जगप्रसिद्ध मोटारसायकल कंपनी हार्ले डेविडसन आपल्या चार नव्या बाइक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये एका इलेक्ट्रिक मोटारसायकलचाही समावेश आहे. ‘मोअर रोड्स टू हार्ले-डेविडसन’ या कार्यक्रमात कंपनीने याबाबत माहिती दिली.

हार्ले डेविडसनच्या नव्या बाइक्समध्ये 500 सीसी ते 1250 सीसी इंजिन क्षमता असलेल्या तीन, तर 250 ते 500 सीसीच्या बाइक्स भारत आणि आशियाच्या बाजारात आणणार आहेत. या नव्या बाइक्स हार्ले-डेविडसन पॅन अमेरिका 1,250cc अॅडवेंचर-टूरिंग मॉडेल, 975cc स्ट्रीटफाइटर मॉडेल आणि 250-500cc च्या प्लॅटफॉर्मनुसार तयार होत आहेत. याशिवाय हार्ले-डेविडसनने एका भारतीय कंपनीशीही भागीदारी केली आहे पण ती कोणती कंपनी आहे याबाबत हार्ले-डेविडसनने कोणतीही माहिती दिलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून Royal Enfield ने भारतीय बाजारात विशेष लक्ष दिलं आहे त्यामुळे या नव्या बाइक्सच्या आधारे हार्ले डेविडसन रॉयल एनफिल्डला टक्कर देण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे.

बदलत्या जगामध्ये ग्राहकांकडून मागणीही बदलत आहे, आणि त्यामुळेच चार नव्या बाइक बाजारात आणण्याचा निर्णय कंपनीने घेतला, असं हार्ले डेविडसनने म्हटलं. नव्या बाइक 2019-20 आणि 2022 मध्ये लॉन्च केल्या जाणार आहेत.

सद्यस्थितीत भारतात हार्लेच्या बऱ्याच बाइक्स आहेत आणि ग्राहकांच्या त्या चांगल्या पसंतीस उतरत आहेत. आता या नव्या बाइक्सची किंमत काय असणार याबाबत हार्लेच्या ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे.