सततच्या बदलत्या हवामानामुळे आपल्याला सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे यांसारख्या समस्यांचा अनुभव येतो. सहसा असा त्रास झाला की लोक पटकन एखादी गोळी घेतात किंवा कफ सिरप घेण्यास प्राधान्य देतात. पण, बरेच लोक अजूनही घरगुती उपाय करतात, जे त्यांना त्वरित आराम देतात. लिंबाचा रस आणि मधाचे एकत्र सेवन केल्यास घसा खवखवण्यापासून मुक्त होण्यास मदत होते, असा घगुरती उपाय एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितला होता. याबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे हे जाणून घेऊ या…

“घशात खवखव होत असेल तर लिंबू मधात मिसळून सेवन केल्यास या दोन्हीतील अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे उत्तम आराम मिळतो. मधामध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत आणि श्वसनाच्या आजारांमध्ये ते उपचारात्मक भूमिका पार पाडतात. त्यात थोडी काळी मिरीदेखील घालता येते. यामुळे सूज आणि वेदनेपासून त्वरित आराम मिळेल”, असे आहारतज्ज्ञ सिमरत भुई यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटचे (सहायक मुख्य वैद्यकीय अधिकारी) डॉ. श्रीकांत एच. एस. यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, “लिंबाच्या आम्लयुक्त गुणधर्मामुळे घशातील श्लेष्मा (चिकट सर्दी) नष्ट करते आणि संसर्गाचा सामना करण्यास मदत करू शकतो. या मिश्रणाचा ओला प्रभाव घशातील कोरडेपणा आणि जळजळ कमी करण्यास मदत करतो. मधाशी संबंधित बोटुलिझम आजाराच्या (botulism ) धोक्यामुळे लहान मुले वगळता, लिंबू आणि मध सामान्यतः सर्व वयोगटांसाठी सुरक्षित आहे. बोटुलिझम म्हणजे एक प्रकारे अन्नातून विषबाधा होणे. मुलांसाठी लिंबाचा रस पाण्यात मिसळून आणि थोड्या प्रमाणात मध टाकल्याने मिश्रण अधिक रुचकर होऊ शकते.”

हेही वाचा – Smoking in Pregnancy :गरोदर आईच्या ध्रूमपानामुळे मुलीला वेळेआधीच मासिक पाळी येण्याचा धोका?

दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलच्या (आर), ENT विभागातील मुख्य सल्लागार असलेल्या डॉ. दीप्ती सिन्हा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, घसा खवखवण्यासाठी ताज्या आल्याचा रस आणि लिंबाचा रस आणि मध मिसळून घेतल्याने लहान मुलांसह प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी अधिक शक्तिशाली घरगुती उपचार आहे. मधाच्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा हा पदार्थ दाहकविरोधी गुणधर्मामुळे घशातील सूज कमी करतो आणि लिंबाचे व्हिटॅमिन सी प्रतिकारशक्ती वाढवते आणि श्लेष्मा नष्ट करतो. ताज्या आल्यात असलेले अत्यावश्यक दाहकविरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म उपचाराचा प्रभाव आणखी वाढवतो.”

२०० मिली पाण्यात ताज्या आल्याचा एक छोटा तुकडा टाकून उकळवून घ्या, त्यात एक चमचा मध आणि ताज्या लिंबाच्या रसाचे काही थेंब, हळद टाका”, असे डॉ. सिन्हा यांनी सांगितले.

काय लक्षात ठेवावे?
लहान मुलांना बोटुलिझमचा आजार होण्याचा धोका असल्यामुळे एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मध देऊ नये, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. ज्या लोकांना हळद, मध, आले यापैकी कोणत्याही घटकाची अ‍ॅलर्जी आहे, त्यांनीदेखील सावधगिरी बाळगावी.. “या नैसर्गिक उपचाराने आराम मिळू शकतो, परंतु लक्षणे गंभीर किंवा दीर्घकाळापासून त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या”, असे डॉ. सिन्हा म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिंबाची अ‍ॅलर्जी असलेल्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगली पाहिजे; पर्यायी उपाय अधिक योग्य असू शकतात. “घसा खवखवणे कायम राहिल्यास किंवा खराब होत असल्यास, विशेषत: लहान मुलांमध्ये, वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. हे नैसर्गिक उपाय पर्यायी मार्ग म्हणून काम करतात, पण वैद्यकीय मार्गदर्शन महत्त्वाचे आहे”, असेही डॉ. श्रीकांत यांनी स्पष्ट केले.