scorecardresearch

कॉम्प्युटरवर जास्त वेळ काम केल्याने डोळ्यात पाणी येतंय? ‘या’ टिप्समुळे वेदना होणार कमी

कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करताना ते पुरेशा अंतरावर ठेवा.

(photo-freepik)

आपले सुंदर आयुष्य डोळ्यांशिवाय अपूर्ण आहे. डोळ्यांमुळे आपण जग पाहतो आणि आपले जीवन सुखकर होते. Work from Home करताना बऱ्याचदा वेळेपेक्षा जास्त काम करावे लागते, त्याचा सर्वात वाईट परिणाम डोळ्यांवर होत आहे. सतत तासनतास कॉम्प्युटर स्क्रीनवर वेळ घालवणे डोळ्यांसाठी खूप हानिकारक आहे.

आजही आपल्यापैकी बहुतांश लोक घरूनच काम करतात आणि त्यामुळे आपली नजर खूपच कमकुवत होऊ लागली आहे. मात्र, घरून काम न करणाऱ्यांनाही डोळ्यांचा त्रास कमी नाही, कारण हे लोकही नेहमी मोबाइल, टीव्हीला चिकटलेले असतात. मग आपण आपले डोळे निरोगी कसे ठेवू शकतो? डोळे निरोगी ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, त्याचा तुम्हाला फायदा होईल.

लॅपटॉप, कॉम्प्युटर पुरेशा अंतरावर ठेवा –

कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करताना ते पुरेशा अंतरावर ठेवा. तुम्ही ते डोळ्यांपासून जितके दूर ठेवाल तितका त्याचा परिणाम कमी होईल. सामान्यतः असे दिसून येते की जे लोक स्क्रीन जवळ ठेवून काम करतात, त्यांच्या डोळ्यांना खूप त्रास होतो, डोळ्यातून पाणी येतं आणि अंधुक दिसू लागतं, अनेकांना डोळ्यांची जळजळ सुरू होते, त्यामुळे संगणक किंवा लॅपटॉपची स्क्रीन डोळ्यांपासून किमान २५ इंच दूर ठेवा.

ब्राइटनेस अ‍ॅडजस्ट करा –

कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करताना काही जण स्क्रीनची ब्राइटनेस खूप वाढवतात, त्यामुळे डोळे लवकर जळू लागतात. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्व प्रथम, स्क्रीनची ब्राइटनेस शक्य तितकी कमी करा. लॅपटॉपवर उजेडात काम करण्याचा प्रयत्न करा.

नियमित ब्रेक घ्या –

कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर सतत काम केल्यामुळे डोळे थकतात, त्यांना विश्रांतीची गरज असते, त्यामुळे दर तासाला लॅपटॉपच्या स्क्रीनपासून दूर व्हा. काही वेळ ब्रेक घ्या. याशिवाय दर पाच मिनिटांनी काही सेकंद डोळे बंद करा.

डोळ्यांचा व्यायाम करा –

शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे डोळ्यांचा व्यायामही आवश्यक आहे, यासाठी २०-२०-२० हा फॉर्म्युला सर्वोत्तम मानला जातो. म्हणजेच दर २० मिनिटांनी लॅपटॉपपासून दूर व्हा आणि २० सेकंद डोळे २० फूट अंतरावर कुठेही असलेल्या वस्तूवर थोडा वेळ लक्ष केंद्रित करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eyes hurts due to computer laptop screen try these tips to keep your eyes safe at work hrc