भारतीय हे कसे मुळातच अस्वच्छ आहेत आणि आम्ही कसे स्वच्छतेचे भोक्ते आहोत, हे सांगण्यामध्ये पाश्चात्त्यांना कोण धन्यता वाटते नाही! वास्तवात आपल्या पुर्वजांनी आरोग्याला आणि आरोग्यासंबधित शौचविधीला अर्थात स्वच्छतेला इतके नितांत महत्त्व दिले आहे की त्याचे मार्गदर्शन केवळ आयुर्वेद नव्हे तर धर्मग्रंथांमध्येसुद्धा विस्ताराने केलेले आढळते. आज २१व्या शतकात मात्र पाश्चात्यांचे अनुकरण करता-करता आपण आपल्याला शिकवलेले स्वच्छतेचे आणि आरोग्याचे मूलभूत नियम पायदळी तुडवत आहोत, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आधुनिक उपहारगृहांमध्ये केला जाणारा ‘फिंगर-बाऊल’चा उपयोग!

युरोप-अमेरिकेमधील थोरामोठ्यांकडे जेवण झाल्यानंतर एका बाऊलमध्ये लिंबू व कोमट पाणी दिले जाते. खरं तर लहानशा-सुबक बाऊलमध्ये कोमट पाणी व सोबत कापलेले लिंबू दिले तर, ‘ते लिंबू कोमट पाण्यामध्ये पिळून प्यायचे, जेणेकरुन अन्न व्यवस्थित पचेल,’ असे एखाद्याला वाटले तर त्यात आश्चर्य नाही. पण प्रत्यक्षात मात्र ते लिंबू त्या कोमट पाण्यामध्ये पिळून त्या पाण्यामध्ये हात स्वच्छ करायचे, अशी अपेक्षा असते. आता त्या वीतभर लांबीच्या बाऊलमध्ये आपले दोन्ही हात बुचकळवून-बुचकळवून कसे काय धुवायचे, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. कोणी म्हणेल ‘अहो, पाश्चात्य जेवताना काटा-चमचा वापरतात, त्यांच्या हातांचा अन्नाशी संपर्कच येत नाही. त्यामुळे फिंगर-बाऊलमधील थोड्याशा पाण्यात नुसते हात बुडवले तरी चालते.’ खरंतर त्यांच्याकडेही असे खाद्यपदार्थ आहेत, जे हातांनीच खावे लागतात .तरीही पाश्चात्य व काही इंग्रजाळलेल्या शहाण्या भारतीयांना सर्वच पदार्थ काट्या-चमच्यांनी खाण्याची करामत जमते, असे घटकाभर धरून चालू, पण अस्सल भारतीय पदार्थांचे काय? कित्येक भारतीय पदार्थ काट्या-चमच्याने खाणे शक्यच नाही. भारतीय अन्नपदार्थ खाताना अन्न हातांना लागतेच लागते. तरीही आपण का बरं फिंगर बाऊल वापरावा?

australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
A bone stuck in a tiger's teeth
भक्ष्यावर ताव मारताना वाघाच्या दातात अडकले मोठा हाडाचा तुकडा; हातोड्याने….,थरारक व्हिडीओ एकदा बघाच
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
man killed in dispute between two groups over trivial reason in thane
ठाणे : क्षुल्लक कारणावरून दोन गटातील वादातून एकाची हत्या

पाश्चात्त्य धार्जिणे म्हणतील तो बाऊल केवळ हात धुण्यासाठीच असतो, पण हात धुण्याचे काम तरी त्यामध्ये कुठे धडपणे होते? या प्रकारामध्ये हात स्वच्छ होण्याची शक्यता फार कमी, कारण मुळात ते वाहते पाणी नसते, पुन्हा त्या थोड्याश्या पाण्यामध्ये हात चोळता येत नाहीत की नखे-बोटे घासता येत नाहीत. म्हणजे हातांची स्वच्छता होत नाहीच तरीही हातांना लिंबुचा वास आला म्हणजे हात स्वच्छ झाले असे समजायचे. बरं, अर्धवट हात धुतले गेले तरी तोंड कसे धुवायचे? ओठ कसे साफ करायचे? चूळ कशी भरायची? अन्नसेवन केल्यानंतर पाणी तोंडामध्ये खळखळवून चूळ भरणे इतके महत्त्वाचे असते की, या एका चांगल्या सवयीमुळे दात व हिरड्या निरोगी राहू शकतात. मौखिक आरोग्यासाठी आवश्यक असणारी चूळ टेबलावरच फिंगर बाऊल दिल्यावर कशी काय भरायची? मग स्वतःला स्वच्छतेचे भोक्ते समजणारे पाश्चात्य व त्यांचे अंधानुकरण करणारे शहाणे भारतीय, काय जेवणानंतर जिभेवरचाचि-टाळूवरचा कटा तसाच राहू देतात? दातांच्या फटींमध्ये अडकलेले अन्नाचे कण काय तसेच ठेवतात? मग या दातांमध्ये अडकलेल्या अन्नकणांचा दुर्गंध येऊ नये याच कारणासाठी फिंगर बाऊलनंतर सुगंधी सुपारी वा गोळ्या चघळायला दिल्या जातात की काय? सगळाच अस्वच्छतेचा कारभार? अशा प्रकारच्या पाश्चात्यांच्या आरोग्यास अनिष्ट अशा सवयींचे अंधानुकरण सर्वप्रथम मुंबई-दिल्लीमधील अतिश्रीमंत शहाणे करतात आणि मग संपूर्ण समाज त्यांचे आंधळेपणे अनुसरण करु लागतो.

खरं सांगायचं तर आफ़्रिका-आशियामध्ये वसाहती वसवणार्‍या पाश्चात्त्यांना ; प्रत्येक लहानसहान कामामध्ये तिथल्या मूलनिवासींना राबवून त्यांच्याकडून आपली सेवा करुन घेऊन आपल्या मालकी हक्काचा आसुरी आनंद घेण्याची सवय लागली होती; मग ते काम बूट पुसण्याचे असो वा फिंगर बाऊल आणून देण्याचे. पारतंत्र्यात असलेल्या पुर्वजांचा फायदा उठवणार्‍या जेवणानंतर फिंगर-बाऊलमध्ये हात धुण्याच्या पाश्चात्त्यांच्या या अस्वच्छ प्रथेचे अनुकरण थांबवा वाचकहो.

-डॉ. अश्विन सावंत