Superfood to consume after menopause: मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती हे प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळण असते. मेनोपॉजदरम्यान खूप जास्त गरम होणं, खूप घाम येणं आणि मूड स्विंग्स होणं या साधारण बाबी आहेत. मात्र, प्रत्येक महिला या टप्प्यावर कशाप्रकारे परिस्थिती सांभाळते यामुळे तिच्या आयुष्यावर खूप फरक पडतो. अनेकदा महिलांचं आरोग्य मेनोपॉजनंतर दुर्लक्षित होऊन जातं. थकवा, झोप न लागणे, हाडांच्या समस्या किंवा मूड स्विंग्ससारख्या समस्या फक्त वाढत्या वयामुळे होणारे परिणाम असं बोलून दुर्लक्षित केले जातात. मात्र, मेनोपॉजनंतर महिलांनी त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असते.
पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनिस्ट आणि डायबिटीज एज्युकेटर दीपशिखा जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेनोपॉजच्या टप्प्यावर शरीरात हार्मोनल बदल अधिक गतीने होत असतात. त्यामुळे हाडं ठिसूळ होणं, रक्ताची कमतरता अर्थात अॅनिमिया, हार्मोनल असंतुलन आणि झोपेत अडथळे या समस्या सामान्यपणे उद्भवतात. अशावेळी तुमच्या डाएटमध्ये काही खास सुपरफूड्सचा समावेश केल्यास तर या समस्यांपासून सुटका नक्कीच होऊ शकते. अशा चार सुपरफूड्सबाबत जाणून घेऊ, जे मेनोपॉजनंतर प्रत्येक महिलेने आहारात समाविष्ट करणे गरजेचे आहे.
अळशी
मेनोपॉजनंतर हार्मोनल असंतुलन ही महिलांमध्ये सर्वात मोठी समस्या असते. यामुळे हॉट फ्लॅश, मूड स्विंग, घाम येणे आणि अस्वस्थता अशा समस्या समोर येतात. यावर अळशीचा समावेश आहारात करणं फायदेशीर ठरेल. अळशीमध्ये फायटोएस्ट्रोजेन असते, ते हार्मोन्सला संतुलित करण्याचं काम करतं. अळशीच्या नियमित सेवनाने मेनोपॉजनंतर हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते.
नाचणी
मेनोपॉजनंतर कॅल्शियमची कमतरता आणि ऑस्टियोपोरोसिसचा वाढता धोका संभवतो. त्यामुळे हाडे आणि सांध्यांच्या मजबूतीसाठी नाचणीचे सेवन उत्तम ठरते. नाचणीमध्ये दूधापेक्षाही जास्त कॅल्शियम असते. सांधेदुखी, हाडांमध्ये कमतरता आणि ऑस्टियोपोरोसिसवर उपाय म्हणून नाचणीचे सेवन महत्त्वाचे ठरते. नाचणीमध्ये आयर्न आणि फायबर असल्याने ते पचनास आणि रक्तासंबंधित आरोग्य दोन्हीसाठी फायदेशीर ठरते.
डार्क चॉकलेट
मेनोपॉजनंतर महिलांना चिडचिडेपणा, डिप्रेशन आणि झोपेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी आनंदी राहण्यासाठी आणि चांगली झोप मिळवण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन फायदेशीर ठरते. डार्क चॉकलेटमधील अँटी-ऑक्सिडंट्स ब्रेन सर्क्युलेशन उत्तम ठेवतात. यामध्ये असलेले नॅचरल केमिकल्स एंडोर्फिन रिलीज करतात, त्यामुळे मूड चांगला राहतो. डार्क चॉकलेटमधील मॅग्नेशियम झोपेची गणुवत्ता सुधारते आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करते.
बीट आणि खजूर
मेनोपॉजनंतर महिलांमध्ये रक्ताची कमतरता म्हणजेच अॅनिमियाची समस्या ही उद्भवतेच. कारण मेनोपॉजनंतर शरीरात लोहाची कमतरता जाणवते. यावर उपाय म्हणून बीट आणि खजूरचं सेवन करणं योग्य ठरतं. बीट आणि खजूर या दोन्हीमध्ये लोह असते. याच्या नियमित सेवनाने हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि थकवा दूर होण्यास मदत होते.