Green Moong for Weight Loss: अंकुरित मूगामध्ये कॅलरीज कमी आणि दर्जेदार पोषक जास्त प्रमाणात आढळतात. अंकुरलेले कडधान्य फायबर आणि प्रथिने युक्त तसंच कमी चरबीयुक्त आणि कोलेस्टेरॉल मुक्त आहेत. प्रति १०० ग्रॅम मूगामध्ये फक्त ३० कॅलरीज आढळून येतात. मूगामध्ये असलेले फायबर अन्न पचनास मदत करते तसंच कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी करते. हिरवे मूग ग्लूटेन-मुक्त असल्यामुळे सीलिएक रोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हा आहाराचा एक चांगला स्रोत आहे. हिरव्या मूगात मोठ्या प्रमाणात बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे असतात, विशेषत: फोलेट आणि थायामिन.१०० ग्रॅम अंकुरलेल्या मुगात तांबे, लोह, मॅंगनीज, फॉस्फरस, कॅल्शियम आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. तसंच ते पोटॅशियमचे उत्कृष्ट स्त्रोत देखील आहेत.
जाणून घ्या भिजवण्याची योग्य पद्धत
हिरवे मूग भिजवताना सर्वात आधी ते स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्या. त्यानंतर ८ ते १२ तास खोलीच्या तापमानावर बरणीत भिजत ठेवा. बरणीचे तोंड कापडाने झाकून ठेवा जेणेकरून मूग श्वास घेऊ शकतील. दुस-या दिवशी, मूग गाळून घ्या आणि मोड येण्यासाठी रिकाम्या कोरड्या कंटेनरमध्ये ठेवा. यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, की मूगाचा थेट सूर्यप्रकाशाशी संपर्क येऊ देऊ नका. त्यानंतर दिवसातून एकदा मूग धुवा आणि पुन्हा कंटेनरमध्ये ठेवा. असं प्रत्येक दिवशी करा, जोपर्यंत मुगाचे मोड येताना दिसत नाहीत. जर तुम्ही मूग कंटेनर मध्ये न ठेवता ओल्या कपड्यात ठेविले असतील, तर कापड ओलसर असल्याची खात्री करा. ही प्रक्रिया अशीच सुरू ठेवल्यानंतर चौथ्या दिवशी तुम्हाला मूग मोठ्या लांबीपर्यंत पोहोचलेले दिसतील. आता हे अंकुरलेले मूग वेगवेगळ्या प्रकारे खाण्यासाठी तयार आहे.
( हे ही वाचा: वुड फायर पिझ्झा म्हणजे काय? जाणून घ्या कसा बनवायचा?)
मोड आलेल्या मुगाच्या या रेसिपी वापरून पहा
१) अंकुरलेले मूग सॅलड
हे पौष्टिक सॅलड बनविण्यासाठी सर्वात आधी अंकुरलेले मूग पाण्यामध्ये उकळवून घ्या. मूग शिजल्यानंतर त्यांना एका वाडग्यात काढून घ्या. नंतर यात टोमॅटो, कांदा, काकडी, गाजर, लाल आणि हिरवी शिमला मिरची आणि पुदिन्याची पाने कापून घाला. त्यानंतर त्यात काही थेंब लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ आणि मिरपूड घाला. अशाप्रकारे तुमचं स्वादिष्ट सॅलड सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
२) अंकुरित मूग चीला
हा भारतीय शैलीचा पॅनकेक आहे, जो डोसापेक्षा थोडा जाड असतो. हा बनविण्यासाठी अंकुरलेले हिरवे मूग ब्लेंडरमध्ये चांगले बारीक करा, आवश्यक असल्यास थोडेसे पाणी घालून गुळगुळीत पीठ बनवा. आता या पिठात आले लसूण पेस्ट, मीठ आणि ताज्या चिरलेल्या भाज्या घाला. आता हे पीठ ३० मिनिटे बाजूला ठेवा. ३० मिनिटानंतर, नॉन-स्टिक तव्यावर थोडे तेल लावून तवा एक मिनिट गरम करा. तवा गरम झाल्यानंतर एक मोठा चमचा तयार केलेले पिठ घेऊन तव्यावर समान पसरवा. त्यानंतर २ ते ३ मिनिटे मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत चांगला भाजून घ्या. चांगला भाजून झाल्यानंतर, हिरव्या चटणीसोबत गरमागरम चिला खाण्यासाठी सर्व्ह करा.
( हे ही वाचा: Noodles Boiling Tips: नूडल्स चिकट होण्यापासून रोखण्यासाठी, अशा प्रकारे उकळवा; जाणून घ्या स्टेप्स)