How To Wake Up Early In Morning: सकाळी लवकर उठणे हे चांगल्या आरोग्यासाठी आणि जीवनशैलीसाठी खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा लोक झोपण्यापूर्वी मनात ठरवतात की, ते सकाळी लवकर उठतील पण आळशीपणामुळे त्यांना अंथरूण सोडवतच नाही. सकाळी लवकर उठणे खूप कठीण आणि कंटाळवाणे वाटते, तुम्हाला माहीत आहे का की सकाळी वेळेवर उठल्याने तुम्हाला संपूर्ण दिवस फ्रेश वाटते आणि तुमची जीवनशैली देखील हळूहळू सुधारते. पण मग तुम्हाला काही केल्या सकाळी लवकर उठता येत नसेल तर मग काय करावे… तर मग या काही सोप्या पद्धती नक्की ट्राय करा, मग तुमचे डोळे आपोआप उघडतील.

रात्री वेळेवर झोपा

लवकर उठण्यासाठी रात्री वेळेवर झोपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. निरोगी शरीर राखण्यासाठी तुम्ही निश्चितच ७ ते ८ तासांची झोप घेतली पाहिजे. रात्रीची झोप तुम्हाला दुसऱ्या दिवशी ताजेतवाने वाटण्यास आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल.

स्क्रीन टाइम कंट्रोल

आताच्या डिजिटल युगात लोक रात्री इशिरापर्यंत त्यांचे फोन आणि लॅपटॉप वापरत असतात. यामुळे दीर्घकाळ झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच झोपण्याच्या किमान एक तास आधी तुमचा मोबाईल आणि लॅपटॉप बंद करण्याची सवय लावून घ्या. शिवाय तुम्ही झोपताना फोन स्लिप मोडवर टाकू शकता, त्यामुळे तुम्हाला सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्सचा त्रासही होणार नाही.

अलार्म घड्याळ दूर ठेवा

लवकर उठण्यासाठी तुम्ही अलार्म लावतच असाल, मग तुम्ही ते घड्याळ किंवा फोन तुमच्या झोपण्याच्या जागेपासून दूर ठेवा. जणेकरून तो बंद करण्यासाठी तुम्हाला जागेवरून उठावे लागेल. यामुळे तुमच्यातला आळसही कमी होईल.

दिवसाचे नियोजन

झोपण्यापूर्वी तुमच्या पुढच्या दिवसाचे नियोजन नक्की करा. तुमच्या दैनंदिन योजनेत तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल उत्साह आहे, त्या गोष्टींचा समावेश करा. यामुळे तुम्हाला सकाळी उठण्यास प्रेरणा मिळेल.

रात्रीचा आहार हलका घ्या

जर तुम्हाला दररोज सकाळी लवकर उठायचे असेल तर रात्री हलका आहार घ्या. हलके जेवण अन्न वेगाने पचवण्यास मदत करते, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि पचनाच्या समस्या टाळण्यासदेखील मदत करते.