9 Things Eyes Tell You About Health : डोळे हे तुमच्या दृष्टीचा आरसा नसून शरीराच्या आरोग्याचे अचूक संकेतदेखील वेळोवेळी देत असतात. जेव्हा शरीरात कोणतीही समस्या असते तेव्हा त्याचा परिणाम पहिला डोळ्यांमध्ये दिसून येतो. झोपेचा अभाव, थकवा, ताणतणाव, मूत्रपिंडाच्या समस्या, जीवनसत्त्वे, खनिजांची कमतरता यांसारख्या समस्या डोळ्यांच्या तेजस्वीपणा आणि आरोग्यावर परिणाम करू शकतात. कधीकधी डोळ्यांमध्ये दिसणारे बदल जसे की, काळी वर्तुळे, सूज, पिवळेपणा किंवा अस्पष्टता ही शरीरातील लपलेल्या आजारांची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे तज्ज्ञ म्हणतात की, डोळ्यांमधील लहान बदलांकडे दुर्लक्ष करू नका, कारण ते तुमच्या शरीराच्या आतल्या आरोग्याचे प्रतिबिंब असतात.

डोळे केवळ भावनाच व्यक्त करत नाहीत तर शरीरात काय घडत आहे हे देखील वारंवार आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतात. पोषणतज्ज्ञ दीपशिखा शर्मा यांनी अलीकडच्या पोस्टमध्ये स्पष्ट सांगितले की, डोळे शरीरातील पौष्टिक कमतरता आणि आजारांची सुरुवातीची लक्षणे दर्शवत असतात, त्यामुळे प्रत्येक लक्षणाकडे लवकरात लवकर लक्ष दिल्यास मोठ्या आरोग्य समस्या टाळता येतात.

डोळ्यांची कोणती लक्षणे, कोणते आजार दर्शवतात?

डोळे पिवळे दिसणे – डोळे थोडेसे पिवळे दिसणे हे यकृतावरील ओव्हरलोड किंवा पित्त प्रवाह कमी असल्याचे लक्षण असू शकते. या यकृताच्या समस्येवर उपचार करण्यासाठी तुमच्या आहारात आवळा, बीट आणि हळद यांचा समावेश करा. हे पदार्थ यकृताला विषमुक्त करतात आणि डोळ्यांची नैसर्गिक चमक पुन्हा परत आणतात.

डोळ्यांजवळ लहान मुरूम – पापण्यांवर किंवा डोळ्यांभोवती मऊ, पिवळे ठिपके किंवा मुरूमे दिसणे हे रक्तातील उच्च एलडीएल कोलेस्ट्रॉलचे लक्षण आहे. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची ही चिन्हे तुमच्या हृदयाच्या आरोग्याला धोका असल्याचे स्पष्ट संकेत देतात. खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी तुमच्या आहारात ओट्स, लसूण, अक्रोड यांचा समावेश करा. हे खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास आणि निरोगी त्वचा राखण्यास मदत होते.

फिकट पापण्या – जर खालच्या पापण्यांचा आतील भाग गुलाबी ऐवजी पिवळा किंवा पांढरा दिसत असेल तर ते अशक्तपणाचे लक्षण आहे. पांढऱ्या पापण्या स्पष्टपणे अशक्तपणा दर्शवतात. या कमतरतेवर मात करण्यासाठी तुमच्या आहारात बीट, डाळिंबाचा समावेश करा. या फळांचे रस स्वरूपात सेवन केल्याने लोहाची कमतरता दूर होण्यास मदत होईल आणि पुरेसे व्हिटॅमिन सी मिळेल.

काळी वर्तुळे – डोळ्यांखालील काळी वर्तुळे केवळ झोपेच्या कमतरतेमुळेच नव्हे तर लोहाच्या कमतरतेमुळेदेखील जाणवतात. काळी वर्तुळे दूर करण्यासाठी मोरिंगा पावडर, भिजवलेले मनुके खा; यामुळे त्वचेला ऑक्सिजन देण्यास आणि काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.

अस्पष्ट दिसणे – डोळ्यांनी अस्पष्ट दिसणे व्हिटॅमिन एच्या कमतरतेचे लक्षण आहे. व्हिटॅमिन एची कमतरता आहाराद्वारे दूर केली जाऊ शकते. तुमच्या आहारात मोरिंगाची पाने, आवळा, तूप समाविष्ट करा; या पदार्थांचे सेवन केल्याने तुमची दृष्टी सुधारू शकते.

डोळे फुगलेले दिसणे – डोळे फुगलेले दिसणे हे हायपोथायरॉईडीझमचे लक्षण असू शकते. जर तुम्हालाही असे जाणवत असेल तर ताबडतोब थायरॉईडची चाचणी करा आणि आहारात बदल करा. तुमच्या आहारात जवसाच्या बिया, ब्रोकोली आणि अंड्यातील पिवळा भाग समाविष्ट करा. हे पदार्थ खाल्ल्याने तुमचा थायरॉईड संतुलित होण्यास मदत होते आणि जळजळ नियंत्रित होते.

डोळ्यांतून पाणी येणे – जळजळ न होता डोळ्यातून पाणी येणे व्हिटॅमिन बी२ (रायबोफ्लेविन) च्या कमतरतेचे लक्षण आहे. या व्हिटॅमिनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुमच्या आहारात बदाम, दूध, मशरूमचा समावेश करा. हे पदार्थ डोळ्यामध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास आणि तुमचे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात.

डोळे मिचकावणे – वारंवार डोळे मिचकावणे हे मॅग्नेशियमच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. मॅग्नेशियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुमच्या आहारात भोपळ्याच्या बिया, केळी, पालक यांचा समावेश करा; त्यामुळे हे पदार्थ नसा आणि स्नायूंना आराम देतात.

डोळ्यांना सूज येणे – सकाळी डोळे सुजलेले वाटणे हे जास्त मिठाचे सेवन आणि पाणी साचल्याचे लक्षण आहे. ही समस्या असल्यास डोळे पाण्याने धुवा आणि तुमच्या आहारात काकडी, टरबूज, धणे यांचे पाणी समाविष्ट करा. हे पदार्थ शरीरातील अतिरिक्त मीठ काढून टाकण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करतात.