घरोघरी सहज उपलब्ध असणारे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून त्यांचे मसाले तयार केले जातात तेव्हा ते जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण त्यांचे सुटे सुटे घटकही आपल्या आरोग्यासाठीही गुणकारी असतात.
मेथी
मेथी, पालेभाजी व मसाल्याचा पदार्थ म्हणून सर्वांच्या वापरात सर्रास आहेच. मेथीची भाजी पथ्थ्यकर भाजी आहे. पाने थंड गुणाची, सारक, पाचक, वातानुलोमक, पित्तनाशक व सूज कमी करणारी आहेत. मेथीच्या बिया वातहारक, पौष्टिक, रक्तसंग्राहक व गर्भाशय संकोचक आहेत. बिया रक्त व पित्तवर्धक आहेत.
बाळंति‍णींसाठी उपयुक्त

पित्तप्रधान मलावरोधात पालेभाजीचा उपयोग पोट साफ  करण्याकरता आहे. पित्तप्रधान ज्वरात मेथीच्या पानांचा रस घ्यावा. जखम व सूज या दोन्ही लक्षणांत मेथीची पाने वाटून लेप लावावा. रक्त पडणाऱ्या आवेत कोवळ्या पानांची भाजी उपयुक्त आहे. मेथीची पालेभाजी, हृदयरोग, भगंदर, कृमी, खोकला, कफ, वातरक्त, महारोग, उलटी, अरुची, ताप या विकारात पथ्यकर म्हणून जरूर वापरावी. बाळंतपणात मेथीच्या बियांचे सुगंधी पदार्थाबरोबर लाडू करून देतात. त्यामुळे बाळंतिणीस चांगली भूक लागते. खाल्लेले अन्न पचते, अजीर्ण होत नाही. शौचास साफ होते. रक्तस्राव कमी होतो. गर्भाशय लवकर पूर्ववत होतो. स्थूलपणा वाढत नाही. कंबरेचा घेर कमी होतो.

वात व पित्ताच्या रुग्णांसाठी उत्तम

मेथी वात व पित्तप्रकृती रुग्णांकरता उत्तम आहे. मेथी बिया पचनसंस्थांवर विशेष कार्य करतात. मेथी चावून खायला लागल्यापासून लाळास्रााव उत्तम सुरू होतो. आधुनिक विज्ञानाचे अभ्यासक मधुमेह या व्याधीकरिता जी एकमेव वनस्पती मानतात, ती म्हणजे मेथी होय. मेथी बियांचा प्रत्येक कण तोंडातील, आमाशय, पच्यमानाशय, स्वादुपिंड या आतड्यातील गोडपणावर, कफावर कार्य दरक्षणी करीत असतो. त्यामुळे नुसत्या मेथ्या चावून खाणे, सकाळी मेथीपूड पाण्याबरोबर घेणे, मेथ्या उकळून त्याचे पाणी पिणे, मेथीकूट खाणे, मेथी पालेभाजी खाणे, मेथी पालेभाजीचा रस पिणे असे अनेक उपाय जगभर मधुमेही माणसे यशस्वीपणे करीत आहेत. सर्वात सोपा उपाय म्हणजे एक चमचा मेथीपूड एक पोळीला लागणाऱ्या कणकेत मिसळून अशा हिशोबात पोळ्या खाणे. यामुळे रक्तातील साखर कमी होते. नियंत्रित राहते. शरीराचा बोजडपणा कमी होतो.
मेथीच्या बियांमुळे आमाशयातील कफाचे विलयन व यकृताचे स्रााव निर्माण करणे, वाढवणे, आहार रसांचे शोषण ही कार्ये होतात. आमवातात रसादि धातू क्षीण व दुर्बल होतात. हृदय दुर्बल होते. त्याकरिता मेथी व सुंठ चूर्ण मिसळून भोजनोत्तर घ्यावे. शरीर निरोगी व सबल होते. मेथीच्या फाजील वापराने शुक्रनाश होण्याची शक्यता असते. गरगरणे, चक्कर, अंधेरी ही लक्षणे दिसल्यास मेथीचा वापर करू नये.

मोहरी

स्वयंपाकात रोज वापरात असणाऱ्या मसाल्याच्या पदार्थात मोहरी सर्वात उष्ण आहे, तीक्ष्ण आहे. त्याकरिता सर्व पदार्थांत चव आणण्याकरिता, झटका आणण्याकरिता मोहरी वापरली जाते. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, राजस्थान या भागात थंडीच्या मोसमात मोहरीच्या तेलाने मसाज करून घ्यायचा प्रघात आहे. समस्त वातविकारात थंड, कफ प्रकृतीच्या रुग्णांकरिता मोहरीच्या तेलाचे मसाज फार फायदेशीर आहे. ज्यांना हे तेल फार उष्ण वाटते त्यांनी त्यात तीळ तेल, खोबरेल किंवा एरंडेल मिसळावे. मोहरीच्या तेलाच्या मसाजामुळे काहींना पुरळ येते. त्याकरिता काळजी घ्यावी. दुखऱ्या गुडघ्यावर किंवा लहान-मोठ्या सांध्यांवर मोहरीचा वाटून लेप लावावा, बांधून ठेवावे, रात्रीत गुडघ्यातील दुखावा कमी होतो.
अर्धांगवायू, संधिवात, आमवात, सायटिका, खांदा जखडणे, मान गुडघ्याचे विकार या सगळ्या वातविकारांत थंड ऋतूत मोहरी तेल किंवा मोहऱ्या वाटून त्याचा लेप यांचा वापर जरूर करावा. तीळ तेल, एरंडेल तेल, लिंबोणी तेल, करंजेल तेल यांच्या जोडीला मोहरी तेलाच्या मदतीमुळे, अभ्यंगार्थ महानारायण तेल तयार केले जाते. एक वेळ संबंधितांनी जरूर वापरून पाहावे. कोणत्याही सर्दीला इतर उपचार दाद देत नसतील तर मोहरीची चिमूटभर पूड मधाबरोबर खावी. कोणत्याही विषावर उलटी करण्याकरिता मोहरीचे पाणी प्यावे. उलटी होऊन बरे वाटते. छातीत खूप कप झाल्यास मोहरी व मीठ यांचा काढा प्यावा. उलटी करवून कफ निघून गेला की दमेकऱ्यास बरे वाटते. तरुण माणसांवरच हा प्रयोग करावा. जंत व कृमी सहजपणे पडत नसल्यास मोहरीची चिमूटभर पूड तीन दिवस घ्यावी. जंत नाहीसे होतात. पोटदुखी, डोकेदुखी याकरिता मोहरी वाटून त्या त्या अवयवांवर लेप लावावा. लघवी साफ होण्यासाठी ओटीपोटावर लेप लावावा. पोटफुगी, अपचन, अजीर्ण याकरिता मोहरी चूर्ण आल्याच्या रसाबरोबर घ्यावे. मोहरी खूप उष्ण आहे, याचे भान नेहमी ठेवावे.
उचकी, कफ, दमा, खोकला, विशेषत: लहान बालकांच्या तक्रारींवर एक-दोन मोहऱ्या उकळून त्यांचे पाणी किंवा मोहरी चूर्ण मधाबरोबर चाटवावे. खूप लस व खाज असलेल्या इसब, गजकर्ण, नायटा या विकारांत मोहरीचे तेल बाहेरून लावावे. कंड लगेच थांबते, गाठ, सूज फार दडस असल्यास मोहरीचा लेप लावावा.


हिंग

स्वयंपाकाकरिता आवश्यक असणारा हिंग बाजारात कमी-अधिक तिखटपणा, वासाचा मिळतो. व्यापारी आपापल्या फॉम्र्युलाप्रमाणे मूळ हिराहिंगात भेसळ करून विकतात. मूळ हिराहिंग खूपच कडू असतो. तो नेहमीच्या स्वयंपाकात वापरताच येणार नाही. मात्र पोटदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी याकरिता हिराहिंग किंवा नेहमीच्या हिंगाचा गरम गरम दाट लेप उत्तम काम करतो. चांगल्या दर्जाचा हिंग हा उत्तम वातनाशक आहे. हिंगाचा कणभर खडा मिठाबरोबर घेतला की कसलेही अजीर्ण दूर होते.
हिंग वातानुलोमक आहे. आमाशयात वा पक्काशयात वायू अडला असो, हिंग लगेच वायू मोकळा करतो. हिंग भाजून त्याची कढी किंवा ताक हे सर्वांनाच माहीत असलेले औषध आहे. हर्निया, पोटदुखी, पोटफुगी, आमांश, जंत, अन्न कुजणे या तक्रारींत हिंग, मीठ, लसूण व गरम पाणी असे मिश्रण नियमित घ्यावे. सर्दी, पडसे, अर्धशिशी या विकारांत हिंगाचे पाणी तारतम्याने नाकात टाकावे. वायुगोळा किंवा पोटातील वातज गुल्म या विकारांत हिंग आल्याच्या रसाबरोबर घ्यावा. लगेच आराम पडतो. प्रसिद्ध हिंगाष्टक चूर्णातील प्रमुख घटकद्रव्य हिंग आहे. पुरुषांच्या हर्निया/ अंडवृद्धी या विकारांत हिंग-लसुणादी तेल मोठेच योगदान देते. एक भाग हिंग, तीन भाग सैंधव, नऊ भाग एरंडेल तेल व सत्तावीस भाग लसणीचा रस असे एकत्र मिश्रणाचे आटवून सिद्ध केलेले तेल हर्नियाकरिता एकदम अफलातून औषध आहे.