युझर्सपर्यंत आलेला फोटो हा खरा आहे की खोटा हे आता गुगलच सांगणार आहे. गुगलने आपल्या सर्चमध्ये बदल केला असून आता गुगल सर्च केल्यानंतर इमेज थम्बनेलच्या खालीच फॅक्टचेकचं लेबल दिसणार आहे. “युझर्स जेव्हा या गुगल सर्चच्या रिझल्टवर टॅप करुन मोठ्या आकारामध्ये इमेज पाहतील तेव्हा त्यांना इमेजच्या फॅक्ट चेकसंदर्भातील माहिती वेब पेजवर दिले,” असं गुगल ग्रुप प्रोडक्टचे व्यवस्थापक हॅरीस कोहेन यांनी सोमवारी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

फोटोंच्या माध्यमातून पसरवण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीला आळा घालण्यासाठी गुगलने आपल्या सर्च आणि न्यूज पर्यायांमध्ये हे नवे फिचर आणलं आहे. स्वतंत्र, अधिकृत माहिती स्त्रोतांकडून आलेल्या आणि गुगलच्या नियमांमध्ये बसणाऱ्या वेब पेजेसवरील फोटोंवर हे लेबल दिसणार आहे. फोटोंची सत्यता पडताळून पाहण्यासाठी ऑनलाइन प्रकाशक वापरतात त्या ‘क्लेमरिव्ह्यू’चा वापर करण्यात येणार आहे. ही माहिती युझर्सला सहज सापडावी म्हणून गुगलने आधीपासूनच फॅक्ट चेकची माहिती सर्चवर तसेच गुगल न्यूजमध्ये देण्यास सुरुवात केली असल्याचे आयएएनएस या वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

युट्यूबवरही क्लेम रिव्ह्यूच्या माध्यमातून ब्राझील, अमेरिका आणि भारतामध्ये माहितीची पडताळणी केली जाते. “या फॅक्ट चेक लेबलमुळे गुगलच्या रँकिंगमध्ये फरक पडणार नाही. सर्वात योग्य, विश्वासार्हता असणारी माहिती दाखवण्याचे काम गुगलची सिस्टीम करते. या सिस्टीमच्या माध्यमातून फॅक्ट चेकसंदर्भातील माहितीही पुरवली जाते,” असं कोहेन यांनी म्हटलं आहे. सध्याच्या करोना महामारीच्या कालावधीमध्ये फॅक्ट चेकर्सने केलेल्या महत्वाच्या कामाची दखल घेत गुगल न्यूज इनिशिएटीव्हने या वर्षाच्या सुरुवातीलाच अशाप्रकारची खरी माहिती युझर्सपर्यंत पोहचवण्यासाठी काम करणाऱ्या उपक्रमांना ६.५ मिलियन डॉलर्सचा निधी देण्याची घोषणा केली आहे.