Frequent Urination Causes: तुमच्या लघवीच्या सवयींमध्ये अचानक बदल जाणवतोय का? दिवसभरात वारंवार लघवी लागणं, लघवी फेसाळ दिसणं किंवा तिच्या रंगात बदल जाणवणं ही साधी वाटणारी लक्षणं तुमच्या शरीरात सुरू झालेल्या गंभीर विकारांच्या धोक्याची घंटा ठरू शकतात. तज्ज्ञांच्या मते, अशी लक्षणं मधुमेह (Diabetes), मूत्रपिंडाच्या समस्या (kidney disease) किंवा मूत्रमार्गातील संसर्ग (Urinary Tract Infection) यांचा इशारा देतात.

प्रसिद्ध मेयो क्लिनिकच्या तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाची अनेक लक्षणं असतात. त्यात थकवा येणं, धूसर दिसणं, अचानक वजन घटणं, अधिक भूक लागणं, जखम लवकर न भरणं, वारंवार संसर्ग होणं, हिरड्या सुजणं किंवा रक्त येणं, तसेच हातापायांत झिणझिण्या किंवा सुन्नपणा येणं ही लक्षणं प्रमुख आहेत. पण या सर्वांबरोबरच लघवीशी संबंधित काही संकेत असे आहेत, जी तुमच्या शरीरात मधुमेहानं शिरकाव केल्याची चाहूल देतात आणि त्याकडे दुर्लक्ष करणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं.

१. वारंवार लघवी आणि जास्त तहान

मेयो क्लिनिक सांगते की, जास्त तहान लागणं आणि वारंवार लघवीला जावं लागणं ही मधुमेहाची सुरुवातीची आणि सर्वांत सामान्य लक्षणं आहेत. रक्तात साखरेचं प्रमाण वाढलं की, मूत्रपिंड ती साखर फिल्टर करण्यासाठी जास्त मेहनत करतं. परिणामी, शरीरातील पाणी बाहेर टाकलं जातं आणि तुम्हाला वारंवार लघवी लागते. जर अशी समस्या काही दिवस सतत राहिली, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.

२. लघवी फेसाळ

लघवी फेसाळ दिसणं हे मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाडाचं संकेत आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये शरीरातील साखरेचं प्रमाण जास्त झाल्यानं मूत्रपिंडं त्यांचं शुद्धीकरणाचं कार्य नीट करू शकत नाहीत. त्यामुळे लघवीचा रंग फिकट पांढरा किंवा ढगाळ दिसतो.

३. मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका

मधुमेहाचा थेट परिणाम मूत्रपिंडांवर होतो. दीर्घकाळ साखरेचं प्रमाण वाढलेलं राहिल्यास मूत्रपिंडांमध्ये प्रोटीन जमा होतं आणि लघवीतून ते बाहेर येऊ लागतं. हाच आहे शरीरानं तुम्हाला सावधानतेचा दिलेला इशारा! तज्ज्ञ सांगतात की, प्रत्येक १० मधुमेही रुग्णांपैकी किमान तीन ते चार रुग्णांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो.

४. मूत्रमार्गातील संसर्ग (UTI)

जर लघवी करताना जळजळ, वास किंवा वेदना जाणवत असतील, तर ती फक्त साधी समस्या नाही. रक्तातील साखरेच्या उच्च पातळीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि जीवाणूंची संख्या सहजगत्या वाढते. त्यामुळे महिलांना मूत्रमार्गात संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो आणि वेळेत उपचार न घेतल्यास हा संसर्ग हातपाय पसरू शकतो.

५. थकवा आणि वजन घटणं

मधुमेहाच्या सुरुवातीच्या टप्प्यात शरीर ऊर्जा नीट शोषू शकत नाही. त्यामुळे सतत थकवा जाणवणं, धूसर दिसणं, वजन घटणं किंवा जखम लवकर न भरणं ही लक्षणंही दिसतात.

लघवीत हे बदल दिसताच “उद्या पाहू”, असं बिलकूल म्हणू नका! कारण- शरीर आधीच तुम्हाला काहीतरी सांगतंय आणि तुम्ही फक्त ते चालढकल न करता ऐकायचं आहे. मधुमेह हा शांतपणे वाढणारा, पण जीवघेणा आजार आहे. योग्य वेळी तपासणी, आहारनियंत्रण आणि जीवनशैलीत बदल केल्यास तो पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो.

त्यामुळे पुढच्या वेळी लघवीचा रंग, वास किंवा वारंवारता बदलली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.