Google ने आपल्या हार्डवेअर इव्हेंट Made by Google दरम्यान आपले नवे Pixel 4 आणि Pixel 4 XL हे स्मार्टफोन्स लाँच केले. यावेळी Project Soli वर कंपनीने विशेषत: लक्ष दिलं होतं. तसंच रडार सेन्सरचा वापर करण्यात आलेला हा पहिलाच स्मार्टफोन आहे. याव्यतिरिक्त या फोनमध्ये सर्वात जलद गतीचं फेस अनलॉक फिचर देण्यात आल्याच्या दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Pixel 4, Pixel 4 XL मध्ये देण्यात आलेल्या रडार सेन्सरमुळे हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. भारतात हा फोन का लाँच करण्यात येणार नाही याबाबत मात्र अद्यापही कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. प्रामुख्यानं 60Hz फ्रिक्वेन्सीसाठी कोणत्याही परवान्याची गरज भासत नाही. परंतु भारतात 60Hz फ्रिक्वेन्सीसाठी पैसे आकारण्यात येतात. Google Pixel 4 मध्ये Soli Radar देण्यात आले असून ते 60Hz mmwWave फ्रिक्वेन्सीचा वापर करते. त्यामुळेच हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

गुगलकडे सध्या अनेक प्रोडक्ट्स आहेत ज्यांचा त्या-त्या ठिकाणांनुसार वापर करण्यात येतो. भारतात Pixel 4 फोन लाँच न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील काळात अन्य Pixel स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात येणार असल्याची माहिती गुगलच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली. Pixel 4 स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेला मोशन सेंसर फोन लॉक असल्यानंतरही काम करतो. तसंच या स्मार्टफोनमध्ये जेस्चर कंट्रोल हे फिचरही देण्यात आलं आहे. फोनला हात न लावता केवळ वेव करून फोन कंट्रोल करता येणं शक्य आहे. हे सर्व फीचर्स Project Soli अंतर्गत येतात. हा ह्यूमन कंम्प्युटर इंटरॅक्शनचा एक प्रकार आहे. Pixel 4 हा स्मार्टफोन जस्ट ब्लॅक, क्लिअरली व्हाईट आणि ओह सो ऑरेंज या तीन कलर व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. ओह सो ऑरेंज व्हेरिअंट हे लिमिटेड एडिशन असणार आहे.

काय असेल किंमत?
Pixel 4 च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत ७९९ डॉलर्स तर Pixel 4 XL ची किंमत ८९९ डॉलर्स निश्चित करण्यात आली आहे. Pixel 4 XL मध्ये OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच याला A+ रेटिंग देण्यात आल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. यामध्ये देण्यात आलेला डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटचा असून हा यामध्ये Android 10 देण्यात आला आहे.


काय आहेत खास फीचर्स?
Pixel 4 मध्ये कोणतंही गाणं बदलण्यासाठी आता स्क्रिनवर टच करण्याची आवश्यकता भासणार नाही. केवळ हात फोनवर वेव करून गाणं बदलता येणार आहे. यामध्ये देण्यात आलेला Soli सेन्सर आसपासच्या मोशनला डिटेक्ट करतो आणि याअंतर्गत घेण्यात आलेला डेटा गुगल सर्व्हरवर ठेवण्यात येत नसल्याचं गुगलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या स्मार्टफोनमध्ये गुगल असिस्टंटचं नव व्हर्जन देण्यात आलं आहे. कोणत्याही प्रकारचा डेटा डिलिट करण्यासाठी या गुगल असिस्टंटचा वापर करता येऊ शकता. तसंच यामध्ये विशेष ऑडिओ रेकॉर्डर तयार करण्यात आला आहे. कोणत्याही व्हॉईस रेकॉर्डिंगला रिअल टाईम ट्रान्स्क्राईब करता येणं शक्य असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


स्पेसिफिकेशन्स
Pixel 4 मध्ये Qualcomm Snapdragon 855 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच यामध्ये ६ जीबी रॅम देण्यात आली असून हा फोन ६४ आणि १२८ जीबी व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असणार आहे. Pixel 4 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला असून त्याची प्रायमरी लेन्स १२.२ मेगापिक्सेलची आहे. तर दुसरी लेन्स १६ मेगापिक्सेलची देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त फेस डिटेक्शन आणि ऑटो फोकस सपोर्टही देण्यात आला आहे. गुगलनं यावेळी आयफोनप्रमाणेच फिंगर प्रिंट सेंसर काढून टाकला आहे. केवळ पिन आणि फेस अनलॉकच्या माध्यमातूनच फोन उघडता येणार आहे.