलचीचे पाणी पिणे हा आरोग्याच्या अनेक तक्रारींवर एक उत्तम उपाय आहे.
वेलचीचे पाणी कसे तयार करावे
वेलचीची पूड करा. ही पूड पाण्यात एकत्र करा. यामध्ये काही लवंगा घाला. हे पाणी काही प्रमाणात उकळा. मात्र जास्त उकळले जाणार नाही याची काळजी घ्या. जास्त उकळले गेल्यास त्याचा मूळ स्वाद जाऊन पाणी कडवट होऊ शकते. हे पाणी थंड झाल्यावर तीन चमचे मिश्रण साध्या पाण्यामध्ये घालून ते पाणी प्यावे.
पाहूयात काय आहेत वेलचीचे पाणी पिण्याचे फायदे…
पचनासाठी उपयुक्त
पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी वेलचीचे पाणी अतिशय उपयुक्त असते. पोटाच्या विविध तक्रारींवरील उत्तम उपाय म्हणून वेलचीचे पाणी प्यावे. बद्धकोष्ठता, गॅसेस आणि अॅसिडीटीवरील उत्तम उपाय म्हणूनही वेलचीचे पाणी उपयुक्त असते.
शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्यासाठी उपयुक्त
शरीरात असणारे अनावश्यक घटक बाहेर टाकण्यासाठी वेलचीचे पाणी उपयुक्त असते. यामुळे शरीरातील खराब घटक बाहेर टाकण्यास किडणीला मदत होते.
दातांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त
वेलची दातांच्या समस्येवर उपयुक्त असते. अनेक माऊथ फ्रेशनर्स आणि टुथपेस्टमध्येही वेलचीचा समावेश असतो. जीवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गांशी सामना करण्यासाठी वेलची एक उत्तम औषध म्हणून काम करते. तोंडाला होणारे अल्सर आणि घशाच्या संसर्गांवरही वेलचीचे पाणी पिणे उपयुक्त ठरते.
प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत
वेलचीचे पाणी ठराविक काळ नियमित प्यायल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. अनेकांना वारंवार घशाचा संसर्ग होतो. त्यांनाही वेलचीच्या पाण्याचा फायदा होतो. ब्राँकायटीसवरही वेलचीचे पाणी उपयुक्त असते.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)