Carrom Seeds And Black Salt: आजकाल अनेक लोकांना छातीत जळजळ, आम्लपित्त, ढेकर येणं, अपचन आणि पोटफुगी यासारख्या समस्यांचा सामना वारंवार करावा लागतो. या सगळ्यामागे धावपळीची जीवनशैली, अवेळी जेवण, आहारात पौष्टिक पदार्थांचा अभाव अशी अनेक कारणं आहेत. यापासून आराम मिळवण्यासाठी लोक अनेक प्रकारची औषधे, सोडायुक्त पेय घेतात. त्यामुळे तात्पुरता आराम मिळतो, मात्र त्याने अनेकदा शरीराचं नुकसानही होऊ शकतं.
अशा परिस्थितीत या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही ओवा आणि काळ्या मीठाचा वापर करू शकता. यामुळे तुमची पचनसंस्था सुधारते आणि दीर्घकाळात या समस्या उद्भवण्यापासून रोखता येते.
आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचे तज्ज्ञ डॉ. सलीम झैदी यांनी दि इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, ओव्यामध्ये थायमॉल नावाचा एक घटक असतो, जो पोटात जठरासंबंधी रसांचे स्त्राव वाढवतो. यामुळे पचन सोपे होते आणि अपचन, गॅस आणि पोटफुगीसारख्या समस्या कमी होतात. काळ्या मीठासोबत त्याचे सेवन केल्याने ते आणखी प्रभावी ठरते. १५ दिवस नियमितपणे याचे सेवन केल्यास पचनसंस्था मजबूत होते आणि पोटाच्या समस्या मोठ्या प्रमाणात दूर होतात.
ओवा आणि काळ्या मीठाचे सेवन कसे करावे?
डॉ. सलीम झैदी यांच्या मते, तुम्ही ओवा आणि काळे मीठ पावडर स्वरूपात देखील खाऊ शकता. हे करण्यासाठी सर्वात आधी ओवा मंद आचेवर भाजून घ्या. त्यानंतर हे मिश्रण हवाबंद डब्यात ठेवा. तुम्ही दररोज जेवणानंतर सुमारे १५ ते २० मिनिटांनी अर्धा चमचा ओवा कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. यामुळे पचन सुधारते आणि छातीत जळजळ, आम्लता, ढेकर येणं, अपचन आणि पोटफुगीसारख्या समस्या लगेच कमी होतात.
ओव्याचं पाणी
तुम्ही ओव्याचं पाणीसुद्धा पिऊ शकता. एक ग्लास पाण्यात दोन चमचे ओवा टाकून ते उकळून घ्या. कोमट झाल्यावर पाणी गाळून घ्या आणि ते प्या. ओव्याचं पाणी तुम्ही सकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणानंतर घेता येईल. ते पोटातील उष्णता, गॅस आणि आम्लता कमी करते.
