Fatty Liver Disease Symptoms: आजच्या धावपळीच्या आणि असंतुलित जीवनशैलीत फॅटी लिव्हर हा आजार वेगाने वाढताना दिसत आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशातसुद्धा तरुणांमध्ये हा आजार झपाट्याने पसरतो आहे. धक्कादायक बाब म्हणजे जगभरातील २५ ते ३८ टक्के प्रौढ लोकसंख्या नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD)ने त्रस्त असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा आजार वेळेत लक्ष न दिल्यास सिरॉसिससारख्या गंभीर अवस्थेत जाऊ शकतो. अगदी लिव्हर ट्रान्सप्लांटची वेळही येऊ शकते.

हार्वर्ड आणि स्टॅनफोर्डसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रशिक्षित झालेले अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी या आजाराबाबत मोठा इशारा दिला आहे. ते सांगतात की, काही साधी वाटणारी लक्षणं खरं तर फॅटी लिव्हरच्या धोक्याची घंटा असू शकतात आणि ती दुर्लक्षिली, तर मोठा जीवघेणा धोका संभवतो.

डॉ. सेठी यांनी सांगितलेली ८ धोक्याची संकेतं

१. अकस्मात वजन वाढणं – विशेषतः पोटाभोवती चरबी साचत असेल, तर ते लिव्हरवर फॅट जमा होण्याचे सुरुवातीचे लक्षण आहे.

२. सतत थकवा व अशक्तपणा – पुरेशी झोप घेतल्यानंतरही अंगात जीव नसेल, तर तो लिव्हर व्यवस्थित काम करीत नसल्याचं संकेत आहे.

३. पोटात वेदना व सूज – पोटात उजवीकडे वरच्या बाजूला दुखत असेल, तर तो त्रास फॅटी लिव्हरमुळे होऊ शकतो.

४. लघवी व शौचाच्या रंगात बदल – लघवी गडद होणं आणि शौच फिकट होणं हे लिव्हरचं कार्य बिघडल्याचं लक्षण आहे.

५. त्वचा व डोळे पिवळसर होणे (पांडुरोग) – शरीरात बिलिरुबिन साठल्यामुळे हे होतं आणि हा फॅटी लिव्हरचा धोकादायक टप्पा मानला जातो.

६. साखरेची पातळी वाढणं – रक्तशर्करा सतत जास्त असेल, तर फॅटी लिव्हरमुळे इन्सुलिन रेसिस्टन्समुळे असं होण्याची शक्यता असते.

७. कोलेस्ट्रॉल वाढणं – रक्तातील कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसराइड्स सतत वाढलेले असतील, तर लिव्हरचं आरोग्य तपासणं आवश्यक आहे.

८. सहज खरचटणं किंवा रक्तस्राव होणं – बहुतेक वेळा लोक या लक्षणाकडे दुर्लक्ष करतात; पण फॅटी लिव्हरच्या त्रासात यकृत पुरेशा प्रमाणात आवश्यक प्रथिनं तयार करू शकत नाही. त्यामुळे रक्त नीट गोठत नाही आणि फॅटी लिव्हर धोका अधिक वाढतो.

डॉक्टरांचे असे ठाम सल्ला आहे की, ही लक्षणं दिसल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा. फॅटी लिव्हरचा त्रास वेळीच लक्षात आला, तर तो थांबवणंही शक्य आहे; मात्र उशीर झाला, तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो.