scorecardresearch

Premium

Mental Health Special: मानसिक स्वास्थ्यासाठी आशावाद का महत्त्वाचा?

आशावादी माणसे आजारपणात वेगात बरी होतात तर निराश व्यक्तींना बरे होण्यास वेळ लागतो हे आता संशोधनातून पुरते सिद्ध झाले आहे, त्याविषयी…

Why is optimism important for mental health
आशा निराशेचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम शास्त्रीय संशोधनाने दाखवून दिला आहे. (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम, सौजन्य- Freepik)

डॉ. जान्हवी केदारे

सहा महिन्यापूर्वी अशोकची गुडघ्याची मोठी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. त्याला ऑपरेशन व्हायच्या आधीच मनात अनेक विचार येत. “मी नेहमीच कमनशिबी ठरलो आहे. नाहीतर चार भावंडांमध्ये मलाच का ऑपरेशन करावे लागते आहे? साधारणतः मी काहीही करायचे म्हटले की अडचणीच फार येतात. तसेच या ऑपरेशनच्या वेळेस झाले नाही म्हणजे पुरवले! नंतर तरी मला नीट चालता फिरता येईल का? नाही आले तर एवढे लाखो रुपये पाण्यात जातील.” शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पण शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या वेदना अशोकला सहन होईनात. फिजिओथेरपी करताना वेदनेने विव्हळे आणि त्याचे पालुपद सुरू होई, ‘मी काही धड चालू शकेन असे वाटत नाही.’

Job after study crucial for women not marriage say youth in UNICEF surve
शिक्षणानंतर महिलांना लग्न नव्हे नोकरीच वाटतेय महत्त्वाची; बदलता सामाजिक ट्रेंड सर्वेक्षणातून स्पष्ट
satyashodhak kamaltai vichare, satyashodhak kamaltai vichare information in marathi,
स्त्रियांच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सत्यशोधक कमलताई विचारे
Exercising 150 mins week to prevent heart attacks Study says it may not be enough if you have sugary health drinks
दर आठवड्याला व्यायाम करता? पण साखरयुक्त पेय घेऊन सर्व मेहनत वाया घालवता; संशोधनाबाबत काय सांगतात डॉक्टर….
Why do breasts itch?
स्तनांना वारंवार खाज सुटते? काय आहे त्यामागचे कारण? जाणून घ्या कशी मिळवू शकता ‘या’ त्रासातून सुटका

महेशचे हार्टचे ऑपरेशन ठरले. तोच त्याच्या बायकोला आणि मित्रांना समजावून सांगू लागला,” अरे आता बायपास सर्जरी म्हणजे खूप भयंकर घटना राहिलेली नाही. मी माहिती काढली आहे, डॉक्टरांशी चर्चा केली आहे. उलट आपण वेळेवर ऑपरेशन करतो आहोत, हे चांगले. लवकर बरे होता येईल. पुढच्या महिन्या -दोन महिन्यात मी माझे सगळे रुटीन छान सुरू करेन, अगदी ऑफिसलासुद्धा नीट जायला लागेन. मला खात्री आहे की, सांगितलेल्या सूचना पाळल्या की मी पुनः ठणठणीत होईन. एका आजारपणाने खचून जायचे नाही. आयुष्यात अजून खूप गोष्टी करायच्या आहेत, त्याच्यासाठीच हे ऑपरेशन करतो आहे. चांगले तेच घडेल.”

आणखी वाचा-Mental Health Special: तुम्ही डीपफेक व्हिडीओ तर पाहात नाही ना?

ऑपरेशन दोघांचेही यशस्वी झाले. पण अशोकला बरे व्हायला फार वेळ लागला. वेदना सहन होत नसत, त्यामुळे तो चालायला नाखूश असे. म्हणे, ‘एवढ्या मोठ्या ऑपरेशन नंतरही मी आजारीच राहिलो’. महेश मात्र म्हटल्याप्रमाणे ऑफिसला जाऊ लागला, सांगितलेले पथ्य, चालण्याचा व्यायाम आदी सर्व गोष्टी नियमितपणे करू लागला. असे का झाले? दोघेही चांगले बरे का नाही झाले? अशोकचे विचार अत्यंत निराशावादी, तर महेश प्रचंड आशावादी. दोघांच्या दृष्टिकोनातल्या ह्या फरकामुळे आजारातून बरे होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झालेला दिसतो.

आशावाद म्हणजे मनातला हा विश्वास की, भविष्यात चांगल्या गोष्टी घडतील. अगदी अडचणीच्या वेळीदेखील असे वाटणे, ‘आत्ता माझ्या मनासारखे घडत नसले तरी मला खात्री आहे की पुढे जाऊन मी परिस्थिती नक्की बदलू शकेन, सुधारू शकेन.’ आशावाद मनाला खूप मोठी शक्ती देतो. येणाऱ्या अडचणींना आव्हान म्हणून स्वीकारण्याचे, त्यांनी दबून न जाण्याचे बळ देतो. जितके सकारात्मक आणि आनंदी आपण असू तितके आपले आयुर्मान वाढते, मनातली आशा शारीरिक आणि मानसिक आजारांपासून आपल्याला दूर ठेवते.

प्रत्येकाच्या मनात आशा- निराशेचा खेळ सुरू असतो. परंतु काही व्यक्ती मनात सतत आशावादी राहतात आणि आयुष्यात अनेक गोष्टी प्राप्त करतात. या उलट निराशावादी विचारांचा पगडा सतत मनात असेल तर तितकेसे यश मिळत नाही. मनात निर्माण होणारा ताणतणाव, आयुष्यात येणारी कठीण संकटे, प्रतिकूल परिस्थिती सगळ्याला तोंड देताना मनातला आशावाद मोठी मदत करतो. उदासपणा, चिंता, राग संताप, नोकरीतील कंटाळा, दैनंदिन आयुष्यातील संघर्ष, अनेक शारीरिक तक्रारी हे सारे आशावादी माणसापासून दूर जाते. या उलट त्याला जीवनात समाधान लाभते. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभते.

आणखी वाचा-Mental Health Special: डीपफेकचे परिणाम काय? ओळखायचे कसे?

आशा निराशेचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम शास्त्रीय संशोधनाने दाखवून दिला आहे. शरीरातील अंतःस्रावांवर मनातल्या आशेचा परिणाम होतो. प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पौंगडावस्थेतील मुलामुलींमध्ये मन आशावादी असेल तर उदासीनता, अतिचिंता यांचे प्रमाण खूप कमी राहते. तसेच शैक्षणिक यश मिळायला फार मदत होते. मध्यमवयीन आणि वृद्ध यांमध्येसुद्धा रक्तदाबासारखा आजार कमी प्रमाणात आढळतो, हृदयरोगाचे प्रमाण कमी होते. कुठल्याही वेदनेचे प्रमाण कमी होते. आजारातून लवकर बरे व्हायला मदत होते. तसेच कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाशी सामना करण्याची शक्ती मिळते आणि आयुर्मान वाढते. एचआयव्ही एड्स सारख्या रोगामध्येसुद्धा आशेच्या जोरावर प्रकृती सांभाळता येते. महिलांमध्ये तर स्तनाच्या कर्करोगामध्ये मनातल्या आशेचा प्रकृतीवर खूप चांगला परिणाम झालेला दिसून येतो.

स्वभावानेच आशावादी असलेल्यांचे बरे आहे! आपोआपच आरोग्य चांगले राहील, ते आयुष्यात यशस्वी होतील! स्वभावाने निराशावादी असलेल्यांना असे वाटू शकते. परंतु मन आशावादी बनवता येते. निराशेच्या मनोवस्थेतून आशेच्या दिशेने प्रवास करता येतो. “माझ्याच बाबतीत असे घडते, असेच नेहमी घडत राहणार, माझ्या संपूर्ण आयुष्यावर नेहमी येणाऱ्या संकटाचा कायम परिणाम राहणार”. असे सतत म्हणणारा निराशावादी माणूस मनात आशा कशी बाळगायची ते शिकू शकतो आणि यशस्वीतेकडे वाटचाल करू शकतो. त्यासाठी काही गोष्टी अंगिकाराव्या लागतात. मानसिक विकारांचा सामना करतानासुद्धा मनात आशावादी दृष्टीकोन निर्माण करायला शिकवले जाते. त्यासाठी विचार आणि वर्तणूक यात बदल घडवणाऱ्या मानसोपचाराचा (cognitive behavior therapy) वापर केला जातो. मनातल्या नकारात्मक विचारांना आव्हान देऊन, त्याजागी नवीन सकारात्मक विचारांचे रोपण करणे, अडचणींकडे त्रयस्थपणे बघायला शिकणे, संकटाशी सामना करताना माहिती मिळवणे, उपाय शोधणे, त्यासाठी आवश्यक त्याची मदत घेणे अशा विविध पद्धती शिकता येतात.

आणखी वाचा-Mental Health Special: हसणे मन:स्वास्थ्यासाठी किती आवश्यक?

रोज डायरी लिहिणे, त्यात आपल्याला आलेले चांगले अनुभव नोंदवणे, आपल्याला दिवसभरात ज्यांनी मदत केली त्यांची आठवण ठेवणे, त्यांच्याविषयी कृतज्ञता मनातल्या मनात व्यक्त करणे (अगदी बसमध्ये कोणी बसायला दिले तर त्याचीही आठवण मनाला प्रसन्न करते). याबरोबरच स्वतःविषयी आणि इतरांविषयी सकारात्मक विचार आणि भावना मनात बाळगणे, कोणाशी स्पर्धा करून तुलना करत न बसणे, परिस्थितीतील चांगले काय ते शोधणे या सगळ्याचा मनातला दृष्टीकोन आशावादी व्हायला मदत होते. आपल्या घराण्याचा, राष्ट्राचा इतिहास देखील मनात आशा निर्माण करू शकतो. अनेक छोट्या छोट्या गोष्टी करता येतात. पुढील योजना तयार करणे, त्या मनात घोळवणे, निराशेच्या क्षणी एखाद्या आशावादी मित्राला भेटणे, ‘आशाए खिले दिल की, उम्मीदे हसे दिल की, अब मुश्कील नहीं कुछ भी, नही कुछ भी’ या सारखे छानसे गाणे मनात गुणगुणणे, एखादे सकारत्मक, प्रेरणादायी, आनंददायी पुस्तक वाचणे या सगळ्याचा चांगला परिणाम होतो.

‘आशानाम मनुष्याणाम काचिद् आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावन्ति, मुक्तास्तीष्ठान्ति पंगुवत’ (आशा ही माणसाला बांधून ठेवणारी आश्चर्यकारक साखळी आहे. हिने बांधले असता माणूस उत्साहाने धावत सुटतो, आणि ह्यापासून मुक्त माणूस पांगळा होतो.) हे सुभाषितसुद्धा आशेचे समर्पक वर्णन करते. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य वृद्धींगत करताना आपल्यामध्ये ज्या अनेक गोष्टी अंगी बाणवाव्या लागतात त्यात मनातील आशावाद खूप महत्त्वाचा ठरतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mental health special why is optimism important for mental health hldc mrj

First published on: 23-11-2023 at 17:19 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×