10 Foods To Avoid On Empty Stomach : निरोगी आणि फिट शरीरासाठी दिवसाची सुरुवात चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे. यासाठी नाश्त्यात शरीरासाठी फायदेशीर पदार्थांचा समावेश करणं गरजेचे आहे, कारण यामुळेच शरीराला दिवसभर काम करण्यासाठी उर्जा मिळते. पण दिवसाची निरोगी सुरुवात करण्यासाठी तुम्ही रिकाम्या पोटी काय खाता हे सर्वात महत्वाचे आहे. कारण सकाळी पोट रिकामी असताना, शरीराची पचनसंस्था खूप संवेदनशील असते. अशा परिस्थितीत, रिकाम्या पोटी काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे.
कारण जर तुम्ही रिकाम्या पोटी काही चुकीचे खाल्ले तर अॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता, पोटफुगी आणि चयापचय यांसारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यावर आहारतज्ज्ञ प्रिया मित्तल यांनी असे काही पदार्थ सांगितले आहेत, जे रिकाम्या पोटी खाणे टाळले पाहिजेत.
आहारतज्ज्ञ प्रिया मित्तल यांच्या मते, काही सामान्य पदार्थ जे शरीरासाठी फायदेशीर मानतो. पण ते रिकाम्या पोटी खाल्ल्यास हानिकारक ठरु शकतात. कारण, आपण जे काही खातो त्याचा परिणाम प्रथम पोटावर होतो. आजकाल, वाईट खाण्याच्या सवयी आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे, पोटाशी संबंधित समस्या खूप सामान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत, रिकाम्या पोटी काही खाताना विशेष काळजी घेतली पाहिजे.
१) आंबट फळं
सकाळी रिकाम्या पोटी संत्री, मोसंबी आणि अननस यांसारखी आंबट फळं खाणे टाळावे. कारण आंबट फळांमध्ये आम्ल जास्त प्रमाणात असते. रिकाम्या पोटी ती खाल्ल्यास गॅस, छातीत जळजळ आणि पोटाच्या अस्तरांचे नुकसान होऊ शकते.
२) टोमॅटो
रिकाम्या पोटी टोमॅटो खाणे टाळावे. यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. टोमॅटोमध्ये टॅनिक अॅसिड असते, ज्यामुळे पोटातील आम्लता वाढू शकते आणि अल्सरचा धोका देखील वाढू शकतो.
३) केळी
केळी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जात असली तरी, रिकाम्या पोटी केळी खाणे टाळावे. रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने शरीरात मॅग्नेशियमचे प्रमाण अचानक वाढते, ज्यामुळे हृदयावर परिणाम होऊ शकतो.
४) थंड पदार्थ
सकाळी रिकाम्या पोटी थंड पदार्थ खाणे टाळावे. फ्रिजमध्ये ठेवलेले पाणी किंवा ज्यूस पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. रिकाम्या पोटी थंड पदार्थ खाल्ल्याने पचनशक्ती कमकुवत होते आणि पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो.
५) गोड पदार्थ किंवा साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ
सकाळी लवकर रिकाम्या पोटी गोड पदार्थ किंवा साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाणे टाळावे. सकाळी लवकर रिकाम्या पोटी साखरेचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते, ज्यामुळे मधुमेह आणि चयापचय विकारांचा धोका वाढू शकतो .
६) कॉफी किंवा चहा
रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे टाळावे. यामुळे आम्लपित्त आणि छातीत जळजळ होऊ शकते. चहामधील टॅनिक अॅसिड पोटाच्या आवरणाला नुकसान पोहोचवू शकते.
७) दही
रिकाम्या पोटी दही खाऊ नये. रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने पोटात आम्लात वाढते आणि पोटासंबंधीत आजार होऊ शकतात. गुड बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात.
८) मसालेदार किंवा तेलकट पदार्थ
सकाळी लवकर रिकाम्या पोटी मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खाणे टाळावे कारण यामुळे पोटावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे अॅसिडिटी किंवा गॅसची समस्या उद्भवू शकते.
९) सोडा किंवा कोल्ड्रिंक्स
रिकाम्या पोटी सोडा किंवा कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे. त्यात असलेले कार्बन डायऑक्साइड आणि आम्ल पोटातील आम्ल पातळी वाढवते आणि त्यामुळे पोटदुखी, सूज किंवा अल्सर होऊ शकतात.
१०) कच्च्या भाज्या
कच्च्या भाज्या रिकाम्या पोटी खाऊ नयेत. कच्च्या भाज्यांमध्ये असे घटक असतात जे रिकाम्या पोटी पचण्यास कठीण असतात आणि त्यामुळे गॅस किंवा पोटफुगीसारख्या समस्या उद्भवू शकतात.