मुक्ता चैतन्य- संस्थापक, सायबर मैत्र
“ऑनलाईन कनेक्शन्स माणसा- माणसांतील संवादाला पर्याय असता कामा नयेत.” – युनेस्कोच्या डायरेक्टर जनरल ऑडेरी अझाऊले यांचं हे वक्तव्य आजच्या काळासाठी अतिशय महत्वाचं आहे. युनेस्कोचा ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग अहवाल प्रसिद्ध झाल्यावर त्यातल्या तंत्रज्ञानाचा शिक्षणातील उपयोग या संदर्भातील विश्लेषणात त्यांनी हा मुद्दा मांडला आहे. त्याचबरोबर युनेस्कोने सर्वच देशांना शाळेमध्ये मोबाईल बंदी आणावी असेही सुचवले आहे. हा प्रस्ताव योग्य असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिक विकासासाठी अत्यावश्यक आहे. युनेस्कोच्या या रिपोर्टमध्ये शैक्षणिक धोरणे आखणाऱ्यांसाठी तंत्रज्ञानाला धरुन चार मूलभूत प्रश्न विचारले गेले आहे. तंत्रज्ञान वापरणं योग्य आहे का? सगळ्यांना सामान संधी मिळते का? किंवा ते न्याय्य आहे का?, मोजमाप करता येते का? टिकाऊ आहे का? हे प्रश्न उपस्थित करत असतानाच डिजिटल शिक्षणाची गरज आणि महत्त्वही या अहवालात नोंदवण्यात आलं आहे.

करोना लॉकडाऊन काळात शाळा ऑनलाईन सुरु झाल्या, तेव्हा ती काळाची गरज होती तरी त्याचे प्रचंड दुष्परिणाम आता दिसू लागले आहे. ज्या मुलांच्या हातात फोन नव्हते, त्यांच्या हातात फोन आले आणि ऑनलाईन शाळेत हजेरी लावून मुलांनी त्यांच्या हातातल्या गॅजेटच्या माध्यमातून ऑनलाईन जगात भटकायला सुरुवात केली. त्यामुळे ऑनलाईन जगाशिवाय जगणं अशक्य आहे, अशी काहीतरी धारणा आज मुलांची आणि तरुणतरुणींची झालेली दिसते.

Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?

ऑनलाईन जगाचा सुयोग्य आणि आवश्यक तेवढाच वापर हा मुद्दा मागे पडून त्यांचं व्यसन लागण्याकडे मुलं झपाट्याने सरकताना दिसतात. मोबाईल किती विविध स्तरीय अडथळे मुलांच्या एकूण विकासात आणतो आहे हे आम्ही कामाच्या निमित्ताने रोज बघत असतो. एकाग्रता कमी होणं, लक्ष केंद्रित करता न येणं, बैठक मोडणं, लहान वयात ऑनलाईन डेटिंगची सुरुवात होणं, अनोळखी माणसांकडून होणारं शोषण, पॉर्न आणि गेमिंगचं व्यसन, सायबर बुलिंग, स्वतःचे विचार न मांडताना, त्यासाठी पुरेसा वेळ न घेता कॉपी-पेस्ट-एडिटची सवय लागणं आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे सतत ऑनलाईन जगाच्याच विचाराने मन व्यापलेलं असणं.

हेही वाचा… मेटाबॉलिजम कशामुळे प्रभावित होते? डॉक्टरांकडून जाणून घ्या तुम्ही काय केले पाहिजे?

कान आणि डोळे सतत मोबाईलमध्ये अडकलेले असणं हेही फारसं चांगलं नाही. इथे परदेशात घडलेली एक घटना आवर्जून सांगावीशी वाटते. शाळेच्या बसमधून मुलं परतत असतात. अचानक वाहन चालकाची तब्येत बिघडते. त्याचा गाडीवरचा तोल जातो. हे एका मुलाच्या लक्षात येतं. तो चालकाच्या मदतीला धावतो आणि मोठा अपघात टाळतो. त्यानंतर जेव्हा चौकशी सुरु होते आणि चालकाची तब्येत बिघडली आहे हे बसमधल्या चाळीस मुलांपैकी एकाच्याच लक्षात का आलं, बाकींच्या मुलांना का जाणवलं नाही याची चौकशी झाली, तेव्हा या एकाच मुलाकडे मोबाईल नव्हता हे लक्षात आलं. बाकी सगळ्या मुलांचे कान, डोळे, चित्त आणि भवतालचं भान मोबाईलने व्यापून टाकलेलं होतं. त्यामुळे चालकाला काहीतरी होतंय हेच इतर मुलांच्या लक्षात आलं नाही.

महाराष्ट्रात काही शाळांनी आता मोबाईल बंदीला सुरुवात केली आहे. पण अजूनही शाळेत मोबाईल आणायचा नाही हा मुद्दा सरसकट सगळीकडे राबवला जात नाही. पालकांचं म्हणून त्याविषयी काही म्हणणं असतं. शाळेनंतर मुलांचे अनेकदा विविध क्लासेस असतात, तिथे मुलं वेळेवर पोचली ना, ती सुरक्षित आहेत ना यावर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने मुलांकडे मोबाईल असणं पालकांना गरजेचं वाटतं. आधुनिक काळातल्या ‘ड्रॉन पेरेंटिंग’चाच तो एक भाग आहे. त्यामुळे मुलांकडे फोन असायला हवा याबाबत पालक आग्रही किंवा काहीवेळा हट्टीही असतात. पण या सगळ्यात मुलांच्या सर्वांगीण विकासावर मोबाईल आणि ऑनलाईन जगाचा किती प्रचंड परिणाम होतो आहे याचा विचार आपण करतो का? मुलाच्या प्रत्यक्ष आणि शारीरिक सुरक्षिततेचा विचार करताना त्यांच्या ऑनलाईन जगातील सुरक्षिततेचा आणि मानसिक-भावनिक सुरक्षिततेचा विचार होतो का?

मुलं शाळेत जेव्हा फोन घेऊन येतात तेव्हा तो शाळेच्या वेळेत अजिबात वापरला जात नाही असं कधीही होत नाही. मुलं अनेकदा फोन सायलेंटवर ठेवून शाळेच्या वेळात वापरत असतात. त्यात गेमिंग करणं, चॅटिंग करणं, ऑफ पिरीएड्स किंवा मधल्या सुट्टीच्या काळात पॉर्न क्लिप्स बघणं, इतर लहान वर्गातल्या मुलांना दाखवणं, एकमेकांचे फोटो काढणं, क्वचित प्रसंगी बाथरूम मध्ये फोटो काढणं, मिम्स तयार करणं असले अनेक प्रकार करतात. कारण त्यांना हे सगळं अतिशय सहज आणि गमतीशीर वाटतं कारण त्यांच्यासाठी ऑफलाईन जगापेक्षा ऑनलाईन जग अधिक रंगीत आहे. ते जग खऱ्या जगापेक्षा खूप जास्त हॅपनिंग आहे अशी त्यांची समजून आहे. या सगळ्यातलं गांभीर्य मुलांच्या लक्षात येत नाही कारण ते डिजिटल माध्यम शिक्षित नसतात. पालकांच्याही लक्षात येत नाही किंवा आलं तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं कारण अनेकदा त्यांचा सगळा कल मुलांच्या प्रत्यक्ष सुरक्षिततेवर असतो आणि त्यासाठी मोबाईल मुलांकडे शाळेत जातानाही हवाच यावर ते ठाम असतात.

हेही वाचा… Health Special: मलावरोध होत असेल तर पाणी थंड प्यावे की, गरम?

करोना काळात शिक्षण ऑनलाईन गेल्याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे शाळकरी मुलांना मोबाईलची गरज नसते हा विचारच पुसला गेला आहे. अनेक शाळांनी त्यावेळच्या गरजेपोटी केलेल्या गोष्टी आजही तशाच चालू ठेवताना दिसतात. उदा. व्हाट्सअ‍ॅप वरुन अभ्यास आणि सूचना पाठवत राहणे. सूचना पाठवण्यासाठी ग्रुप असणं वेगळं आणि त्यावरुन अभ्यास पाठवणं वेगळं. मुलंही एकमेकांना अभ्यास, गृहपाठ या सगळ्यागोष्टी व्हॉट्सअप वरुन पाठवत असतात. पण या सगळ्यासाठी पालकांचे मोबाईल वापरता येऊ शकतात. त्यासाठी मुलांकडे स्वतःचं गॅजेट असण्याची गरज नसते.

पण ऑनलाईन शाळेच्या दोन वर्षात मुलांकडे स्वतःची गॅजेट्स असली पाहिजेत हा विचार कुठेतरी इतका पक्का रुजला आहे की आता परतीचे दोरच जणू कापले गेले आहेत. मुळात मुलांना शाळेत फोन लागत नाही. दुसरं म्हणजे आपण हे मान्य केलं पाहिजे की, शाळकरी मुलांना मोबाईलची गरज नसते. त्यांच्याकडे मोबाईल असल्याने त्यांच्या जगण्यात कशाचीही भर पडत नाही. ना कुठली कौशल्ये विकसित होतात. उलट त्याचे तोटेच जास्त आहेत. वयाच्या पंधराव्या, सोळाव्या वर्षी स्वतःचा मोबाईल मिळाल्याने आजच्या टेक सॅव्ही जगात ती कुठेही मागे पडणार नाहीयेत. हे मी आवर्जून लिहिते आहे कारण आमच्याकडे येणारे अनेक पालक ही भीती सतत व्यक्त करत असतात आणि तेही एक मोठं कारण असतं मुलांबरोबर चोवीस तास मोबाईल ठेवण्याचं.

आज आपण सगळेच हायब्रीड जीवनशैली जगायला सुरुवात केली आहे. आपलं भविष्य हे हायब्रीड जीवनशैलीवरच आधारित असणार आहे हे कितीही सत्य असलं तरीही मुलांना फोनसाहित आणि फोनशिवाय कसं आनंदाने जगायचं हे शिकवावं लागणार आहे. तो त्यांच्या डिजिटल विवेकाचा भाग होणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष संवादाची मजा चॅटिंगमध्ये येऊ शकत नाही. अभ्यासातली एखादी समस्या व्हॉट्सअ‍ॅप वर विचारून सोडवणं आणि प्रत्यक्ष शिक्षकांना भेटून समजून घेणं यातला फरक मुलांना दाखवणं आज आवश्यक आहे.

हेही वाचा… पावसाळ्यात दूषित पाणी अन् अन्नामुळे होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; लवकर निदान करा अन्यथा…

ऑफलाईन जगही तेवढंच रम्य, रंगीत आणि हॅपनिंग आहे याचा अनुभव मुलांना मिळणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष डेटिंगपेक्षा ऑनलाईन डेटिंग सोपं असतं, त्यामुळे अगदी लहान वयातली मुलंही ऑनलाईन जगात एकाच वेळी अनेकांना डेट करत असतात, डेट हॉपिंग करत असतात, अशावेळी नात्यांचा आणि माणसांचा खरा परिचय प्रत्यक्ष भेटीतूनच होतो हे कुठेतरी आज मुलांना सांगायला हवं आहे. या सगळ्याची डिजिटल शिक्षणाची सुरुवात शाळेतल्या मोबाईल बंदीने होऊ शकते.

मोबाईल न घेता शाळेत जाणं आणि शाळेतून परत घरी सुरक्षित येणं हा मुलांसाठी जीवन कौशल्याचा भाग आहे हे आपण विसरता कामा नये. तो अनुभव त्यांनी घेणं, त्यातून शिकणं या गोष्टी त्यांच्या वाढीसाठी महत्वाच्या असतात. हातात सतत मोबाईल देऊन ही जीवन कौशल्ये विकसित करण्याची संधीच आपण मुलांकडून काढून तर घेत नाहीयोत ना? विचार करायला हवा.