जी मुले आठवडय़ातून किमान एकदा मासे खातात त्यांना उत्तम झोप येत असून त्यांचा उच्च बुद्धय़ांक असल्याचे एका अभ्यासात सुचविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अभ्यासात ९ ते ११ या वयोगटामधील ५४१ मुलांना सहभागी करण्यात आले होते. यामध्ये ५४ टक्के मुले आणि ४६ टक्के मुलींनी सहभाग घेतला होता. या वेळी त्यांना त्यांच्या आहाराबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. ही मुले एका महिन्यात किती वेळा माशांचे सेवन करतात, अशी विचारणा या प्रश्नावलीत करण्यात आली होती. सहभागी मुलांची बुद्धय़ांक चाचणीदेखील या वेळी घेण्यात आली. यात त्यांच्या शाब्दिक आणि गैरमौखिल क्रियाचे कौशल्य तपासण्याकरिता शब्दसंग्रह आणि कोडिंग यांचे परीक्षण करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांकडूनदेखील मुलांच्या झोपेच्या सवयींबाबत विचारणा करण्यात आली. यामध्ये त्यांच्या झोपेची वेळ, कालावधी, रात्री जाग येणे आणि दिवसा झोप येणे याबाबत प्रश्न विचारण्यात आले.

अमेरिकेतील पेनसिलव्हिनिया विद्यापीठातील संशोधकांनी पालकांचे शिक्षण, व्यवसाय, वैवाहिक स्थिती आणि घरातील मुलांची संख्या अशा प्रकारची सर्व माहिती एकत्रित केली. या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर दर आठवडय़ाला मत्स्याहार करणाऱ्या मुलांनी बुद्धय़ांक चाचणीत ४.८ गुण जास्त मिळविल्याचे आढळले. जी मुले क्वचित जेवणात मासे खातात त्यांनीदेखील कधीच मासे न खाणाऱ्या मुलांच्या तुलनेत ३.३ गुण जास्त मिळविल्याचे आढळले. त्याचप्रमाणे माशांचे जास्त सेवन केल्याने झोप मोडण्याचे प्रकार कमी होत असून चांगली झोप लागत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

माशांचे सेवन करणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असून याबाबत लोकांना जागरूक करीत प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे पेनसिलव्हिनिया विद्यापीठातील जियागोंग लिऊ यांनी सांगितले. हा अभ्यास ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eating fish increases the intelligence of brain
First published on: 25-12-2017 at 03:00 IST