नवी दिल्ली : आपल्याकडे माठाच्या आल्हाददायक थंड पाण्यात वाळय़ाच्या मुळय़ा टाकून ते सुगंधी पाणी विशेषत: उन्हाळय़ात प्यायले जाते. अजूनही बहुतांश ठिकाणी पाण्यात वाळय़ाचा वापर केला जातो. वाळा हा उष्णताशामक, थंड आणि सुगंधी असतो. त्याचे आयुर्वेदिक फायदेही आहेत.
थोडय़ा प्रमाणात वापरलेल्या वाळय़ाने मिळणारे लाभ मात्र अनेक आहेत. उन्हाळय़ात आपल्या तब्येतीवर तसेच त्वचेवर परिणाम होत असतो. या काळात पाणी योग्य प्रमाणात पिण्याची नितांत गरज असते. या पाण्यात जर वाळा वापरला तर शरीर थंड राहण्यास मदत तर होतेच परंतु पचनशक्ती वाढण्यासही मदत होते.




आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात, की वाळा हा थंड आणि सुगंधी तर असतोच. त्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पचनशक्ती तर वाढतेच, तसेच ताप कमी होण्यासही मदत होते. जळजळ कमी होते. त्यामुळे वारंवार तहान न लागता, ती भागते. वाळा रक्तशुद्धिकरणही करतो. त्वचेच्या काही विकारांवर वाळा गुणकारी आहे. मूत्राशयाच्या समस्याही वाळय़ाने कमी होतात. मूत्र विसर्जना करताना जळजळ होणे, प्रमाण कमी होणे यावर वाळा उपयोगी आहे. एक लिटर उकळत्या पाण्यात वाळा घालून ते पाणी दिवसभर थोडे थोडे प्यावे. घामोळय़ा, अंगावर पित्त येणे, त्वचेवर लाल चट्टे येणे यावर वाळय़ाच्या चूर्णाचा लेप लावतात. वाळा दुर्गंधनाशक आहे. त्यामुळे उन्हाळय़ात घामाघूम झाल्याने शरीराला येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठीही वाळा वापरता येतो. वाळा घालून उकळलेले पाणी आपल्या स्नानाच्या पाण्यात मिसळावे. या पाण्याने आंघोळ केल्यास शरीराची दुर्गंधी दूर होते. वाळय़ाचे पडदे करून त्यावर पाणी मारले तर सभोवती गारवा वाढतो व आल्हाददायक वाटते.