Health special: लहानपणातील एक गोष्ट आठवते. साधारणतः ११ वी १२वी ला असताना मी काकांसोबत ते काम करत असलेल्या प्रवरा डेंटल कॉलेजमध्ये गेलो होतो. त्यावेळी ऑफिसमध्ये कॉलेजचे काही डॉक्टर आले होते. काकांनी त्यांच्याशी बोलताना माझी ओळख करून दिली व त्यातील एक डॉक्टरांनी माझे नाव विचारत मी काय शिकतोय, असे विचारले. तसंच पुढे काय करणार हेही विचारले.
मी सांगितले की, मला डॉक्टर व्हायचे आहे. एमबीबीएसला जायचे आहे. त्यावर ते म्हणाले ‘अरे डेंटिस्ट हो’, कारण डेंटिस्ट होण्याचे बरेच फायदे असतात. हसत पुढे त्यांनी मला सांगितले की बघ माणसाला दोन कान असतात, दोन डोळे असतात, किडनी लंग्स, हात-पाय सर्व दोन असतात. दात मात्र ३२ असतात आणि या ३२ पैकी एक ना एक दात दुखणारच आणि तो रुग्ण डेंटिस्टकडे जाणारच म्हणून सांगतो डेंटिस्ट होणे केव्हाही चांगलेच. एक वस्तुनिष्ठ विनोद म्हणून ही गोष्ट मला अजूनही बरेचदा आठवते. आता या ३२ दातातही सर्वात जास्त जर कुठल्या दाताबद्दल बोलले जात असेल तर तो म्हणजे ‘अक्कलदाढ’ किंवा ‘विज्डम टूथ’. आता या दाताला अक्कलदाढ किंवा ‘विज्डम टूथ’ का म्हटले जाते ? हे बऱ्याच जणांना माहीत नसते. काहींना तर या दाताच्या नावाबद्दल इतकी दहशत असते की आपण अक्कलदाढ काढली किंवा ती खराब झाली तर आपल्या अकलेवर तसा काही परिणाम तर होणार नाही ना, याची भीतीही असते.
आणखी वाचा-Health Special: पायथागोरस आणि विगन डाएट यांचं कनेक्शन तुम्हाला माहितेय का?
सुरुवातीला हे सांगणे योग्य राहील की तसा अकलेचा म्हणजेच बुद्धीचा व अक्कलदाढेचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसतो व अक्कलदाढ काढल्याने किंवा खराब झाल्याने आपल्या अकलेवर काहीही फरक पडत नाही. तर मग बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की, असं असेल तर मग या दाताला किंवा दाढेलाच अक्कलदाढ का म्हणतात ? प्रश्न अगदी योग्य रास्त आहे. परंतु या प्रश्नातच उत्तरही दडलेले आहे. आपल्याला समज यायला किंवा आपण पूर्ण प्रौढ व्हायला १८ हे वय ग्राह्य धरलं जातं. म्हणजेच आपण परिपक्व होतो. आपल्याला समज येते ती आपण १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर, शास्त्रातही याला आधार आहे तो म्हणजे साधारणतः १८ वर्षांपर्यंत आपल्या शरीराची पूर्ण वाढ झालेली असते. यासाठीच तर आपल्याला मतदानाचा अधिकारही १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मिळतो. आपल्याला अक्कल येणे किंवा आपण समजदार होणे हे अशाप्रकारे १८ वर्षा भोवती अवलंबून आहे. त्याच वयात आपल्या मुखात एक दाढ ही इतर दाढांच्या मानाने सर्वात शेवटी उगवत असते. ज्याला डेंटल भाषेत थर्ड मोलार म्हणतात हीच ती दाढ, जिला आपण अक्कलदाढ किंवा विज्डम टूथ असे म्हणतो.
आणखी वाचा-Health Special : मस किंवा चामखीळ स्किन कॅन्सरचं लक्षण आहे का?
अक्कलदाढ तिच्या नावामुळे जशी नाविन्यपूर्ण असते तशीच तिच्या करामतीमुळे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण ही येताना इतर दाढांप्रमाणे सहजच येत नाही. तर येताना अगदी सावकाश येते. इतकी सावकाश येते की, काही वेळा येताना तिला ४-५ वर्षेही लागू शकतात. बरं ते एक वेळी ठीक आहे, परंतु केवळ सावकाश येऊन ती थांबत नाही; तर येताना तिचे अनेक नखरे असतात. एक प्रकारे १८ वर्षांच्या एखाद्या अवखळ तरुणीचे जसे नखरे, लटके, झटके इत्यादी असतात, तशीच ही दाढही अनेक नखरे दाखवते. कधी येताना बाजूचा गाल सुजवते तर कधी हिरडीचे आवरण नेसून गुलाबी शालू असा काही फुलवते की, तुम्ही जेवताना दात बंदच करू शकत नाही त्यामुळे दातांमधून कळा सुरू होतात, घास नीट चावला जात नसल्यामुळे अडचण होते, रात्री नीट झोप येत नाही, ‘अगदी सहनही होत नाही, आणि सांगताही येत नाही’ अशी अवस्था निर्माण होते. बरं ही अक्कलदाढ केवळ एक नसते तर ४ अक्कलदाढा आपल्याला येत असतात.