Eye Care Health Tips: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट या आता केवळ मनोरंजनासाठी राहिलेल्या नसून त्यातून अनेक निर्णय घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित सुद्धा केले जाते. त्यातल्या त्यात फॅशन बाबतचे खरेदीचे सल्ले फॉलो करणं एकवेळ चालून जातं पण आरोग्यविषयक निर्णय घेताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे. आज सुद्धा आपण अशाच एका व्हायरल पोस्टवर डॉक्टरांचे मत जाणून घेणार आहोत. @Indian_veg-diet या पेजवर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टनुसार झोपताना दोन बदाम व थोडी बडीशेप एकत्र करून खाल्ल्यास दृष्टी सुधारण्यास खूप मदत होत असल्याचे म्हटले आहे. दोन बदाम आणि एक चमचा बडीशेप एकत्र खाल्ल्याने काहीच दिवसात दृष्टीत सुधारणा दिसून येऊ शकते असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला होता. याविषयी इंडियन एक्सस्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती दिली आहे.
बडीशेप व बदामाचे फायदे
डॉ. संजीव गुप्ता, संचालक आणि वरिष्ठ नेत्र शल्यचिकित्सक, आय केअर सेंटर, नवी दिल्ली यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, बडीशेप आणि बदाम हे दोन्हीचे पौष्टिक फायदे खूप आहेत. या दोन्ही गोष्टींची डोळ्यांच्या आरोग्यासाठी मदत होऊ शकते, परंतु त्यांचे एकत्र सेवन केल्याने दृष्टी लक्षणीयरीत्या सुधारते असे सूचित करणारे मर्यादित वैज्ञानिक पुरावे आहेत. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाचे पोषकसत्व असते, तर बदाम व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड प्रदान करतात, जे देखील फायदेशीर आहेत,”
व्हिटॅमिन ए रेटिनाचे आरोग्य राखण्यासाठी आणि कमी प्रकाशात दृष्टी सुधारण्यासाठी ओळखले जाते. व्हिटॅमिन ई समृद्ध बदाम, एक अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते जे ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करू शकते. ओमेगा -3 फॅटी ऍसिड्स डोळ्यातील पेशींच्या संरचनेला आधार देऊन डोळ्यांच्या संपूर्ण आरोग्यासाठी योगदान देतात.
मात्र, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की दृष्टी सुधारणे ही अनुवांशिकता, जीवनशैली आणि एकूण आरोग्य यासारख्या विविध घटकांनी प्रभावित होणारी एक प्रक्रिया आहे. बडीशेप आणि बदामांसह संतुलित आहार डोळ्यांच्या आरोग्यास हातभार लावू शकतो. मात्र तुमच्या समस्येला समजून घेऊन त्यानुसार सल्ला घेऊन आहारात व जीवनशैलीत बदल करावेत जेणेकरून दृष्टी राखण्यासाठी व सुधारण्यासाठी मदत होऊ शकते.
हे ही वाचा<< Teeth & Gums: तुमच्या हिरड्यांचा रंग आरोग्याविषयी काय संकेत देतो? गुलाबी, लाल व ‘या’ रंगांचे अर्थ जाणून घ्या
डोळ्यांच्या आरोग्यसाठी पाच मूलभूत नियम
डॉ दिग्विजय सिंग, संचालक, नोबल आय केअर, गुरुग्राम यांनी चांगली दृष्टी राखण्यासाठी पाच मूलभूत नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यानुसार, फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य असलेला समृध्द संतुलित आहार घेणे, निरोगी वजन राखणे, सनग्लासेस लावून आपल्या डोळ्यांचे हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच धुम्रपान टाळणे व कोणत्याही दृष्टी समस्या लवकर शोधण्यासाठी आणि त्यावर उपाय करण्यासाठी नियमित डोळ्यांची तपासणी करणे सुद्धा गरजेचे आहे.