What Juice Is Best For Detoxing : वेळेत उठून, नेहमीची ट्रेन पकडून, ऑफिसला वेळेत पोहोचणे अशी दिवसाची सुरुवात चांगली झाली, तर संपूर्ण दिवस चांगला जातो. पण, जर चुकून उठायला उशीर झाला रे झाला की तुमचा संपूर्ण दिवस चिडचिड करण्यात निघून जातो. काही जणांना सकाळी उठल्यापासून अपचन, पित्ताचा त्रास होतो. मग त्यांनाही अस्वस्थ वाटते आणि संपूर्ण दिवसभर मूड बिघडलेला राहतो. त्यामुळे दिवसभर उत्साही राहण्यासाठी दैनंदिन गोष्टींबरोबर तुम्हाला तुमच्या शरीराच्या आरोग्याकडेही तितकेच लक्ष दिले पाहिजे.
तर दिवसभर उत्साही राहण्यासाठी सकाळी तुम्ही बीट आणि चिया सीड्सचा रस पिऊ शकता. खरं तर, बीटरूट आणि चिया सीड्सचा रस प्यायल्याने शरीर केवळ डिटॉक्सिफाय होत नाही, तर शरीरात ऊर्जादेखील टिकून राहते. पण, बीट आणि चिया सीड्सचा रस तुमच्या आरोग्यासाठी कसा फायदेशीर ठरतो ते चला जाणून घेऊयात…
बीट आणि चिया सीड्समध्ये कोणती पोषक तत्वे असतात?
बीटामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, लोह व खनिजे आढळतात; ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते. त्यात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्सदेखील असतात, जे त्वचा आतून स्वच्छ, चमकदार ठेवण्यासाठी मदत करतात. त्याउलट चिया सीड्ससुद्धा शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही. कारण- त्यामध्ये प्रथिने आणि फायबर असतात.
बीट आणि चिया सीड्सच्या रसाचे फायदे
बीट आणि चिया सीड्सचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्याचे सेवन केल्याने शरीराला थकवा जाणवत नाही. रक्त शुद्ध करणे, रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, त्वचा स्वच्छ ठेवणे यांसाठीही हा रस उपयुक्त ठरतो आणि वजन कमी करणाऱ्यांसाठी तर हा सगळ्यात बेस्ट पर्याय ठरतो.
बीट आणि चिया सीड्सचा रस कसा बनवायचा?
बीट आणि चिया सीड्सचा रस तयार करण्यासाठी, प्रथम बीट स्वच्छ धुऊन आणि सोलून घ्या. आता बीटाचे बारीक तुकडे करून ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. बीट ऐवजी तुम्ही सफरचंद किंवा गाजर घालू शकता. त्यानंतर त्यात एक चमचा चिया सीड्स घाला आणि संपूर्ण मिश्रण पुन्हा एकदा मिस्करमध्ये बारीक करून घ्या. अशा प्रकारे तुमचा रस तयार होईल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यात लिंबाचा रसदेखील घालू शकता.