Dussehra Shopping Benefits: २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी अश्विन महिन्याच्या दशमी तिथीला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. दसरा हा विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो, त्यामुळे अनेकजण या शुभदिनी नवीन वस्तू खरेदी करतात, तसेच नव्या कामाची सुरुवातदेखील करतात. शिवाय या दिवशी सोनं खरेदी करणंदेखील खूप शुभ मानले जाते.

दसऱ्याला सोने का खरेदी करावे?

दसऱ्याला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असं म्हणतात, या दिवशी सोने खरेदी केल्याने संपूर्ण वर्ष सुखमय जाते. तसेच संपूर्ण वर्ष सोने खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात धन, संपत्ती, सुख-समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार दसऱ्यालाला अनेक शुभ योग निर्माण होतात. या दिवशी ग्रह शुभ स्थितीत असतात, त्यामुळे या दिवशी सोने खरेदी आवर्जून करावे. शिवाय दसऱ्याच्या आधी महानवमीलादेखील तुम्ही सोनं खरेदी करू शकता. परंतु, आता सोन्याचे वाढते दर बघता प्रत्येकजण सोनं खरेदी करू शकत नाही. अशावेळी तुम्ही स्वस्तात मस्त अशा दुसऱ्या गोष्टीही खरेदी करू शकता.

सोन्याऐवजी ‘या’ वस्तू खरेदी करा

चांदी

ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र या ग्रहांबरोबर असतो. दसऱ्याला चांदी खरेदी करणेदेखील शुभ मानले जाते, त्यामुळे या दिवशी आयुष्यात सुख, सौभाग्य प्राप्त करण्यासाठी तुम्ही चांदीच्या वस्तू खरेदी करू शकता. यात तुम्ही चांदीची नाणी, चांदीचे दागिने खरेदी करू शकता.

तांबे/पितळ

ज्योतिषशास्त्रानुसार तांब्याचा संबंध सूर्य आणि पितळेचा संबंध गुरु ग्रहाशी जोडलेला आहे. दसऱ्याला तांबे/पितळेची देव पूजेत लागणारी भांडी खरेदी करणेदेखील शुभ मानले जाते, यामुळे आयुष्यात सुख, समृद्धी प्राप्त होते.

गाडी

जर तुम्ही अनेक दिवसांपासून गाडी घेण्याचे स्वप्न पहात असाल तर दसऱ्याचा दिवस नवीन गाडी खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

शमीचे रोप

शमीच्या झाडामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, शिवाय या झाडाला धार्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. नवमीला किंवा दसऱ्याला हे रोप खरेदी केल्याने आयुष्यातील दारिद्र्यता दूर होते.

कामधेनु गाईची मूर्ती

दसऱ्याला तुम्ही कामधेनु गाईची मूर्तीदेखील घरात आणू शकता. कामधेनु गाय समुद्र मंथनातून बाहेर आलेल्या १४ रत्नांपैकी एक आहे, त्यामुळे या गाईची मूर्ती दसऱ्याच्या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं. शिवाय ही मूर्ती घरात ठेवल्याने सुख-संपत्तीत वाढ होते.