वजन कमी करण्यासाठी आजकाल अनेकजण अधूनमधून उपवास ठेवतात. एखाददिवशी फळं किंवा उपवासाचे काही पदार्थ खाऊन उपवास केला जातो. जेणेकरून पोटाला थोडा आराम मिळतो. पण, अनेकजण आता वजन कमी करण्याच्या उद्देशाने उपवास ठेवताना दिसतात. नुकताच उपवास करण्याचे फायदे दर्शवणारा एक अभ्यास समोर आला, ज्यात असे दिसून आले की, अधूनमधून उपवास केल्याने स्मरणशक्ती मजबूत होते आणि अल्झायमरची लक्षणे कमी होण्यास मदत होते.
उपवास म्हणजे स्वेच्छेने अन्न सोडण्याची प्रक्रिया आहे. पण, आपल्या देशात धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि आरोग्यासंबंधित कारणासाठी उपवास ठेवला जातो. पण, उपवासाचे अनेक फायदे आहेत तसेच अनेक प्रकारही आहेत. ज्याचा तुमच्या आरोग्याला फायदा होतो. हे प्रकार कोणते ते जाणून घेऊ…
१) इंटरमिटेंट फास्टिंग (आयएफ) (केव्हातरी उपवास ठेवणे)
उपवासाचा हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. आजकाल बदलती जीवनशैली आणि बाहेरच्या पदार्थांमुळे अनेकजण लठ्ठपणाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयोग करत आहेत. यामध्ये लोक खाण्यात ठराविक काळाचा ब्रेक घेतात आणि बराच वेळ उपाशी राहतात. यासाठी १६.८ हा फॉर्म्युला वापरला जातो. त्यानुसार तुम्हाला १६ तास उपवास करायचा आणि ८ तासानंतर खायचे- प्यायचे. या १६ तासांच्या उपवासात फक्त पाणी, ब्लॅक कॉफी, साखर किंवा दूध न घातलेला चहा प्यावा लागतो.
२) एक्सटेंडेड फास्टिंग (२४ ते ७२ तासांसाठी उपवास ठेवणे)
या प्रकारच्या उपवासामध्ये बराच वेळ तुम्हाला न खाता-पिता राहावे लागते. या दरम्यान लोक सहसा २४ ते ७२ तास किंवा त्याहून अधिक वेळासाठी उपवास करतात. वजन कमी करण्यासारख्या आरोग्य फायद्यांसाठी बरेच लोक उपवास करतात.
३) वॉटर फास्टिंग (पाणी पिऊन उपवास ठेवणे)
उपवासाचा हा देखील एक लोकप्रिय प्रकार आहे, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अन्न न खाता केवळ पाणी प्यायले जाते. हा उपवास २४ तासांपासून ३ दिवसांपर्यंत असतो. सहसा लोक वजन कमी करण्यासाठी हा उपवास करतात . त्याचबरोबर काही लोक धार्मिक श्रद्धेमुळेदेखील अशाप्रकारचा उपवास ठेवतात.
४) पार्शियल फास्टिंग (आंशिक उपवास)
या प्रकारच्या उपवासामध्ये पूर्णपणे उपाशी राहत नाही; परंतु विशिष्ट प्रकारचे अन्नपदार्थ आणि कॅलरीज असलेले पदार्थ टाळले जातात. याचे उदाहरण म्हणजे डॅनियल फास्ट, ज्यामध्ये लोक दूध, दही, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि मिठाई खाणे टाळतात.
५) रिलीजियस फास्टिंग (धार्मिक उपवास)
उपवासाचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे रिलीजियस फास्टिंग. ज्यामध्ये अनेक धर्म आध्यात्मिक साधना म्हणून गुंतलेले असतात. या दरम्यान लोक आपापल्या समजुतीनुसार खाण्यापिण्याशिवाय उपवास करतात आणि नंतर त्या श्रद्धेनुसार अन्न खातात.