राजधानी दिल्ली एका भयावह हत्याकांडाने पु्न्हा एकदा हादरली आहे. दिल्लीच्या ईशान्य भागात एका १६ वर्षीय मुलाने १७ वर्षीय तरुणाची चाकूने भोकसून निघृणपणे हत्या केली. चोरीच्या उद्देशाने अल्पवयीन मुलाने तरुणावर चाकूने ५० वार केले. एवढ्यावरचं तो थांबला नाही, तर त्याने मृतदेहच्या केसांना पकडून तो ओढत नेला आणि त्याच्याजवळ नाचू लागला. या घटनेचे व्हायरल झालेले सीसीटीव्ही फुटेज पाहून लोक हैराण झाले आहेत. यातील अल्पवयीन गुन्हेगाराने तरुणाची हत्या केल्यानंतर त्याच्या खिशातील ३५० रुपयेही लुटले.
पण, केवळ ३५० रुपयांसाठी झालेल्या निर्दयी घटनेमुळे राजधानी दिल्लीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण ही पहिलीच घटना नाही, यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या, ज्यात अवघ्या काही रुपयांसाठी व्यक्ती हत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. विशेषत: यात तरुण वर्गाचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे अशा निघृण हत्या करण्याची हिंमत हल्ली तरुणांमध्ये कशामुळे वाढतेय? त्या मागची कारणं काय? याविषयी Insight mind Care center चे संस्थापक आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. शैलेश उमाटे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
१) तरुण मुलांमध्ये अशा गुन्हेगारीचे प्रमाण कशामुळे वाढतेय?
- गुन्हेगारीच्या घटनांकडे वळलेल्या तरुणांच्या अशा वागण्यामागे काही सामाजिक परिस्थिती, मानसिक आणि जेनेटिक फॅक्टर्स कारणीभूत असतात. अशा तरुणांचा लहानपणापासून भावनिक विकास योग्य पद्धतीने होत नाही, ज्यामुळे लहान वयापासून तरुण वयात आल्यानंतरही त्यांना दुसऱ्यांची भावना कशी जपावी, त्यांचा आदर करणे जमत नाही. ते लहानपणापासूनच प्रत्येकाशी अपमानास्पद वागतात. यात एखाद्याला जाणूनबुजून त्रास देणे हे गुन्हेगारी करणाऱ्या लोकांना सहज जमतं. त्यांच्यात हळवेपणा नसतो. दुसऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत ते बेफिकीर असतात. केवळ बाहेरच्या लोकांसोबतच नाही तर घरच्यांबरोबरही ते अशाचप्रकारे वागतात. स्वत:च्या स्वार्थासाठी आई, वडील, बहीण, भावांना त्रास देतात. हा त्रास छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरू होतो. अशाने ते मनाने निगरगट्ट आणि कठोर होतात. दुसऱ्यांना त्रास देण्यात त्यांना मज्जा येते, हेच जीवन आहे असे त्यांना वाटते. यातून ते समोरच्याला मी किती पाॅवरफूल आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करतात. यातून ते चोरीमारी, खोटं बोलणं यासह वाममार्गाकडे वळतात. अशा वाईट गोष्टींना लहानपणापासूनच सुरुवात होते.
उदा. शाळेत, घरात खोटं बोलणं. घरातल्यांचे, बाहेरच्यांचे पैसे चोरणं, दुसऱ्यांना त्रास देणं, प्राण्यांना इजा करणं, लहान मुलांना त्रास देणं यातून त्यांची डेव्हलमेंट होत राहते.
२) हा कोणता मानसिक आजार आहे का?
- अशाप्रकारच्या वागण्याला ‘कंडक्ट डिसऑर्डर’ असे म्हणतात. मुलं जशी मोठी होतात, तशी त्यांच्यातील आत्मकेंद्रीपणा वाढतो. यामुळे मुलांमध्ये मीपणा येतो. म्हणजे मला जे पाहिजे ते पहिल्यांदा. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. इतरांना त्रास देऊन, रडून, खोटं बोलून, अपप्रचार करून, मारुन-मुटकून गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात; ज्याला ‘फिजिकल ॲब्यूस’ असे म्हणतात. लहानपणापासून त्यांना खून किंवा दुसऱ्यांना शारीरिक इजा करणं अशा गोष्टी चुकीच्या आहेत याची जाणीव नसते. पण, पालकांनी अशा मुलांना लहानपणापासून वाईट गोष्टींची जाणीव करून दिली पाहिजे. चोरी किंवा मारामारी करणे चुकीचे आहे हे समजावून सांगितले पाहिजे, वेळप्रसंगी शिक्षा केली पाहिजे. पण, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांना असे वातावरण मिळत नाही, त्यामुळे त्यांना चांगल्या वाईट गोष्टींची समज नसते.
- काहीवेळा मुलांच्या चुकीच्या वागण्याचा पालकांकडून उदो-उदो केला जातो, ज्यामुळे मुलं अजून त्या गोष्टी करण्यास प्रवृत्त होतात. यात काहीवेळा पालकांना मुलांसाठी वेळ नसतो, असला तरी काही पालक आपापसात सतत भांडत असतात. अनेकदा वडील व्यसनाधीन असतात, ज्यामुळे मुलं पालकांना रोज भांडताना, मारहाण करताना पाहतात. काहीवेळा पालक एकमेकांना शारीरिक इजा करेपर्यंत भांडतात, अशा वातावरणामुळे मुलंही पालकांचे अनुकरण करतात. घरातील अशा वाईट वातावरणामुळेच अनेक मुलं वाईट मार्गाकडे वळतात, कारण लहान मुलं अनेक गोष्टी आपल्या आई-वडिलांकडूनच शिकत असतात. अतिशय गरीब असलेल्या कुटुंबात अनेकदा अशा गोष्टी पाहायला मिळतात. पण, श्रीमंतांच्या घरात या गोष्टी होत नाही अशी गोष्ट नाही. त्यामुळे आजूबाजूचे वातावरण, व्यक्तीचा स्वभाव आणि संगत या गोष्टी व्यक्तीच्या वाईट विकृतीमागील कारण ठरू शकतात.
- गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला होणारा त्रास फार कमी वेळासाठी असतो. ही लोकं आत्ता मला काय पाहिजे याचा विचार करतात. पण, एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील, त्याचा काय त्रास होईल याचा ते विचार करत नाहीत.
३) क्राईम शो, सीरिज बघून अशा हत्या केल्या जातात का?
- क्राईम शो, सीरियलसह अनेक चित्रपट बघून अनेकजण गुन्हेगारी कृत्य करताना दिसतात. यात गुन्हेगारी कृत्ये अतिशय ग्लॅमराइज करून दाखवल्या जातात. गुन्हेगारीच्या मार्गाने अभिनेता, अभिनेत्रीने एखाद्याला न्याय मिळवून दिला असे दाखवले जाते. यामुळे काही तरुण चित्रपटातील नायक, नायिकेला रोल मॉडेल म्हणून पाहतात. त्यांच्याकडे ते आकर्षित होतात. यावेळी तरुणांमध्ये लहानपणापासून विकसित झालेले काही अंतर्गत गुण त्यांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यास भाग पाडतात. पण चित्रपट, सीरियलमधील गोष्टी चुकीच्या असतात हे अशा मुलांना सांगितले जात नाही किंवा सांगितल्यानंतरही ते त्याचा विचार करत नाहीत.
- गुन्हेगारीकडे जाणाऱ्या या प्रवृत्तीला मानसशास्त्रीय भाषेत ‘अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ असे म्हणतात. यात व्यक्ती इतरांना त्रास देते. त्यांच्याशी वाईट वागते. स्वत:ची चूक असतानाही दुसऱ्यांना त्रास देते. यात समाजात गुण्यागोविंदाने राहण्यासाठी असलेल्या चालीरिती, नियम या व्यक्ती मानत नाहीत. यात ते चोरी, मारहाण, इतरांचे नुकसान करणे अशा प्रकारची कृत्ये व्यक्ती करतो. स्वतःच्या कृत्यांची शिक्षा बाकीच्यांनाही मिळावी अशी इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. प्रत्येक गोष्टीत ते स्वत:चा फायदा पाहतात, पण त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होईल हे पाहत नाहीत. यात व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला चापट मारणे, हाडं तुटेपर्यंत मारहाण करणे ते खून, निर्घृण हत्या करण्यापर्यंतची मजल गाठतात.
४) तरुणांमध्ये राग येण्याचं प्रमाण दिवसेंदिवस का वाढतेय?
- आजकाल तरुणांना काही बोललं तरी खूप राग येतो. कारण असे की, १० ते १७ वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींमध्ये अनेक हार्मोन्स बदल होतात. यामुळे त्यांच्या वागण्या- बोलण्यात, स्वभावात अनेक बदल दिसून येतात. कधीकधी हिंसक बनतात. कधी रागाच्या भरात त्यांचा संयम सुटतो आणि ते अशी जीवघेणी पावलं उचलतात.
- मानसिक तणाव, कौटुंबिक तणाव, चांगले कौटुंबिक वातावरण नसणे किंवा कुटुंबातील लोकांना मानसिक आजार असणे, पालकांमधील भांडणं, सोशल मीडियाचा अतिवापर अशी अनेक कारणं असू शकतात. यात जर एखाद्या मुलाला त्याच्या बालपणाच्या सुरुवातीच्या काळात मानसिक नैराश्य, चिंता किंवा बायपोलर डिसऑर्डर सारख्या समस्या असतील तर भविष्यात ही समस्या आणखी वाढते. त्यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता वाढते. लैंगिक छळासारखी कोणतीही घटना काही तरुणांबरोबर घडली असेल तर त्यामुळे जास्त राग येऊ शकतो. अशावेळी तो राग व्यक्त करण्यासाठी तरुण खून, हत्या यासारखे टोकाचं पाऊल उचलतो.
- व्यक्ती रागात असला तरी कुटुंबातील व्यक्तींनी त्याला समजावणे गरजेचे आहे, यात राग येणे शरीरासाठी, आरोग्यासाठी किती घातक आहे समजावून सांगितले पाहिजे, ज्यामुळे त्यांचा राग शांत होण्यास मदत होते. पण काही मुलांची लहानपणापासूनच अशी समजूत काढणारे कोणी नसते किंवा पालक काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे ते अशाप्रकारच्या चुका करतच राहतात.
६) तरुणांना अशा गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी काय केले पाहिजे?
- गुन्हेगारी विश्वाकडे वळणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. यात सर्वप्रथम पालकांनी जागरुक राहणे गरजेचे आहे. गरीब, श्रीमंत अशा दोन्ही वर्गातील पालकांनी मुलांच्या वागण्याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. मुलांनी लहान वयात चोरी केली, तर त्याला असे पुन्हा करू नये म्हणून योग्य समजावून सांगणेही महत्त्वाचे आहे, वेळप्रसंगी योग्य शिक्षा केली पाहिजे. मुलांना वारंवार वाईट गोष्टी करू नये म्हणून समजवत राहिले पाहिजे, कारण लहान मुलं अनेक गोष्टी पटकन विसरतात.
- अनेकदा मुलाने चुकीची गोष्ट केली म्हणून पालक मरेस्तोवर मारतात. पण, त्यानंतरही मुलं चुकीचे वागणं सोडत नाही, त्यामुळे पालकांनी अशा गोष्टी करण्यापेक्षा मुलांच्या कलेने त्यांना समजून घ्या. चुकीच्या गोष्टीची त्यांना योग्य ती शिक्षा केली पाहिजे, तसेच यासाठी योग्यवेळी योग्य समज दिली पाहिजे. कडक शिक्षा करूनही ते सुधारत नसतील तर आजूबाजूचे शिक्षित, सुसंस्कृत व्यक्ती, डॉक्टर, सायकोलॉजिस्टची मदत घ्या. अशाने त्यांची योग्य वेळेतच समजूत काढता येईल आणि त्यांना गुन्हेगारी विश्वात जाण्यापासून रोखता येईल. अशावेळी मुलांना योग्य समज देण्याची सुरुवात घरात वा शाळेपासून झाली पाहिजे.
- उच्चशिक्षित – अशिक्षित, गरीब- श्रीमंत अशा चारही प्रकारच्या लोकांमध्ये अशी गुन्हेगारी प्रवृत्ती पाहायला मिळते. कारण ही मानवी प्रवृत्ती आहे. तिला वयाचे, शिक्षणाचे, गरीब- श्रीमंतीच्या मापात मोजता येत नाही; कारण प्रत्येक व्यक्तीनुसार ती भिन्न असू शकते. खेड्यातील लोकांमध्येही समाजात कसे वागायचे, बोलायचे हे कळते. त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीला गरीब, श्रीमंत अशाप्रकारे तोलता येत नाही.
- अनेकदा पालकांना कळत नाही की, आपल्या मुलाने केलेली गोष्ट चुकीची किंवा गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी आहे. त्यामुळे पालक आपल्या मुलांच्या वाईट गोष्टीदेखील फुशारकीने सांगतात. अनेकदा पालक मुलांच्या वाईट गोष्टी त्याने गड जिंकून आल्याप्रमाणे नातेवाईकांमध्ये सांगतात. ज्यामुळे मुलांना वाटते की, आपण केलेली गोष्ट बरोबर आहे. पण, अनेक पालक मुलांना चांगल्या, वाईट गोष्टी वेळीच समजवतात. काही पालक असेही असतात की, जे मुलं आपलं ऐकत नाही हे समजल्यावर आजूबाजूची चांगली लोकं, शिक्षित माणसं, प्रतिष्ठित लोकं, नातेवाईक, समाजसेवक, डॉक्टर यांची मदत घेतात. मुलं ऐकत नाही समजल्यावर इतरांची मदत घेणे फार महत्त्वाची गोष्ट आहे.
- अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये हल्ली सायकोलॉजिस्टचे सेशन घेतले जातात. अशाने मुलांना शाळेत असतानाच चांगल्या- वाईट गोष्टी समजवता येतात. यावेळी पालकांना मुलांच्या वागण्यातील बदल समजावून सांगितले जातात. काही पालक आपल्या मुलाला वाईट सवयी आहेत असे म्हटल्यावर ते मान्य करण्यास तयार नसतात. पण, काही पालक ते पटकन मान्य करतात. अशा परिस्थितीत शिक्षक, डॉक्टर, सायकोलॉजिस्ट एक मार्गदर्शकाची भूमिका बजावू शकतात.
- विशेषत: १२ ते १८ वर्षांची मुलं यांचे चांगले संगोपन होणे फार महत्वाचे आहे. अनेकदा कुटुंबात मुलांबाबत पालकांमध्ये दुमत असते. म्हणजे मुलाचे चुकीचे वागणं वडिलांना दिसते, पण आईला त्या चुका दिसत नाही. यात मुलांच्याबाबतीत आई फार ओव्हर प्रोटेक्टिव्ह असते. मुलाने काही चुका केल्यास काही केलं तरी त्या पदरात घेते. ती अनेकदा मुलांच्या चुका वडील आणि इतरांपासून लपवून ठेवते, ज्यामुळे मुलं आपल्या चुकीच्या गोष्टीही आईमुळे खपून जातात असे मानत मोठ-मोठे गुन्हे करण्यास किंवा वाईट गोष्टी करणे सुरूच ठेवतात, जे फार चुकीचे आहे. वडिलांचा तापट स्वभाव लक्षात घेता आई अनेकदा मारण्याच्या भीतीने मुलांच्या चुका वडिलांपर्यंत पोहोचवतच नाही. त्यामुळे सर्वप्रथम खोटं बोलण्याची मानसिकता आईकडूनचं मुलाकडे येत असल्याचे दिसते. अनेकदा मुलांच्या वागण्याबाबत घरचं एकमत नसते.
- पण, पालकांनी एकमत होत मुलांना गुन्हेगारी प्रवृत्तीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यात आई-वडील, आजी-आजोबा, बहीण-भाऊ यांची भूमिका फार महत्त्वाची आहे, कारण या लोकांनी गुन्हेगारी विश्वाकडे वळलेल्या व्यक्तींना चांगल- वाईट याची शिकवण द्यावी. वेळप्रसंगी ओरडावे.
- पण, मूल जास्तच रागवत असेल आणि त्याच्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असतील तर त्याला मानसोपचारतज्ज्ञांकडे समुपदेशनासाठी नेले पाहिजे आणि योग्य तो सल्ला घेतला पाहिजे. यामुळे त्याच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.