Compost From Kitchen Waste At Home : अनेकदा बागेतील झाडांना फुले येणे कमी होते; तसेच झाडांची वाढ खुंटते. विशेषत: गुलाब, जास्वंद, सदाफुली व तुळस अशा प्रकारच्या वनस्पतींमध्ये ही समस्या दिसून येते. त्यामुळे चांगल्या फुललेल्या बागेचे नुकसान होते. त्यात रासायनिक खतांचा वापर केल्यास झाडांचे नुकसान होते. इतकेच नाही, तर रासायनिक खतांच्या जास्त वापरामुळे झाडे मरतात. अशा वेळी स्वयंपाकघरातील फळभाज्यांचा सालींपासून तुम्ही घरगुती खत तयार करू शकता. हे खत बनवणे खूप सोपे आणि किफायतशीर आहे; जे कोणीही घरी तयार करू शकतो. त्यामुळे आज आपण घरच्या घरी नैसर्गिक खत कसे तयार करायचे जाणून घेऊ…
१) स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून नैसर्गिक खत तयार करण्यासाठी प्रथम भाज्या आणि फळांच्या साली एका ठिकाणी गोळा करा.
२)आठवडाभर अशा प्रकारे साली जमा करा. त्यानंतर त्या उन्हात नीट वाळवा. मग वाळवलेल्या या सर्व साली एका बादलीत ठेवा आणि त्यात शेण आणि पाणी यांचे द्रावण भरा. नंतर हे द्रावण थंड ठिकाणी काही दिवस बंद करून ठेवा.
३) दर दिवशी हे द्रावण नीट ढवळून वर-खाली करून, त्या द्रावणातील उपयुक्त घटक नीट मुरतील असे पाहा.
४) पाणी आणि शेणाच्या द्रावणात भाजीपाला आणि फळांच्या साली चार ते पाच दिवस कुजून त्याची पेस्ट तयार होते. हीच पेस्ट म्हणजे झाडांसाठी वापरता येईल असे उपयुक्त नैसर्गिक खत असते.
५) तुम्ही दर आठवड्याला तुमच्या बागेतील झाडांमध्ये हे नैसर्गिक खत टाका. १५ दिवसांत तुमची बाग तुम्हाला पाना-फुलांनी बहरलेली दिसेल.