सिगारेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक असते हे सर्वांना माहीत असले तरी अनेक जण सकाळी उठल्यापासून सिगारेट ओढण्यास सुरुवात करतात. रोज सकाळी जशी चहा, कॉफी पिण्याची अनेकांना तलफ असते. तसेच सिगारेटबाबतही होते. त्यामुळे सकाळी उठल्यावर फ्रेश होण्याआधीच काही जण सिगारेट ओढतात; मात्र ही सवय शरीरासाठी खूप घातक ठरत आहे. संशोधकांना असे आढळून आले आहे की, सकाळी धूम्रपान केल्याने तोंड आणि फुप्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.

सकाळी धूम्रपान करणे हेदेखील तीव्र व्यसनाचे लक्षण आहे. बरेच लोक उठल्यानंतर किंवा न्याहारी करताना किंवा ऑफिसचे काम सुरू करण्यापूर्वी सिगारेट ओढतात. ही सवय प्राणघातक आणि अत्यंत धोकादायक आहे; विशेषतः तरुणांसाठी ही सवय खूप घातक ठरतेय.

संशोधकांना असेही आढळले आहे की, झोपेतून उठल्यानंतर ३० मिनिटांच्या आत धूम्रपान केल्याने तोंड आणि फुप्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.

झोपेतून उठल्यानंतर लगेच सिगारेटचे सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या रक्तात एनएनएएल – तंबाखूतील विशिष्ट कार्सिनोजेन एनएनकेचा एक मेटाबोलाइटचा स्तर जे झोपेतून उठल्यानंतर अर्धा तास किंवा त्याहून अधिक काळ धूम्रपान करणे टाळतात, त्यांच्यापेक्षा अधिक असतो. भलेही त्या व्यक्ती दिवसभर कितीही सिगारेट ओढत असल्या तरीही त्यांच्या शरीरावर होणारा परिणाम तुलनेने कमी असतो, असे पेन ‘स्टेटच्या बायोबिहेव्हियरल हेल्थ’चे सहायक प्राध्यापक स्टीव्हन ब्रॅनस्टेटर म्हणाले. हे संशोधन कॅन्सर, एपिडेमिऑलॉजी, बायोमार्कर्स अॅण्ड प्रिव्हेन्शन या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

सकाळी सिगारेट ओढण्याची इच्छा कशामुळे होते?

धूम्रपान व्यसनाच्या आहारी गेलेले लोक काही वेळा रात्रभर या व्यसनापासून दूर राहतात. पण, जेव्हा ते सकाळी उठतात तेव्हा त्यांच्या रक्तातील निकोटिनची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते. त्यांचे न्यूरोसेप्टर्स त्यांना सिगारेट ओढण्यास प्रवृत्त करतात; पण तरीही तुम्ही धूम्रपान करण्याच्या व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कारण- त्याचे शून्य फायदे आणि बरेच धोके आहेत. तुम्ही सकाळी धूम्रपान करीत असल्यास ही सवय सोडण्यास तुम्ही खालील काही उपाय करून पाहू शकता.

धूम्रपानासंबंधित गोष्टींपासून दूर राहा

सिगारेट ओढण्याच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या घरात किंवा बेडरूममध्ये असलेले सिगारेटचे पॅकेट फेकून द्या. पुढे तुम्ही कामावर जाण्यासाठी जेव्हा बाहेर पडता तेव्हा तुमच्या कारमध्ये, खिशात किंवा बॅगमध्ये सिगारेट किंवा लायटर नाही ना हे तपासा. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत म्हणजे ज्यांना सिगारेट ओढण्याचे व्यसन नाही अशा व्यक्तींबरोबर प्रवास करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्ही तुमच्या कृतींवर नजर ठेवत सिगारेट विकत घेण्यापासून आणि पेटवण्यापासून स्वत:ला रोखण्यास मदत करू शकता. तुम्ही सकाळी घराबाहेर पडल्यानंतर ज्या व्यक्तीबरोबर धूम्रपान करता, त्यांच्यासोबत प्रवास करणे टाळा. असे करताना तुम्हाला त्रास होऊ शकतो; पण तुम्ही व्यसनापासून दूर राहू शकता.

सकाळी उठल्यावर रोज एक ग्लास पाणी प्या

जर सकाळी उठल्यानंतर सिगारेट ओढण्याची सवय असेल, तर ती एक ग्लास पाण्याने बदला. त्यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहील; शिवाय वाईट सवयीपासूनही मुक्तता मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्यायाम करा

तुमची सकाळी सिगारेट ओढण्याच्या बदल्यात आणखी एक निरोगी सवय लावू शकता आणि ती सवय म्हणजे व्यायाम. सकाळच्या वेळी व्यायाम केल्याने तुमचे मन दिवसभर आरोग्यदायी निवडी करण्यास प्रवृत्त करील. शारीरिक हालचालींमुळे तुमच्या मेंदूच्या एन्डॉर्फिन नावाच्या न्यूरोट्रान्समीटरचे उत्पादन वाढविण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला काही वेळ का होईना सिगारेटच्या सवयीपासून दूर राहता येईल.