नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित मोसमी पाऊस म्हणजे पावसाळा असह्य उन्हाळय़ाच्या उष्म्यातून सुटका करतो खरा, परंतु या काळात आरोग्य चांगले राखणेही गरजेचे आहे. या काळात आपली पचनक्षमता कमकुवत होते.

या काळात खूप खाल्ल्यास पचन मंदावते, त्यामुळे आम्लपित्त, अपचन होते. तर रस्त्यावरील फळांचे रस, चाट खाल्ल्यास आतडय़ात संसर्गाचा धोका असतो.  बाहेरच्या अन्नात वापरलेले पाणी जिवाणूंनी दूषित असू शकते, त्यामुळे पावसाळय़ात हे पदार्थ खाणे शक्यतो टाळावेत. बाटलीबंद पाणी किंवा पाणी शुद्धीकरण यंत्रणेतील पाण्याचा अपवाद वगळता साध्या जलस्रोतातील पाण्यामुळे अतिसार होण्याचा धोका असतो. अन्नातून विषबाधेसह आतडय़ांना सूज येण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विषमज्वर वगैरे होण्याची शक्यता असल्याने पावसाळय़ात भाजीपाला, धान्य योग्यरीत्या स्वच्छ करून घ्यावे. शक्यतो घरचेच अन्न खावे. तज्ज्ञ सांगतात की, ताक, चीज, सोयाबीनसारखे पदार्थ आहारात घ्यावेत. त्यात चांगले जिवाणू असतात. त्यामुळे पचनक्षमता सुधारते व रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. या काळात पुरेसे पाणी प्यावे. त्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात व पचनसंस्था निरोगी राहते.  कच्च्या पालेभाज्या खाणे टाळावे. त्या उकडून, शिजवूनच खाव्यात. नळाचे पाणी थेट न पिता. ते शुद्ध करून प्यावे. अथवा उकळून थंड केलेले पाणी प्यावे. अशा घरच्या पाण्याची बाटली बाहेर जाताना सोबत ठेवून, तेच पाणी प्यावे. समुद्रातील अन्न (सी फूड) टाळावे. या काळात ते दूषित असू शकते. ते खाल्ल्याने अतिसार होण्याचा धोका आहे.