प्रवासवेड्या मंडळींसाठी पावसाळा म्हणजे अगदी आवडीचा ऋतू. निसर्गाच्या खऱ्या रंगाची उधळण पाहायची असेल तर हा ऋतू अगदी योग्य आहे, असं म्हणायला हरकत नाही. यंदाचा मान्सूनही आता चांगल्या पद्धतीने तग धरु लागला असून, त्याच अनुषंगाने ट्रेकिंगसाठी उत्सुक असणाऱ्या मंडळींनी बेत आखण्यासही सुरुवात केली आहे. गड किल्ल्यांच्या वळणवाटांवर पावसाच्या साथीने निघालेल्या या वाटसरुंना सध्या काही सुरेख वाटा खुणावत आहेत. पण, त्या वाटांवर म्हणजेच ट्रेकिंगवर निघण्यापूर्वी काही गोष्टींविषयी काळजी घेतलेली कधीही चांगली. कारण, संकटं किंवा अडचणी काही सांगून येत नाहीत. त्यामुळे ट्रेकिंगसाठी वगैरे निघतेवेळी शक्य त्या सर्व गोष्टींची आपल्या बाजून काळजी घेणं कधीही उत्तम.

योग्य शूज आणि कपड्यांची निवड-
ट्रेकिंगसाठी निघालेल्या मंडळींनी लक्ष द्याव्यात अशा सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कपडे आणि शूज. पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी गेलं असता लगेच वाळतील असे आणि ओझं होणार नाही असेच कपडे निवडावेत. पावसाळ्यात माती आणि दगडांवरुन पाय घसरण्याच्या शक्यता जास्त असतात. त्यामुळे न घसरणारे आणि चांगली ग्रीप असणारे शूज निवडणं कधीही योग्य असतं. गेल्या काही वर्षांमध्ये खास ट्रेकिंगसाठी डिझाईन करण्यात आलेले विविध प्रकारचे शूज खिशाला परवडणाऱ्या दरांमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांसाठीसुद्धा अशा प्रकारच्या शूजमध्ये बरेच पर्याय उपलब्ध आहेत. ‘सिर सलामत तो पगडी पचास’ असं म्हणतात ना… तेच ट्रेकिंगच्या बाबतीत शूजसाठीही लागू होतं असं म्हणायला हरकत नाही.

ट्रेकिंग ग्रुपतर्फे देण्यात येणाऱ्या सर्व नियमांचं पालन करा-
कोणताही ट्रेक सुरु करण्यापूर्वी तुम्हाला काही नियम सांगण्यात येतात. हे नियम फक्त ऐकण्यासाठीच नसून, त्याची अंमलबजावणी होणंही तितकच महत्त्वाचं असतं. कारण ट्रेक लीड करणाऱ्या व्यक्तीला त्या वाटेचा अंदाज असतो. त्यामुळे वाटेत कोणत्या संभाव्य अडचणी येऊ शकतात किंवा त्यांचा सामना आपण कशा प्रकारे करु शकतो याविषयी तो किंवा तीच अचूकपणे देऊ शकते.

वाचा : गर्ल गॅंगसोबत किंवा एकटीने फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? या डेस्टीनेशन्सचा नक्की विचार करा

चेकलिस्ट तयार करा-
ट्रेकला निघण्यापूर्वी सर्व गोष्टींची एक चेकलिस्ट तयार करा. अमुक एका प्रवासाला जाण्यासाठी तुमच्या बॅकबॅकमध्ये नेमक्या किती आणि कोणत्या गोष्टींची गरज आहे, यावर एकदा लक्ष द्या. बॅटरी, हल्लीच्या दिवसांमध्ये गरजेची असणारी पॉवरबँक, औषधं, प्रथमोपचाराच्या वस्तू, सुका खाऊ, रेनकोट आणि इतरही गरजेच्या वस्तू न विसरता सोबत न्या.

जास्त वर्दळीच्याच वळणवाटा निवडा-
ट्रेकला जाण्यासाठी उत्साही असणाऱ्यांमध्ये फक्त आणि फक्त अनोळखी वाटांवर चालण्याचा अनुभव घेण्यासाठी येणाऱ्यांचीही संख्या तुलनेने जास्त असते. पण, याच अनोखळी वाटा कित्याकदा आपल्याला अडचणीत टाकू शकतात. त्यामुळे ज्या वाटेवरुन इतर ट्रेकर्सची जात आहेत, किंवा ज्या वाटा तुलनेने बऱ्यापैकी वर्दळीच्या आहेत त्याच मार्गाने ट्रेक पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये हरवण्याची शक्यता कमी असते, त्याशिवाय काही अचडण आलीच तर त्या वाटेवर इतरांची मदतही सहजपणे उपलब्ध होऊ शकते.

कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची तयारी ठेवा-
ट्रेकिंगसाठी त्यातही पावसाळी ट्रेकसाठी बाहेर पडताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपण एका ट्रेकसाठी बाहेर जात आहोत, कोणत्या टूरवर नाही. त्यातही जंगल, डोंगर, वळणवाटा या ठिकाणांवर आपल्याला बरेच वन्यजीन दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्या निवाऱ्याला कोणतीही इजा पोहोचणार नाही, याची प्रत्येक ट्रेकरने काळजी घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय ट्रेकिंगदरम्यान कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याचीही तयारी दाखवली पाहिजे. अमुक एक गोष्ट खाणार नाही, किंवा हे असं आम्ही करत नाही, किती घाण, किती कचरा, किती चिखल आणि किती प्रदूषण अशी तक्रार करणाऱ्या ट्रेकर्सना या वाटांवर जास्त काळ तग धरता येत नाही. त्यामुळे निसर्गाच्या कुशीत असताना त्याला कोणतीही इजा न पोहोचवता ट्रेकर्सनी निसर्गाच्याच नियमांचं पालन करणं अपेक्षित असतं.