Eating Curry Leaves Daily: कढीपत्ता हा आरोग्यास अत्यंत फायदेशीर असून, आपण आहारात त्याचा आवर्जून समावेश करतो. त्याशिवाय कढीपत्ता केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. कढीपत्त्याचा वापर केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठीच नाही, तर आयुर्वेदिक आणि घरगुती उपचारांमध्येदेखील केला जात आहे. जीवनसत्त्वे ए, बी, सी, कॅल्शियम, लोह व अँटिऑक्सिडंट्ससह त्यांचे पोषक घटक त्यांना एक सुपरफूड बनवतात. त्याशिवाय त्यांच्यात दाहकविरोधी, जीवाणूरोधी आणि मधुमेहविरोधी गुणधर्म आहेत, जे शरीराला आतून मजबूत करतात. अन्नपदार्थांमध्ये आपण कढीपत्त्याचा समावेश करतोच; पण, दररोज उपाशीपोटी कढीपत्त्याची पाने खाणे आपल्या आरोग्यासाठीदेखील खूप फायदेशीर आहे.
उपाशीपोटी कढीपत्त्याची पाने खाण्याचे फायदे
- कढीपत्ता नैसर्गिकरीत्या पाचक एंझाइम्स सक्रिय करतात. सकाळी रिकाम्या पोटी ही पाने खाल्ल्याने तुमची पचनसंस्था दिवसभरासाठी तयार होते. त्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता व पोटफुगीपासूनदेखील आराम मिळू शकतो.
- कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अल्कलॉइड असतात, जे शरीराला आतून स्वच्छ करण्यास आणि अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात.
- कढीपत्त्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे केसांच्या आरोग्यावर होणारा परिणाम. कढीपत्त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि प्रथिने टाळूला पोषण देतात, केस गळणे कमी करतात आणि केस पांढरे होण्याचे प्रमाणदेखील कमी करतात.
- कढीपत्त्यातील अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील जळजळ कमी करतात आणि हृदय मजबूत करतात. कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने हृदयाचे दीर्घकालीन आरोग्य राखण्यास मदत होते.
- कढीपत्त्यामध्ये शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याची विशेष क्षमता असते. त्यामुळे यकृत आणि रक्त शुद्ध होण्यास हातभार लागतो, ज्यामुळे शरीर हलके आणि उत्साही वाटते.
