डॉ. शारदा महांडुळे

कोणत्याही मसालेदार पदार्थाची किंवा आमटी, उसळ यांची चव वाढवायची असेल तर त्यावर खमंग कढीपत्त्याची फोडणी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे हवंच हवं. अनेक घरांमध्ये हमखास गृहिणी कोथिंबीरचा वापर करताना दिसतात. पदार्थाला एक हलकासा सुवास येण्यासोबतच पदार्थाची चवदेखील कोथिंबीरमुळे वाढते. परंतु केवळ सजावटीसाठी किंवा चव वाढविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोथिंबीरीचे अन्यही काही गुणकारी फायदे आहेत. ते आज आपण जाणून घेऊयात.

कोथिंबीर खाण्याचे फायदे –

१. कोथिंबीरीची चटणी शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. रोज जेवताना कोथिंबीरची चटणी खाल्ल्यास अपचन, आम्लपित्त, जेवणावरील इच्छा कमी होणे, पोटात गॅस होणे या सारख्या समस्या दूर होतात.

२. रोज सकाळी कोथिंबीरची १०-१२ पाने आणि पुदिन्याचे ७-८ पाने पाण्यात उकळून ते पाणी प्यावे. यामुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात.

३. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.

४. डोळ्यांची आग होत असेल,डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण झाली असतील तर अशा विकारांमध्ये कोथिंबीर गुणकारी आहे.

५. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि शारीरिक थकवा दूर करण्यासाठी २ चमचे धणे आणि अर्धा इंच आलं हे सारं एक ग्लास पाण्यात उकळावं. त्यानंतर या पाण्यात गुळ घालून ते आटवावे आणि तयार धण्याचा चहा प्यावा. त्यामुळे भूक वाढते.

६.आम्लपित्तामुळे घशामध्ये व छातीमध्ये जळजळ होत असेल व घशासी आंबटपाणी येत असेल तर एक चमचा धणेपूड व एक चमचा खडीसाखर (बारीक केलेली) यांचे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावे यामुळे आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.

७. कोथिंबीरच्या सेवनामुळे हातापायांची जळजळ कमी होते.

८. वजन नियंत्रणात राहते.

कोथिंबीरचे औषधी गुणधर्म –

कोथिंबीर शीत गुणात्मक, अग्नीदीपक पाचक, तृष्णाशामक मूत्रल आहे. तसेच तिच्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, अ, ब, क जीवनसत्त्व, पोटॅशिअम, प्रथिने, स्निग्धता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ असतात. या सर्व गुणधर्मामुळे कोथिंबीरीचा आहाराबरोबरच औषधी वनस्पती म्हणूनही वापर केला जातो.

डॉ. शारदा महांडुळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sharda.mahandule@gmail.com