scorecardresearch

आरोग्यवार्ता :  ठरावीक व्यक्तींकडे डास जास्त आकर्षित होतात?

आपल्या त्वचेवरील सूक्ष्म जीव आपल्या शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या रसायनांवर परिणाम करत असतात.

आरोग्यवार्ता :  ठरावीक व्यक्तींकडे डास जास्त आकर्षित होतात?
(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : डास काही व्यक्तींना जास्त चावणे पसंत करतात का? जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी समूहाने उभे असू, तेव्हा काही व्यक्तींभोवती डास जास्त घोंगावतात. त्यांना अधिक चावतात. यावर शास्त्रीय संशोधनही करण्यात आले आहे.

नवी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयाचे संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. लक्ष्मण जेस्सानी यांनी सांगितले, की या संदर्भात विविध अभ्यासांचे वेगवेगळे निष्कर्ष आहेत. डास ‘ओ’ रक्तगटाच्या व्यक्तींकडे जास्त आकर्षित होतात. ‘अ ’ रक्तगटाकडे ते तुलनेने कमी आकर्षित होतात. अमेरिकेतील एका अभ्यासानुसार ‘ओ’ रक्तगटाच्या व्यक्तींना डास जास्त चावत असले तरी इतर रक्तगटांच्या व्यक्तींच्या तुलनेत ‘ओ’ रक्तगटाच्या व्यक्तींना मलेरिया जंतूचा वाहक ‘अ‍ॅनोफेलिस’ डास चावल्याने मलेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. ज्या व्यक्तींच्या पायांवर वगैरे जास्त जीवाणूंचे अस्तित्व असते अशांकडे डास जास्त आकर्षित होतात. ज्यांच्या शरीरावर सूक्ष्मजीवांची विविधता असते त्यांच्याकडे डास कमी आकर्षित होतात.

आपल्या त्वचेवरील सूक्ष्म जीव आपल्या शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या रसायनांवर परिणाम करत असतात. आपल्या घामातील संयुगांमध्ये हे जंतू बदल घडवतात. त्यातील काही डासांना आकर्षित करतात. तर काहींमुळे डास आकर्षित होत नाहीत. ‘नेचर’ मासिकात मेमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातील निष्कर्षांनुसार ‘डेकॅनल’ व ‘अनडेकॅनल’ या मेदद्रव्यांच्या वासामुळे डास आकर्षित होतात. विविध व्यक्तींतील त्याचे प्रमाण कमी-जास्त असते. त्यामुळे डास त्या कमी-अधिक प्रमाणात त्यांच्याकडे आकर्षित होतात. ‘रॉयल सोसायटी ओपन सायन्स’च्या अभ्यासानुसार तीन प्रकारचे रोगवाहक डास ‘कार्बन डाय ऑक्साईड’मुळे आकर्षित होतात. मानवासह अनेक प्राणी ‘कार्बन डाय ऑक्साईड’, उष्णता आणि बाष्प आपल्या श्वसनावाटे बाहेर टाकत असतात. त्याकडे डास आकर्षित होतात. ‘न्यू मेक्सिको स्टेट युनिव्हर्सिटी’तर्फे २०१५ मध्ये झालेल्या अभ्यासानुसार मादी डास मानवी शरीरात निर्माण होणाऱ्या तीव्र दर्पाच्या रसायनांकडे आकर्षित होतात. लॅक्टिक आम्लाच्या स्त्रावामुळेही काही डास ठरावीक व्यक्तींकडे आकर्षित होतात.

कारणे काहीही असोत, सध्याच्या डेंग्यूच्या साथीच्या काळात कोणत्याही प्रकारे डासांना आपल्याकडे आकर्षित होऊ देऊ नका. डास प्रतिबंधक लोशन, क्रीम त्वचेवर लावा. आपल्या भागात डास निर्मूलनासाठी पालिका-महापालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना बोलवा. डासांची पैदास वाढवणारी डबकी, रिकाम्या कुंडय़ा, टायर असतील तर त्यांचा नायनाट करा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या