Eating Rice at Night is Good or Bad: भात हा भारतीय आहारातील एक महत्त्वाचा भाग आहे. सकाळी, दुपारी आणि रात्री अशा कोणत्याही वेळी भात खाणं ही भारतीय आहारात फार सामान्य बाब आहे. अनेकांचं असं मत आहे की, रात्रीच्या वेळी भात खाल्ला तर आरोग्यासाठी ते नुकसान करणारं ठरतं. आयुर्वेदानुसार, भाताचा गुणधर्म थंड आणि मऊ असतो. जुना भात पचण्यास हलका असतो असे मानले जाते. तर नवीन भात पचायला जड असतो. रात्रीच्या आपल्या शरीरातील अग्नि मंदावलेला असतो. अशावेळी भात पचवणं आपल्या पोटासाठी अवघड होऊन जातं. त्यामुळे गॅस, अपचन आणि जडपणा जाणवतो.

कार्बोहायड्रेट्सचा परिणाम

वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर भातामध्ये कार्बोहायड्रेट्सची मात्रा अधिक असते. भातातून ऊर्जा मिळते, पण रात्रीच्या वेळी मेटाबॉलिज्म कमकुवत असल्याने शरीर तो पूर्णपणे पचवू शकत नाही. परिणामी गॅस, पोट फुगणं आणि अॅसिडिटी अशा समस्या उद्भवतात. रात्रीच्या भात खाऊन आपण लगेच झोपलो तर ती एनर्जी कुठेही वापरली जात नाही. ती चरबीच्या स्वरूपात जमा होऊ लागते. त्यामुळे बऱ्याच जणांमध्ये वजन वाढण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे.

रात्री अजिबात भात खाऊ नये का?

याचा अर्थ रात्रीच्या वेळी अजिबातच भात खाऊ नये असा होतो का असा प्रश्न तुम्हाला पडेल. जर तुम्ही हलकं आणि साधं जेवण केलंत, तर काहीच अडचण होणार नाही. अगदीच मूग डाळीची खिचडी, जीरा राइस किंवा वाफेवर शिजवलेल्या भाज्या हे सर्व पचायला सोपं आहे आणि शरीरावर रात्रीच्या वेळी ओझं होत नाही.

या गोष्टींची काळजी घ्याल

जर तुम्हाला रात्री भात खायचाच असेल तर तो खाण्याआधी कोमट पाणी किंवा सूप पिऊन घ्या. यामुळे पचनाचा अग्नि सक्रिय होतो. ब्राउन राइस किंवा जुन्या तांदळाचा वापर करा. त्यामध्ये फायबर जास्त आणि स्टार्च कमी असतो. या भातात थोडंसं तूप घालून खा, यामुळे तो पचण्यास हलका होतो आणि गॅस होण्यापासून रोखतो. जेवणानंतर ५ ते १० मिनिट थोडं चाला. यामुळे जड वाटत नाही आणि गॅस होत नाही. झोपण्याआधी कमीतकमी २ तास आधी जेवून घ्यावे, म्हणजे शरीराला ते पचवण्यासाठी वेळ मिळतो.

दक्षिण भारतात जास्त खाल्ला जातो भात

महत्त्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण भारतात लोक रोज भात खातात, तरीपण ते जाड होत नाहीत. कारण ते भाताचं सेवन दही, सांभार किंवा उकडलेल्या भाज्यांसोबत करतात. तसंच जेवणानंतर थोडीशी अॅक्टिव्हिटी करतात. थंड भातामधील रेजिस्टंट स्टार्च आतड्यांसाठी फायदेशीर मानला जातो.