Cauliflower Cleaning Tips: ताज्या भाज्यांची चव न्यारीच असते. फुलकोबी आणि पत्ताकोबीसारख्या भाज्या कित्येकांच्या जेवणात हमखास दिसतात. सर्वांना कोबी आवडते. फुलकोबी असो किंवा पत्ताकोबी या अनेकांच्या आवडत्या भाज्या आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, पावसाळ्याच्या दमट हवामानात या भाज्यांमध्ये अर्धवट नजरेस न पडणारे कीटक, अळ्या किंवा लपलेले सूक्ष्म जीव मोठ्या प्रमाणावर वाढतात? अनेकदा भाज्या स्वच्छ धुतल्या न गेल्यास हे कीटक तुमच्या पोटात पोहोचतात आणि अन्नविषबाधा, पचनाचा त्रास किंवा त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पण, काळजीचं काही कारण नाही. आपल्याकडे काही घरगुती, पारंपरिक उपाय आहेत, जे वापरले, तर या भाज्यांमधून सर्व कीटक बाहेर पडतात.
सर्वांना प्रिय असलेल्या फुलकोबी आणि पत्ताकोबीमुळे सध्या एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. चविष्ट वाटणाऱ्या या भाज्यांच्या आत लपलेले जंत आणि किड्यांमुळे केवळ अपचनच नव्हे, तर ते किडे मेंदूपर्यंत पोहोचण्याचा धोका असल्याची चर्चा सध्या जोरात होत आहे. पावसाळ्यात या भाज्यांमध्ये वाढणाऱ्या सूक्ष्म जंतूंमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञही देत आहेत. हीच भीती इतकी वाढली आहे की, अनेकांनी फुलकोबी आणि कोबी खाणं थांबवलं आहे. पण या सगळ्यामागे अशा कीटकांपासून संरक्षण व्हावं यासाठी काय उपाय करता येतील, हे जाणून घेणं आता अत्यावश्यक झालं आहे. कारण- थोड्याशा बेसावधपणामुळे तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकते.
हे पाच उपाय करा, सर्व किडे आपोआप येतील बाहेर
१. व्हिनेगर वापरा
एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घ्या आणि त्यात एक चमचा पांढरे व्हिनेगर मिसळा. त्यात फुलकोबी किंवा पत्ताकोबी १०-१५ मिनिटे बुडवून ठेवा. हे मिश्रण भाज्यांमधून किडे वा अळ्या सहजपणे बाहेर काढायला मदत करील.
२. गरम पाण्यात मीठ घालून भिजवा
कोबी कापल्यानंतर ती गरम पाण्यात मीठ टाकून भिजवा. १० ते १५ मिनिटांनी तुम्हाला त्यामध्ये किडे आणि मळ दिसू लागेल. त्यानंतर तो कोबी पाण्यातून काढून पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवा.
३. कापताना बारकाईने निरीक्षण करा
फुलकोबी किंवा पत्ताकोबी कापताना त्याचे लहान लहान तुकडे करा आणि प्रत्येक गुच्छाची बारकाईने पाहणी करा. त्यामुळे लपलेले सूक्ष्म किडेसुद्धा तुमच्या नजरेत येतील.
४. बेकिंग सोड्याचा वापर
एका पाण्याच्या भांड्यात १ चमचा बेकिंग सोडा मिसळा आणि त्यात भाज्या १० मिनिटांसाठी भिजवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन वापरा.
५. मायक्रोवेव्हचा पर्याय
कोबी स्वच्छ धुतल्यानंतर तो मायक्रोवेव्हमध्ये १–२ मिनिटांसाठी हलकासा गरम करा. त्यामुळे आतमध्ये लपलेले किडे बाहेर येतील.
सावध राहा
फुलकोबी आणि पत्ताकोबी आरोग्याला फायदेशीर असल्या तरी पावसाळ्यात त्या योग्य प्रकारे न धुतल्यास आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका पोहोचू शकतो. त्यामुळेच या घरगुती उपायांनी तुम्ही भाज्यांमधील सहजपणे सर्व किडे बाहेर काढू शकता आणि भोजनाद्वारे तुमच्या आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घेऊ शकता.